उपराष्ट्रपती कार्यालय
लोकशाहीकडून ‘भावनाशाही’ कडे झालेल्या स्थित्यंतरावर उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विचारमंथनाची गरज- भावनांनी प्रेरित धोरणे उत्तम प्रशासनाला धोका निर्माण करतात: उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
निवडणुकीतील वचने पाळण्यासाठी केलेला अवाजवी खर्च, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची देशाची क्षमता कमी करतो: उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
सच्चे नेतृत्व लोकांमध्ये स्वतःला क्षणभरासाठी नव्हे तर कायमस्वरूपी सक्षम करण्याची क्षमता निर्माण करते, असे उपराष्ट्रपती म्हणाले
मुंबई येथे ‘नेतृत्व आणि शासन’ या संकल्पनेवर आधारित पहिल्या ‘मुरली देवरा स्मृती संवाद’ कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचे उद्घाटनपर भाषण
Posted On:
07 MAR 2025 12:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2025
“लोकशाहीकडून ‘भावनाशाही’ कडे झालेल्या स्थित्यंतराची दखल घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विचारमंथनाची गरज आहे,” असे सांगत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज लोकशाहीकडून ‘भावनाशाही’ कडे झालेल्या बदलाबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “भावनांनी प्रेरित धोरणे, भावनांच्या आधारावर केलेल्या चर्चा आणि भाषणे उत्तम प्रशासनाला धोका निर्माण करतात. लोकांना क्षणभरासाठी सक्षम न बनवता त्यांच्यामध्ये स्वतःला सक्षम करण्याची क्षमता निर्माण करायला हवे कारण तात्पुरत्या सक्षमतेमुळे त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो.”
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नेतृत्व आणि शासन’ या संकल्पनेवर आधारित पहिल्या ‘मुरली देवरा स्मृती संवाद’ कार्यक्रमात उद्घाटनपर भाषण करताना उपराष्ट्रपती धनखड यांनी राजकीय क्षेत्रात होत असलेले तुष्टीकरणाचे राजकारण आणि शांतीकरणविषयक रणनीतींच्या उदयाबाबत चिंता व्यक्त केली. निवडणुकीतील वचने पाळण्यासाठी अवाजवी खर्च केला तर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची देशाची क्षमता त्या प्रमाणात कमी करतो. विकासविषयक परिस्थितीसाठी हे मारक ठरते. लोकशाहीत निवडणुका महत्त्वाच्या आहेत पण त्याच एकमेव महत्त्वाचा घटक नाहीत.
वंचित समुदायांसाठी हाती घेतलेली सकारात्मक कार्ये तुष्टीकरणाच्या राजकारणापासून अगदी भिन्न आहेत असे स्पष्ट करत ते म्हणाले, “सभ्य स्त्री-पुरुषहो, माझ्या अशा बोलण्याने गैरसमज करून घेऊ नका, कारण, भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क दिलेला असतानाच, सकारात्मक शासन-सकारात्मक कृतींसाठी संविधानाच्या 14,15 आणि 16 या कलमांन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुबळ्या वर्गांसाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. हे एक पवित्र कार्य मानले आहे. ग्रामीण भारतात अशा काही अपवादात्मक स्थिती निर्माण होतात जेव्हा शेतकऱ्यांसाठी सकारात्मक पावले उचलावी लागतात. मात्र मी ज्याबद्दल बोलत होतो त्यापेक्षा ही वेगळी परिस्थिती आहे. हे तुष्टीकरण किंवा शांतीकरण नव्हे. तर हे न्याय्य आर्थिक धोरण आहे.”
यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी लोकसांख्यिकीय आव्हाने आणि बेकायदेशीर स्थलांतराचे मुद्देही ठळकपणे अधोरेखित केले. देशात लाखो बेकायदेशीर स्थलांतरित लोक राहत असून, त्यांच्यामुळे लोकसांख्यिकीय बदल घडून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे आपल्या आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवांवर मोठा ताण येत आहे. त्यांच्यामुळे आपल्या लोकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत आहे. अशा घटकांनी काही भागांमध्ये निवडणूकीसाठी स्वतःचे महत्त्व निर्माण केले असून, त्यामुळे आपल्या लोकशाही तत्वाला धक्का बसू लागगला असल्याचे धडखड यांनी सांगितले. भूतकाळातील ऐतिहासिक संदर्भ पाहीले तर त्यावेळीही अनेक देशांममध्ये अशाच प्रकारची लोकसांख्यिकीय आक्रमणे झाली होती, आणि त्यामुळे त्या त्या देशांची मूळ ओळखच पूसली गेली, यावरून आपण या आक्रमणाचा धोका समजून घेऊ शकतो असे उपराष्ट्रपती म्हणाले.
यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी माजी खासदार दिवंगत मुरली देवरा यांच्या स्मृतींना धनखड यांनी आदरांजली वाहिली, ते राजकीय क्षेत्रात असलेले, सार्वजनिक जीवनातले सर्वोत्तम व्यक्तिमत्वांपैकी एक होते असे ते म्हणाले. राजकीय क्षेत्रातील असलेल्यांपैकी मुरली देवरा हे सर्वोत्तम सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांनी आयुष्यभर मैत्री जपली. त्यांनी कायमच मतभेद मिटवले आणि ते सगळ्यांचेच आवडते होते असे धनखड यांनी सांगितले. त्यांचा कोणीही विरोधक नव्हता, या एकाच गोष्टीची त्यांच्या आयुष्यात कमतरता होती, आणि हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते असे ते म्हणाले.
मुरली देवरा यांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी आणण्यात मोठी भूमिका बजावली, आणि देशाचे धूम्रपानाच्या धोक्यांपासून रक्षण केले अशा शब्दांत धनखड यांनी देवरा यांच्या कार्याची प्रशंसा केली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी यावी यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले आणि न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवल्याची आठवणही धनखड यांनी श्रोत्यांना करून दिली.
सेवा देणे हाच नेतृत्वाचा अर्थ असतो याचे मुर्त उदाहरण ठरावे असेच मुरली देवरा यांचे आयुष्य होते असे जगदीप धनखड म्हणाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा आणि इतर मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.
* * *
JPS/Sanjana/Tushar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109015)
Visitor Counter : 34