ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक संस्थेच्या (Bureau of Indian Standards - BIS) मुंबई शाखा-II ने भिवंडी इथे केलेल्या कारवाईत 109 बनावट इलेक्ट्रिक फूड मिक्सर जप्त
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2025 10:20PM by PIB Mumbai
मुंबई, 5 मार्च 2025
भारतीय मानक संस्थेच्या मुंबई शाखा-II ने आज 5 मार्च 2025 रोजी भिवंडी इथे शोध आणि जप्तीची मोहीम राबवली. या कारवाईत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी मेसर्स आरबीएच एन्टरप्रायजेस मधील घरगुती वापराचे 109 बनावट इलेक्ट्रिक फूड मिक्सर जप्त करण्यात आले.
या जप्त केलेल्या वस्तूंमध्ये विविध ब्रँडच्या इलेक्ट्रिक फूड मिक्सरचा समावेश होता. यांमधील काही मिक्सरवर ISI ची मान्यतेची खूणही छापलेली होती, तर काहींवर ही खूण छापलेली नव्हती. ही सर्व उत्पादने भारतीय मानक संस्थेच्या वैध [BIS (ISI मार्क)] प्रमाणपत्र परवान्याशिवाय उत्पादित करून विकली जात होती. ही कृती भारतीय मानक संस्था कायदा, 2016 च्या कलम 17 चे उल्लंघन असल्याची माहिती संस्थेच्या निवेदनात दिली आहे. त्यामुळे या कायद्यातील कलम 17 आणि कलम 29 मधील तरतुदींनुसार संबंधित कंपनी विरोधात गुन्हेगारी कारवाई केली जाणार असल्याचेही भारतीय मानक संस्थेने कळवले आहे. याचबरोबरीने या बनावट वस्तू ज्या ऑनलाइन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स मंचांवरून विकल्या जात होत्या, त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे भारतीय मानक संस्थेने स्पष्ट केले आहे. भारतीय मानक संस्थेच्या कायद्यातील तरतुदींनुसार, अशा उल्लंघनांसाठी पहिल्या गुन्ह्याकरता दोन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तसेच दोन लाख रुपये दंडाची शिक्षेची तरतुद आहे. त्यानंतर वारंवार उल्लंघन झाल्यास पुढच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी बनावट वस्तूंच्या एकूण बाजारमूल्याच्या दहा पट दंडाची तरतूद या कायद्यात केली गेली आहे.

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने भारतीय मानक संस्थेच्या वतीने नियमितपणे अशा शोध आणि जप्तीच्या मोहीमा राबवल्या जातात. बनावट वस्तुंमुळे आपली फसवणूक होणे टाळण्यासाठी ग्राहकांनी BIS Care App या मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोणत्याही उत्पादनाची भारतीय मानक संस्थेद्वारा दिल्या गेलेल्या परवान्याची माहिती तपासावी असे आवाहनही संस्थेने केले आहे. सदर परवाना निलंबित झाला असल्याचे, स्थगित केला गेला असल्याचे किंवा कालबाह्य असल्याचे आढळले तर नागरिकांनी याविरोधात तक्रार दाखल करावी असे आवाहनही संस्थेने केले आहे.

ग्राहकांना ISI मार्क, BIS नोंदणी चिन्ह, BIS हॉलमार्क किंवा BIS व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्रांचा गैरवापर होत असल्याचे आढळले तर ते BIS Care App द्वारे किंवा ई-मेल अथवा पत्राद्वारे भारतीय मानक संस्थेकडे तक्रार नोंदवू शकतात, अशा सर्व प्रकरणांमध्ये तक्रारदाराची माहिती गोपनीय राखली जाते अशी माहितीही संस्थेने दिली आहे.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2108684)
आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English