वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यापार तसेच लॉजिस्टिक्स विषयक शिक्षणात बळकटी आणण्यासाठी आयआयएफटी आणि बेल्जियमचे एपीईसी-अँटवर्प/फ्लँडर्स पोर्ट प्रशिक्षण केंद्र यांच्यात सामंजस्य करार


जागतिक व्यापार प्रक्रियांशी संबंधित सहकार्य निर्माण करून प्रशिक्षण आणि सखोल अंतर्दृष्टी देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे: केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद

Posted On: 03 MAR 2025 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2025

आंतरराष्ट्रीय व्यापार, लॉजिस्टिक्स तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये शैक्षणिक सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांमध्ये वाढ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आयआयएफटी म्हणजेच भारतीय परदेश व्यापार संस्थेने बेल्जियमच्या एपीईसी-अँटवर्प/फ्लँडर्स पोर्ट प्रशिक्षण केंद्राशी सामंजस्य करार (एमओयु) केला आहे.
 
आंतर सांस्कृतिक व्यापारविषयक अध्ययनाच्या दृष्टीने प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांच्या आदानप्रदानाच्या माध्यमातून भारत आणि बेल्जियम या देशांमधील व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणविषयक संबंध आणखी मजबूत करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. बंदर व्यवस्थापन, जागतिक लॉजिस्टिक्स आणि व्यापारविषयक सुविधा यांच्यावर आधारित संयुक्त संशोधनाचा यात समावेश असून यामध्ये विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा तसेच उद्योगांतील व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद यांचा देखील अंतर्भाव करण्यात येईल.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी भारताची व्यापारविषयक परिसंस्था बळकट करण्यात आंतरराष्ट्रीय भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. “भारत आणि बेल्जियम यांच्यात अनेक दशकांपासून सशक्त व्यापारी संबंध आहेत. आपले व्यापार क्षेत्रातील भविष्यकालीन नेते जागतिक दर्जाचे प्रशिक्षण तसेच जागतिक व्यापारी पद्धतींविषयी गहन अंतर्दृष्टीसह सुसज्जित असतील याची सुनिश्चिती करून घेत हा सामंजस्य करार आपल्या दरम्यानच्या सहकार्यात वाढ करेल.”

जागतिक व्यापाराचे जाळे आणखी मजबूत करण्यात अशा सहयोगी संबंधांची भूमिका मान्य करत बेल्जियमच्या मान्यवर प्रतिनिधींनी सदर उपक्रमाची प्रशंसा केली. लोकशाही, कायद्याचे राज्य आणि भागीदारी यांची निवड करून भारतातील जनता अत्यंत योग्य बाबींची निवड करत आहे असे मत उपस्थित मान्यवर मथीयास डायपेंडेल यांनी व्यक्त केले. अँटवर्पच्या धोरणात्मक स्थानाचा देखील ठळकपणे उल्लेख करत ते म्हणाले की अँटवर्प जागतिक पातळीवरील व्यापार आणि आर्थिक जोडणीला सुलभता देऊन युरोपच्या दिशेने उघडणारा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून कार्य करते याकडे त्यांनी निर्देश केला.

सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर, बेल्जियमचे मंत्री- अध्यक्ष आणि यापूर्वी फ्लँडर्सला भेट देऊन आलेले आयआयएफटी मधील प्राध्यापक यांच्या दरम्यान गोलमेज चर्चा पार पडली. या सर्वांनी आपापले अनुभव सामायिक करत या कार्यक्रमातून हाती येणाऱ्या महत्त्वाच्या परिणामांबाबत चर्चा केली.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अजय भादो यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत फ्लेमिश सरकारचे मंत्री-अध्यक्ष आणि अर्थव्यवस्था, नवोन्मेष आणि उद्योग, परराष्ट्र व्यवहार, डिजिटलीकरण आणि सुविधा व्यवस्थापन विभागाचे फ्लेमिश मंत्री माननीय मथीयास डायपेंडेल; पोर्ट ऑफ अँटवर्प-ब्रूगेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाक्वेस व्हँडरमीरेन; पोर्ट ऑफ अँटवर्प-ब्रूगेस आंतरराष्ट्रीय चे अध्यक्ष डिर्क दे फॉ आणि पोर्ट ऑफ अँटवर्प-ब्रूगेस आंतरराष्ट्रीयचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तॉफ वॉटरशूट यांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

आयआयएफटीचे उपकुलगुरू प्रा.राकेश मोहन जोशी यांच्यासह अनेक वरिष्ठ अध्यापक गण तसेच पोर्ट ऑफ अँटवर्पच्या संपर्काच्या माध्यमातून यापूर्वी लाभ मिळवलेले प्रख्यात प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

आयआयएफटीचे उपकुलगुरू प्रा.राकेश मोहन जोशी यांनी याप्रसंगी बोलताना आयआयएफटी मधील विद्यार्थ्यांना जागतिक व्यापार तसेच लॉजिस्टिक्स व्यवहारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यात या भागीदारीचे महत्त्व ठळकपणे नमूद केले.

पोर्ट ऑफ अँटवर्प-ब्रूगेस आंतरराष्ट्रीयचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तॉफ वॉटरशूट यांनी पोर्ट ऑफ अँटवर्प आणि आयआयएफटी यांच्यात दीर्घकाळापासून चालत आलेल्या संबंधांना अधोरेखित करत सांगितले, “हा सामंजस्य करार व्यापारातील सुलभताविषयक क्षमता निर्मिती आणि ज्ञानाचे सामायिकीकरण यांच्या संदर्भात आमच्या प्रयत्नांना आणखी मजबुती देईल.”
 
पोर्ट ऑफ अँटवर्प आणि आयआयएफटी यांच्यात दीर्घकाळापासून चालत आलेल्या संबंधांच्या पायावर हा सहयोग उभा असून वर्ष 2019 मध्ये पहिल्यांदा संस्थेतील 206 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षणासाठी पोर्ट ला भेट दिली होती. आयआयएफटीच्या अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असलेल्या पोर्ट भेटींनी विद्यार्थ्यांच्या पुरवठासाखळीची कार्यक्षमता, सीमाशुल्क नियमाने तसेच जागतिक व्यापार प्रक्रिया समजुतींना समृध्द केले आहे.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2108010)
Read this release in: English , Urdu , Hindi