वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने कापूस उत्पादन अभियान या विषयावरील चर्चेसह अर्थसंकल्पोत्तर वेबिनारचे आयोजन


कापसाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी आणि नव्या युगातील सामग्रीच्या उत्पादनासाठी या अभियानात धोरणात्मक उपक्रमांचा अंतर्भाव केला जाणार

Posted On: 01 MAR 2025 8:00PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारचे उद्घाटन झाले. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने या वेबिनारचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, वस्त्रोद्योग सचिव नीलम शामी राव यांच्यासह विविध सरकारी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, कृषी क्षेत्राशी संबंधित प्रमुख भागधारक आणि तज्ज्ञांनीही या वेबिनारमध्ये सहभाग घेतला. या वेबिनारच्या उद्घाटनपर भाषणानंतर, विविध विषयांवर आयोजित सत्रांमध्ये चर्चा आणि संवाद झाला, याअंतर्गत आगामी विविध योजना आणि अभियांनांवर चर्चा केली गेली.

या वेबिनार अंतर्गत आयोजित सत्रात बोलताना वस्त्रोद्योग सचिव श्रीमती नीलम शामी राव यांनी कापूस मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी सरकारची दृढ वचनबद्धता अधोरेखित केली. यादृष्टीने सरकारने फायबर (तंतू) चाचणी पायाभूत सुविधांचा केलेला विस्तार, अतिरिक्त लांबीचा तंतू (Extra Long Staple - ELS) आणि कापसाच्या बियाणांच्या उत्पादनात करून दाखवलेली वाढ तसेच कस्तुरी कॉटन भारत या उपक्रमाचा विस्तार अशा विविध महत्वाच्या उपाययोजनांच्या माध्यमातून भारताच्या कापूस क्षेत्राचा विकास आणि सुनिश्चिततेसाठी केलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, वस्त्रोद्योग मंत्रालयाने मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी अर्थात कापूस उत्पादन अभियान या महत्वाच्या विषयावरही चर्चेचे आयोजन केले होते. या सत्राअंतर्गत वस्त्रोद्योग तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण या केंद्र सरकारच्या दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारांचे प्रतिनिधी, या उद्योग क्षेत्राशी संबंधित भागधारक आणि शेतकरी तसेच कापसाच्या बोंडापासून कापूस आणि बिया वेगळे करणारे अर्थात जिनर्स (ginners) यांच्यासह कापूस मूल्यसाखळीतील प्रमुख तज्ज्ञ असे विविध घटक एकाच मंचावर एकत्र आले होते.

या वेबिनारमधील चर्चासत्रांमध्ये उद्योग क्षेत्रातले आघाडीचे उद्योग व्यावसायिक, राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवरील धोरणकर्ते, प्रख्यात शास्त्रज्ञ, संशोधन तज्ज्ञ आणि शेतकरी अशा प्रत्येक घटकातील तज्ञांनी सक्रीय सहभाग घेतला. या सत्रांमध्ये झालेल्या चर्चांत प्रामुख्याने तंत्रज्ञानातील प्रगती, बाजारपेठांसोबतची जोडणी वाढवणे आणि शाश्वत कापूस उत्पादनाशी संबंधित नवोन्मेषाला चालना देणे हे विषय केंद्रस्थानी होते. उत्पादकता वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यावर भर देत, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठीची सरकारची वचनबद्धता या चर्चांमधून वारंवार अधोरेखित केली गेली.

या वेबिनारच्या समारोप सत्राला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी मांडलेली मते आणि विचार त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. आपले शेतकरी समृद्ध आणि सक्षम होतील याची सुनिश्चिती करण्याच्या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांनी आणि विभागांनी परस्पर सन्मवयाने काम करण्याची गरजही शिवराज सिंग चौहान यांनी आपल्या संबोधनात अधोरेखित केली.

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2107560) Visitor Counter : 36


Read this release in: English , Urdu , Hindi