विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पायरोलिसीस तेल शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर करून प्लास्टिकच्या अभिसरणाच्या दिशेने प्रगती करण्यासाठी टीडीबी-डीएसटीचा नवी मुंबई येथील एपीकेमी कंपनीला पाठींबा

Posted On: 28 FEB 2025 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2025

 

तंत्रज्ञान विकास मंडळाने (टीडीबी) नवी मुंबई येथील एपीकेमी कंपनीच्या “सर्क्युलर प्लास्टिक्स आणि शाश्वत  रसायनांचे डाऊनस्ट्रीम उत्पादन शक्य करण्यासाठी शुद्ध पायरोलिसीस तेलाचे उत्पादन आणि व्यापारीकरण” या प्रकल्पासाठी कंपनीशी करार केला आहे. या कराराअंतर्गत टीडीबीने वित्तीय मदत मंजूर करून शाश्वततेमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानांतील प्रगतीला चालना देण्याप्रती स्वतःच्या कटिबद्धतेची पुष्टी केली आहे.

प्लास्टिक आणि बायोमासच्या पायरोलिसीस क्षेत्रातील अग्रेसर कंपनी असलेल्या एपीकेमी कंपनीने 12 पेटंट घेतली आहेत (पाच मंजूर पेटंटचा यात समावेश आहे). या कंपनीने एक असे परिवर्तनकारी तंत्रज्ञान विकसित केले आहे जे पुनर्नवीकरण करता न येणाऱ्या, अनंतकाळ टिकून राहू शकणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे रुपांतर उच्च दर्जाच्या, रिफायनरी श्रेणीच्या पायरोलिसीस तेलात करते.

जगभरात प्लास्टिक कचऱ्याचे संकट अक्राळविक्राळ रूप धारण करत असताना आणि दरवर्षी जगभरात निर्माण होणाऱ्या 350 दशलक्ष टन प्लास्टिक कचऱ्यापैकी 10 टक्क्याहून कमी कचऱ्याचे परिणामकारक पद्धतीने पुनर्नवीकरण केले जात असताना दरवर्षी 1.2 ते 6 किलोटन कचऱ्याच्या अभिसरणाला वेग देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 100 रोजगार निर्माण करण्यासोबतच प्लास्टिकमुळे होत असलेल्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालणे तसेच भस्मीकरण आणि लँडफिलिंगशी संबंधित कार्बन उत्सर्जन कमी करणे यासाठी देखील हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

टीडीबीचे सचिव राजेश कुमार पाठक यांनी या प्रकल्पाच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी असलेल्या अनुकूलनावर अधिक भर दिला. ते म्हणाले, “एपीकेमी कंपनीचा नवोन्मेषी  दृष्टीकोन म्हणजे टीडीबी ज्या तंत्रज्ञानाला पाठबळ देण्याप्रती समर्पित आहे त्याच प्रकारच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे उदाहरण होय. हे तंत्रज्ञान आव्हान निर्माण करत असलेल्या पर्यावरणीय आव्हानांवर उपाय शोधण्यासोबतच देशांतर्गत क्षमतांचे बळकटीकरण करून आर्थिक संधी देखील निर्माण करते. हा उपक्रम भारतात शाश्वत तसेच आत्मनिर्भर  चक्राकार अर्थव्यवस्था उभारण्यात महत्त्वाचे योगदान देईल आणि आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करुन रोजगार निर्मितीला चालना देईल.”

या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत एपीकेमी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिक्षित म्हणाले, “टीबीडी सोबतची भागीदारी म्हणजे पुन्हा पर्यावरणीय समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न करत प्लास्टिक कचऱ्याच्या संकटाला एका आर्थिक संधीत परिवर्तीत करण्याच्या आमच्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा आहे.”

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2107143) Visitor Counter : 29


Read this release in: English , Hindi , Urdu