वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
बंदरे, जहाज बांधणी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन
नाविकांना असलेल्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी हायब्रीड प्रशिक्षण मॉडेलचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा प्रस्ताव
Posted On:
25 FEB 2025 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2025
बंदरे, जहाज बांधणी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्र ही देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवन वाहिनी असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत बंदरे, जहाज बांधणी आणि लॉजिस्टिक्स वरील 12 व्या द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते. व्यापार नदीप्रमाणे प्रवाही असून, जहाज बांधणी क्षेत्र भारताला जगभरातील संधींशी जोडत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
देशात जहाज बांधणीच्या मोठ्या संधी असून, सरकार या क्षेत्राला चालना देण्याचे अधिक मार्ग शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात जहाजांचे फ्लॅगिंग आकर्षक बनवण्यासाठी उद्योग क्षेत्राने उपाय सुचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. "जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार परवानगी असलेल्या भारतीय जहाजांद्वारे आयातीला प्रोत्साहन देऊन, मालवाहतुकीला परवानगी देण्याचा भारताला फायदा आहे, मात्र या नियमांचा लाभ घेण्यासाठी पुरेशी फ्लॅग अर्थात भारतात नोंदणी झालेली ध्वजांकित जहाजे उपलब्ध नाहीत", त्यांनी नमूद केले. भारतात नोंदणीकृत आणि ध्वजांकित जहाजांसाठी कंपन्यांना यायला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्र स्तरावर उपस्थितांनी उपाय सुचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
भारताने गेल्या दशकभरात आपली बंदर क्षमता दुप्पट केली असून, जहाजांना बंदरावरून मालाची चढ-उतार करून येण्या-जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे, मात्र लॉजिस्टिक परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने आणखी काम करायला हवे, असे ते म्हणाले.
भारताच्या एकूण व्यापारापैकी 95% व्यापार बंदरांमधून होतो, आणि देशाचा 7,500 किमी लांबीचा समुद्रकिनारा व्यापारासाठी एक प्रमुख सहाय्यक म्हणून काम करतो, तसेच पुढील काही वर्षांत आणखी विकास करण्याची अफाट क्षमता या क्षेत्रात असल्याचे त्यांनी नमूद केले. बंदरांवरील सध्याची वाहतूक हाताळण्यासाठी लॉजिस्टिक यंत्रणा अधिक अनुकूल असायला हवी, असे ते म्हणाले. "लॉजिस्टिक्सला सहाय्य करण्यासाठी युनिफाइड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म (यूलिप) सुरु केला आहे, तरीही बंदरांवरील संपूर्ण परीसंस्थेशी जोडलेले लॉजिस्टिक्स प्रदान करण्यासाठी अधिक कल्पना आवश्यक आहेत", ते म्हणाले.
या क्षेत्रातील नाविकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हायब्रीड पद्धतीने प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कंटेनरची मालकी, कंटेनर उत्पादन, वेगवान निर्यात, गर्दी कमी करणे, या क्षेत्रांमध्ये सुधारणांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक व्यापारातील उलथापालथीमध्ये, भारत वाळवंटातील ओएसिस प्रमाणे स्थिर असल्याचे सांगून, देशाचा विकास होत राहील आणि आपला देश जगाच्या कल्याणासाठी योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सागरी व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्र, हा विकसित भारताचा कणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2106286)
Visitor Counter : 10