नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएमओ महासचिव आर्सेनिओ डॉमनिग्झ यांची मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि नाविक युध्द स्मारकाला भेट


हरित सागरी उपक्रम आणि नाविकांच्या कल्याणात वाढ करण्याच्या उद्देशाने आयएमओ आणि भारत यांच्यातील संबंधांचे बळकटीकरण

Posted On: 19 FEB 2025 10:05PM by PIB Mumbai

मुंबई, 19 फेब्रुवारी 2025

 

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे (आयएमओ) महासचिव आर्सेनिओ डॉमनिग्झ यांनी आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) तसेच नाविक गृह संस्था (आयएसएचएस) या ठिकाणांना भेट दिली. वर्ष 2024 मध्ये संस्थेतील पदभार हाती घेतल्यानंतर डॉमनिग्झ यांची ही पहिलीच भारतभेट असून ते तीन दिवसांच्या अधिकृत भेटीवर आले आहेत. जागतिक नौवहन उद्योगातील नव्याने उदयाला येत असलेली आव्हाने तसेच संधी यासंदर्भात उपाय शोधण्यासाठी भारतासारख्या महत्त्वाच्या सागरी देशांशी सहयोगाप्रती आयएमओच्या सशक्त वचनबद्धतेला ही भेट अधोरेखित करते.

डॉमनिग्झ यांच्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भेटीदरम्यान त्यांनी बंदराच्या ठिकाणी होणाऱ्या कामांविषयी आणि शाश्वत बंदर विकासासाठीच्या संधींविषयी महत्त्वाची माहिती घेतली. सागरी परिसंस्थेतील जेएनपीएची महत्त्वाची भूमिका समजून घेण्यासाठी त्यांनी बंदरातील अधिकारी व्यक्तींशी बातचीत केली, तसेच त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या सुविधांची माहिती घेतली. बंदराच्या कामकाजात शाश्वतता जोपासणे, नौवहन क्षेत्राचे नि:कार्बनीकरण करण्यासाठी अभिनव उपायांचा शोध घेणे आणि पर्यावरणीय दृष्ट्या सशक्त सागरी पद्धतींचा अवलंब करणे या मुद्द्यांवर ही चर्चा होती. त्यांची भेट हरित नौकानयनाला प्रोत्साहन देणे आणि सागरी शाश्वतता सुधारणे या आयएमओच्या विस्तारित संकल्पनांना अनुसरून आहे. आयएमओच्या महासचिवांसोबत यावेळी नौवहन विभागाचे महासंचालक आणि प्रशासकीय अधिकारी असलेले श्याम जगन्नाथन, जेएनपीएचे अध्यक्ष आणि भारतीय महसूल सेवेतील अधिकारी उन्मेष शरद वाघ यांच्यासह जेएनपीए आणि डीजीएसमधील विविध अधिकारी उपस्थित होते.

आज दिवसाच्या सुरुवातीला आर्सेनिओ डॉमनिग्झ यांनी सागरी इतिहासासाठी भारतीय नाविकांनी केलेली बलिदाने आणि योगदाने यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या नाविक युध्द स्मारकाला भेट दिली. युद्धाच्या काळात सेवा बजावणाऱ्या नाविकांचे शौर्य आणि समर्पण यांचा पुरावा देत हे स्मारक उभे आहे. नाविकांचा सन्मान आणि स्मरणाचे चिन्ह म्हणून डॉमनिग्झ यांनी नाविक युध्द स्मारकाच्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केले. टी. एस. रहमान वरील प्रशिक्षणार्थी नाविकांनी आयएमओच्या महासचिवांना मानवंदना दिली. आयएमओच्या महासचिवांसोबत यावेळी नौवहन विभागाचे महासंचालक आणि प्रशासकीय अधिकारी असलेले श्याम जगन्नाथन आणि  नौवहन विभागाचे उप महासंचालक कॅप्टन (डॉ.) डॅनिएल जे. जोसेफ आणि एनयुएसआयचे महासचिव आणि खजिनदार मिलिंद कांदळगावकर उपस्थित होते.

नववर्षानिमित्त केलेल्या भाषणात महासचिव डॉमनिग्झ यांनी यावर्षी, नौवहन क्षेत्राचे नि:कार्बनीकरण आणि महासागरी आरोग्याचे संरक्षण यांच्याप्रती संघटनेच्या अविचल कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत आयएमओचे वर्ष 2025 साठीचे प्राधान्यक्रम निश्चित केले होते. त्यांची ही भारतभेट याच कटिबद्धतेचा पुरावा असून शाश्वत सागरी उपक्रमांमध्ये वाढ करण्यासाठी भारत आणि आयएमओ यांच्यातील सहयोगाला चालना देण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे.

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2104856) Visitor Counter : 33


Read this release in: English