युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांनी मुंबईत भारतीय क्रीडा प्राधिकरण एनसीओई येथे अद्ययावतीकरण योजनेचा घेतला आढावा

Posted On: 17 FEB 2025 10:08PM by PIB Mumbai

मुंबई, 17 फेब्रुवारी 2025


मुंबईत कांदिवली स्थित भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या (एनसीओई) अद्ययावतीकरण योजनेचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ.मनसुख मांडवीया  यांनी या केंद्राला भेट दिली. प्रस्तावित सुधारणांमध्ये, योग, खो-खो आणि मल्लखांब यांसारख्या स्वदेशी खेळांसह विविध क्रीडा प्रकारांसाठी प्रशिक्षणविषयक अत्याधुनिक पायाभूत सुविधा तसेच क्रीडापटूंसाठी मोठ्या वसतिगृहाच्या सोयीचा समावेश आहे.

डॉ. मांडवीया यांनी यावेळी एनसीओईच्या अद्ययावतीकरणाच्या तातडीच्या गरजेवर भर दिला, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षित करण्याची क्षमता असलेल्या मुंबईत जागतिक दर्जाच्या सुविधांच्या  अभावाकडे  त्यांनी लक्ष वेधले. खेळाडूंना प्रशिक्षण, पुनर्वसन  आणि रिकव्हरी  यांच्या संदर्भात मदत करणाऱ्या आणि देशभरातील सुप्रसिद्ध खेळाडूंसाठी मध्यवर्ती केंद्र ठरणाऱ्या अत्याधुनिक उच्च-कार्यक्षमता क्रीडा विज्ञान केंद्राच्या उभारणीचा देखील एनसीओईच्या अद्ययावतीकरण योजनेत समावेश आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय)आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. सुमारे 36 वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या या करारान्वये एनसीओई मध्ये नवीन पायाभूत सुविधा उभारण्याची संधी एसएआयला मिळाली आहे. तद्नुषंगाने हा आढावा घेण्यात आला.

त्यासोबतच,डॉ.मांडवीया यांनी  एसएआयच्या मुंबई येथील प्रादेशिक केंद्राच्या वतीने महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या खेलो इंडिया योजना तसेच फिट इंडिया उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एनसीओईमधील हॉकी, कुस्ती आणि क्रीडा केंद्राच्या विद्यमान पायाभूत सुविधांचे पुनरावलोकन केले. या भेटीदरम्यान त्यांनी उपस्थित खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक आणि केंद्राच्या कर्मचारीवर्गाशी देखील संवाद साधला.


S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2104245) Visitor Counter : 35


Read this release in: English