पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर

Posted On: 06 FEB 2025 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025


आदरणीय सभापति जी,

आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या  कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन करणारेही होते. आदरणीय राष्ट्रपती जी यांच्या संबोधनासाठी धन्यवाद देण्याकरिता  मी उपस्थित आहे.     

आदरणीय सभापति जी,

साधारणपणे 70 पेक्षा जास्त माननीय खासदारांनी आपल्या बहुमोल विचारांनी हा आभारदर्शक ठराव समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक दोन्ही बाजूनी इथे चर्चा झाली.प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, राष्ट्रपतींचे अभिभाषण ज्याप्रमाणे  जाणले त्याप्रमाणे  इथे विषद केले आणि त्यांनी आदरणीय सभापती जी इथे सबका साथ, सबका विकास याबाबतही खूप वक्तव्य केली. मला हे समजू शकत नाही की यात अडचण काय आहे. सबका साथ, सबका विकास हे  तर आपणा सर्वांचे दायित्व आहे आणि यासाठीच तर देशाने आपण सर्वाना इथे आसनस्थ होण्याची संधी दिली आहे.कॉंग्रेसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांच्याकडून सबका साथ, सबका विकास यासाठी अपेक्षा ठेवणे ही मोठी चूक ठरेल असे मला वाटते. हे त्यांच्या विचारापलीकडे आहे,आकलनापलीकडचेही आहे आणि त्यांच्या रोड मॅप मधेही ते बसत नाही कारण इतका मोठा पक्ष एका कुटुंबाला समर्पित झाला आहे, त्यांच्यासाठी सबका साथ, सबका विकास शक्यच नाही.        

आदरणीय सभापति जी,

कॉंग्रेसने राजकारणाचे एक असे मॉडेल तयार केले होते, ज्यामध्ये असत्य,फसवणूक,भ्रष्टाचार,घराणेशाही,तुष्टीकरण या सगळ्याची सरमिसळ होती आणि जिथे या सर्वांची सरमिसळ असेल तिथे ‘सबका साथ’ असूच शकत नाही.  

आदरणीय सभापति जी,

कॉंग्रेसच्या मॉडेल मध्ये सर्वोच्च स्थानी आहे ते म्हणजे कुटुंब प्रथम आणि त्यासाठी त्यांचे धोरण,त्यांची वाणी,त्यांचे वर्तन ही एकच बाब सांभाळण्यासाठी राबत असते. 2014 नंतर देशाने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आणि मी देशाच्या जनतेचा आभारी आहे की आम्हाला सलग तिसऱ्यांदा, तिसऱ्यांदा जनता आम्हाला इथवर आणते,इतक्या विशाल देशात चैतन्यशील लोकशाही आहे,जागरूक माध्यमे आहेत,सर्व प्रकारचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,तरीही देश आम्हाला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सेवा करण्याचे मॉडेल बनवते कारण देशाच्या जनतेने आमचे  विकासाचे मॉडेल पारखले आहे,जाणले आहे आणि त्याला समर्थनही दिले आहे.

आमच्या एकमेव मॉडेलचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर ‘नेशन फर्स्ट’ राष्ट्र सर्वप्रथम ही  भावना आणि समर्पित भावाने आम्ही सातत्याने आमच्या  धोरणांमध्ये आपल्या कार्यक्रमांमध्ये,आपल्या वाणीमध्ये, आपल्या आचारामध्ये हाच एक मापदंड ठरवून देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आदरणीय सभापती जी मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो, अतिशय आनंदाने सांगू इच्छितो,दीर्घ काळासाठी 5-6 दशकांपर्यंत देशासमोर पर्यायी मॉडेल काय असावे  हे तराजूत तोलण्याची संधीच मिळाली नव्हती. प्रदीर्घ काळानंतर 2014 नंतर देशाला एक पर्यायी मॉडेल काय असू शकते,एक पर्यायी कार्यशैली काय असू शकते,प्राधान्यक्रम काय असू शकतो,याचे नवे मॉडेल पाहायला मिळाले आणि हे मॉडेल तुष्टीकरण नव्हे तर संतुष्टीकरणावर विश्वास ठेवते.पूर्वीच्या मॉडेल मध्ये विशेष करून कॉंग्रेसच्या कालखंडात तुष्टीकरण, प्रत्येक बाबतीत तुष्टीकरण हेच जणू काही त्यांचे राजकारणातले   सर्वस्व  ठरले होते, स्वार्थी धोरण अवलंबत राजकारण, देशाचे धोरण,सर्वांमध्ये त्यांनी घोटाळे केले.  छोट्या वर्गाला थोडेफार देऊन बाकीच्यांना आशेवर झुलवत  ठेवणे आणि निवडणुका आल्या की, पहा त्यांना मिळाले आहे, कदाचित तुम्हालाही मिळेल अशी भलामण करणे, लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आपले राजकीय तख्त सुरु ठेवणे ज्यायोगे निवडणूकीत भरघोस मते मिळत रहावीत , हेच काम चालू राहिले.      

आदरणीय सभापति जी,

भारतामध्ये जी काही संसाधने आहेत त्या सर्व संसाधनांचा सर्वोत्तम उपयोग व्हावा हाच आमचा प्रयत्न राहिला आहे. भारताकडे जो काही वेळ आहे तो वाया न दवडता प्रत्येक क्षण  देशाच्या प्रगतीसाठी, जनसामान्यांच्या कल्याणासाठी उपयोगात आणावा यासाठी आम्ही एक दृष्टीकोन स्वीकारला, संपृक्त दृष्टीकोन.जितकी चादर आहे तितकेच पाय लांब करायचे, मात्र ज्या योजना आखल्या आहेत, ज्यांच्यासाठी या योजना आखल्या आहेत त्यांना याचा शंभर टक्के लाभ झाला पाहिजे. कोणाला दिले कोणाला दिले नाही, कोणाला ताटकळत ठेवले आणि त्याला नेहमीच बाजूला ठेवत निराशेच्या खाईत ढकलणे,अशा परिस्थितीतून त्यांना बाहेर काढून आम्ही  संपृक्त दृष्टीकोनाच्या दिशेने आमचे काम पुढे नेले आहे.गेल्या दशकात आम्ही प्रत्येक स्तरावर सबका साथ,सबका विकास ही भावना वास्तवात साकारली आहे आणि त्याची फलनिष्पत्ती देशात ज्या प्रकारे परिवर्तन  दिसून येत आहे त्यातून आपल्याला प्रतीत होत आहे. सबका साथ, सबका विकास हाच आमच्या प्रशासनाचाही मूलमंत्र राहिला आहे. आमच्या सरकारने, अनुसूचित जाती-जमाती कायदा भक्कम करत दलित आणि आदिवासी समाजाचा सन्मान आणि त्यांच्या सुरक्षे संदर्भात आपल्या कटीबद्धतेचे दर्शन घडवले आहे आणि त्यात वाढही केली आहे.      

आदरणीय सभापति जी,

आज जातीयतेचे विष पसरविण्यासाठी खूप प्रयत्न होत आहेत,मात्र तीन-तीन दशकांपर्यंत दोन्ही सदनांचे इतर मागासवर्गीय खासदार आणि सर्व पक्षांचे मागासवर्गीय खासदार, सरकारांकडे मागणी करत होते की इतर मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात यावा, ती ठोकरण्यात आली,नाकारण्यात आली कारण त्या काळातल्या राजकारणाला हे अनुरूप होत नसेल कारण तुष्टीकरणाचे राजकारण आणि कुटुंब प्रथम या त्यांच्या राजकारणात ते बसत नाही तोपर्यंत त्याची चर्चाही होणार नाही.   

आदरणीय सभापति जी,

हे माझे भाग्य आहे की आम्ही सर्वांनी एकत्र येऊन तीन-तीन दशकांपासून माझ्या इतर मागासवर्गीय समाजाने ज्या मागणीबाबत आशा बाळगली होती,ज्यांच्या पदरी निराशा आली होती,आम्ही येऊन या आयोगाला संवैधानिक दर्जा दिला आणि आम्ही केवळ त्यांच्या मागणीची पूर्तता केली इतकेच नव्हे तर आमच्यासाठी त्यांचा मान-सन्मानही तितकाच महत्वाचा आहे कारण देशाच्या 140 कोटी देशवासियांना जनता जनार्दन या रूपाने पूजा करणारे आम्ही लोक आहोत.  

आदरणीय सभापति जी,

आपल्या देशात जेव्हा-जेव्हा आरक्षणाचा विषय आला तेव्हा सत्य स्वीकारत एका निकोप पद्धतीने या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला नाही.प्रत्येक बाबीत देशात दुफळी कशी होईल,तणाव कसा निर्माण होईल,एकमेकांविरुद्ध शत्रुत्व कसे निर्माण होईल अशा पद्धती वापरल्या गेल्या. देश स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा  जेव्हा प्रयत्न झाले ते अशाच पद्धतीने झाले.आमच्या सरकारने एक असे मॉडेल दिले आणि सबका साथ सबका विकास या मंत्राची प्रेरणा दिली की आम्ही सर्वसामान्य वर्गातल्या गरिबांना  10 % आरक्षण दिले.

कोणत्याही तणावाशिवाय कोणाकडूनही न काढता  जेव्हा हा निर्णय घेतला गेला तेव्हा अनुसूचित जाती समुदायानेही  त्याचे स्वागत केले, अनुसूचित जमातीनेही त्याचे स्वागत केले, इतर मागास वर्ग  समुदायानेही  त्याचे स्वागत केले, कोणालाही हा निर्णय खुपला नाही.कारण इतका मोठा निर्णय मात्र तो घेण्याची पद्धत होती  सबका साथ सबका विकास आणि तेव्हाच अतिशय शांततामय पद्धतीने संपूर्ण राष्ट्राने याचा स्वीकार केला.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्या देशात दिव्यांगांच्या प्रश्नांकडे जितक्या प्रमाणात लक्ष द्यायला हवे होते, तितक्या प्रमाणात देण्यात आले नाही, ज्यावेळी सबका साथ सबका विकास हा मंत्र असतो, तेव्हा माझे दिव्यांगजन देखील सर्वांच्या श्रेणीमध्ये असतात आणि तेव्हा कुठे आम्ही दिव्यांगासाठीच्या आरक्षणाचा विस्तार केला, दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मिशन मोडमध्ये काम केले. दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक योजना तयार केल्या, त्या योजना लागू देखील केल्या, यामुळे केवळ इतकेच नाही आदरणीय सभापती महोदय, ट्रांसजेंडर, ट्रांसजेंडर समुदायाच्या अधिकारांसंदर्भात आम्ही त्याला कायद्याच्या स्वरुपात भक्कम करण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले. सबका साथ सबका विकास या मंत्राने आपण कसे जगतो, हे आम्ही समाजाच्या त्या उपेक्षित वर्गाकडे देखील अतिशय संवेदनशीलतेने पाहिले.

आदरणीय सभापती महोदय,

भारताच्या विकासाच्या प्रवासात महिला शक्तीचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, मात्र त्यांना जर संधी मिळाली आणि धोरण निर्मितीचा त्या भाग बनल्या तर देशाच्या प्रगतीमध्ये आणखी गती येऊ शकते आणि ही गोष्ट विचारात घेऊन आम्हीच आणि या सदनाचा पहिला निर्णय झाला, आपण सर्व देशवासियांना याचा अभिमान वाटेल, हे सदन या गोष्टीसाठी लक्षात ठेवले जाईल, हे नवे सदन केवळ त्याच्या रुंगरुपासाठी नव्हे तर हा नव्या सदनाचा पहिला निर्णय होता, नारी शक्ती वंदन अधिनियम. या नव्या सदनाची सुरुवात आम्ही इतर कोणत्या प्रकारे देखील करू शकलो असतो. आम्ही आमच्या गौरवासाठी देखील वापर करू शकलो असतो, पूर्वी देखील होत असायचे, पण आम्ही तर मातृशक्तीच्या गौरवासाठी या सदनाचा प्रारंभ केला होता आणि मातृशक्तीच्या आशीर्वादाने या सदनाने आपला कार्यारंभ केला आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्याला माहीत आहेच, आपण जरा इतिहासाकडेही नजर टाकूया, म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काँग्रेसला किती द्वेष होता, त्यांच्याविषयी किती राग होता आणि कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीने काँग्रेस पक्ष चिडायचा आणि याचे सर्व, याचे सर्व दस्तावेज उपलब्ध आहेत आणि या रागामुळे बाबासाहेबांना दोन दोनदा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी त्यांनी काय काय केले नाही. कधीही बाबासाहेबांना, कधीही बाबासाहेबांना भारत रत्नसाठी योग्य मानण्यात आले नाही.

आदरणीय सभापती महोदय,

कधीही बाबासाहेबांना भारत रत्नसाठी योग्य मानण्यात आले नाही, इतकेच नाही आदरणीय सभापती महोदय, या देशाच्या लोकांनी बाबासाहेबांच्या भावनेचा आदर केला, सर्व समाजाने आदर केला आणि त्यामुळे आज नाईलाजाने, आज नाईलाजाने काँग्रेसला जय भीम बोलावे लागत आहे, त्यांचे तोंड सुकून जाते आणि आदरणीय सभापती महोदय, हा काँग्रेस पक्ष रंग बदलण्यात तरबेज वाटत आहे, इतक्या वेगाने आपला मुखवटा बदलतात, हे यातून अगदी स्पष्ट दिसत आहे.  

आदरणीय सभापती महोदय,

तुम्ही काँग्रेसचा अभ्यास कराल तर काँग्रेसच्या राजकारणासारखा आमचा मूलमंत्र राहिला सबका साथ सबका विकास, त्या प्रकारे त्यांचा नेहमीच हा प्रयत्न राहिला की दुसऱ्याची रेषा लहान करायची आणि याच कारणामुळे त्यांनी सरकारांना अस्थिर केले, कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार कुठे स्थापन झाले तर त्याला अस्थिर केले, कारण  दुसऱ्याची रेषा लहान करायची,  याचात कामात ते गुंतून राहिले आणि त्यांनी हा जो मार्ग निवडला आहे ना दुसऱ्यांची रेषा लहान करण्याचा, लोकसभेच्या नंतरही जे त्यांच्या सोबत होते, ते देखील पळून जात आहेत, कारण त्यांना कळून चुकले की हे तर आपल्याला देखील मारून टाकतील आणि हाच त्यांच्या धोरणांचा परिणाम आहे की आज ही परिस्थिती काँग्रेसची झाली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असलेला पक्ष, इतकी दुर्दशा, हे इतरांच्या रेषा लहान करण्यात आपली शक्ती खर्च करत आहेत ना, जर त्यांनी स्वतःची रेषा मोठी केली असती, तर त्यांची ही दशा झाली नसती आणि मी न मागता सल्ला देत आहे, तुम्ही तुमची रेषा मोठी करण्यासाठी कष्ट करा, जरा विचार करा, तर कधी ना कधी देश तुम्हाला देखील इथे 10 मीटर अंतरावर येण्याची संधी देईल.   

आदरणीय सभापती महोदय,

बाबासाहेबांनी एससी एसटी समुदायांच्या मूलभूत समस्या अतिशय बारकाईने जाणून घेतल्या होत्या, अतिशय सखोलपणे विचार केला होता आणि ते स्वतः देखील एक पीडित होते, त्यामुळे एक वेदना होती, सल देखील होती आणि समाजाचे कल्याण करण्याची तळमळ देखील होती.आणि बाबासाहेबांनी एससी एसटी समुदायाच्या आर्थिक उन्नतीसाठी एक स्पष्ट आराखडा देशासमोर सादर केला होता. त्यांच्या

विचारातून सादर होत होता. आणि बाबासाहेबांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. त्यांचे शब्द मी वाचून दाखवतो. बाबासाहेब म्हणाले होते, “ भारत एक कृषीप्रधान देश आहे, मात्र दलितांसाठी हे उपजीविकेचे मुख्य साधन बनूच शकत नाही”, हे बाबासाहेब म्हणाले होते. त्यांनी पुढे सांगितले होते याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे जमीन खरेदी करणे त्यांच्या ताकदीच्या बाहेर आहे, दुसरी गोष्ट म्हणजे जरी त्यांच्याकडे पैसे असले तरीही जमीन खरेदी करण्यासाठी त्यांना वाव नाही. बाबासाहेबांनी हे एक मूल्यमापन  केले होते. आणि या परिस्थितीचे मूल्यमापन करत त्यांनी जी सूचना केली होती, त्यांनी जो आग्रह केला होता, त्यांनी आग्रह धरला होता की दलितांसोबत, आमच्या आदिवासी बंधू भगिनींसोबत, वंचितांसोबत जो अन्याय होत आहे, ज्या प्रकारे त्यांना नाईलाजाने अडचणींमध्ये जीवन जगावे लागत आहे याचा एक उपाय आहे. देशामध्ये औद्योगिकीकरणाला चालना दिली जावी, औद्योगिकीकरणाचे पुरस्कर्ते होते बाबासाहेब. कारण औद्योगिकीकरण करण्यामागे त्यांची संकल्पना स्पष्ट होती, कौशल्य आधारित नोकऱ्या आणि उद्यमशीलतेसाठी आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी दलित आदिवासी समूहांना एक संधी मिळेल आणि तिला ते उत्थानाचे एक सर्वात महत्त्वाचे हत्यार मानत होते. मात्र,  स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतरही, इतकी वर्षे काँग्रेसला सत्तेत राहण्याची संधी मिळाली तरीही बाबासाहेबांच्या या सूचनांची दखल घेण्याचा वेळ त्यांना मिळाला नाही. त्यांनी बाबासाहेबांचा हा विचार पूर्णपणे फेटाळून लावला. एससी, एसटी समुदायाची आर्थिक लाचारी संपुष्टात आणण्याची बाबासाहेबांची इच्छा होती. त्याच्या अगदी उलट असे काम काँग्रेसने केले आणि याला अधिक गंभीर संकट बनवले.  

आदरणीय सभापती महोदय,

2014 मध्ये आमच्या सरकारने या विचारसरणीत बदल केला आणि आम्ही प्राधान्य देत कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि औद्योगिक वृद्धीवर भर दिला. आम्ही पीएम विश्वकर्मा योजना तयार करून समाजाचा तो भाग ज्याच्या शिवाय समाजाची रचनाच होऊ शकणार नाही आणि प्रत्येक गावातील लहान लहान स्वरुपात विखुरलेला समाज, पारंपरिक काम करणारे आमचे विश्वकर्मा बंधू-भगिनी, लोहार असो, कुंभार असो, समाजातील सोनार असो, असे सर्व वर्गातील लोक आहेत, पहिल्यांदाच देशात त्यांच्या विषयी चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यांना प्रशिक्षण देणे, तंत्रज्ञान अद्ययावतीकरणासाठी नवी अवजारे देणे, डिझाइनिंग मध्ये त्यांना सहाय्य करणे, त्यांच्यासाठी बाजार उपलब्ध करणे, अशा सर्व दिशांनी एक विशेष काम म्हणून आम्ही अभियान चालवले आहे आणि समाजाचा हा असा वर्ग आहे ज्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही आणि समाज रचनेत ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे, त्या विश्वकर्मा समाजाची आम्ही चिंता केली.

आदरणीय सभापती महोदय,

आम्ही मुद्रा योजना सुरू करून ज्या लोकांना पहिल्यांदाच उद्योग क्षेत्रात यायचे होते त्यांना निमंत्रित केले, त्यांना प्रोत्साहन दिले. विना तारण कर्ज देणारे एक खूप मोठे अभियान आम्ही चालवले जेणेकरून समाजात हा एक खूप मोठा समुदाय आहे जो आत्मनिर्भरतेची आपली स्वप्ने साकार करू शकेल आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळाले.   

आम्ही आणखी एक योजना आखली आहे, स्टँड अप इंडिया, ज्याचा उद्देश होता  एससी आणि एसटी समाजातील आपल्या बंधू-भगिनींना, तसेच कोणत्याही समाजातील महिलांना, त्यांना बँकेकडून एक कोटी रुपयांचे विना तारण कर्ज मिळावे, ज्यामुळे ते स्वत:चे काम करू शकतील, आणि यावेळी आम्ही अर्थसंकल्पात ते दुप्पट केले आहे, आणि मी पाहिले आहे की लाखो असे युवा या उपेक्षित समाजातील, किंवा लाखो भगिनींनी आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू केला आहे आणि  स्वतःसाठी रोजगार तर मिळवला आहे, मात्र त्यांनी इतर एक-दोन जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

प्रत्येक कारागिराचे सक्षमीकरण, प्रत्येक समाजाचे संपूर्ण सक्षमीकरण आणि जे बाबासाहेबांचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्याचे काम मुद्रा योजनेच्या माध्यमातून आम्ही केले आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

ज्यांना कोणी विचारले नाही, त्यांना मोदी पूजतात. गरीब, वंचित यांचे कल्याण ही आमची प्राथमिकता आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पातही आपण पाहू शकता, चर्मोद्योग , पादत्राणे उद्योग, अशा अनेक छोट्या - छोट्या परिघांच्या विषयांना आम्ही स्पर्श केला आहे . याचा सर्वात मोठा फायदा गरीब आणि वंचित समुदायातील लोकांना मिळणार आहे, ही या अर्थसंकल्पातील घोषणा आहे. आता उदाहरण म्हणून खेळण्यांविषयी  बोलायचे झाले तर, समाजातील याच प्रकारच्या घटकांतील लोकच खेळणी तयार करण्याच्या कामात आहेत. आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक गरीब कुटुंबांना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मदत देण्यात आली आहे. त्याचा परिणाम आज आपण पाहतो आहोत की, आधी आपण खेळणी आयात करण्याच्या सवयीमध्ये अडकलो होतो, पण आता आपली खेळणी तीन पट निर्यात होत आहेत. याचा फायदा समाजाच्या अगदी खालच्या थरातील, संकटांमध्ये जगणाऱ्या समुदायाला मिळत आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आपल्या देशात एक अत्यंत मोठा समाज आहे, मच्छीमार समाज. या मच्छीमार बांधवांसाठी आम्ही स्वतंत्र मंत्रालय तर स्थापन केलेच, पण ज्या सुविधा किसान क्रेडिटमधून शेतकऱ्यांना मिळत होते, त्या सर्व सुविधा आम्ही आपल्या मच्छीमार बंधू-भगिनींनाही दिल्या आहेत. ही सुविधा दिली, स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले, हे काम केले आणि जवळपास 40,000 कोटी रुपये यामध्ये समाविष्ट केले आहेत! मत्स्य व्यवसाय क्षेत्रावर अधिक भर दिला आहे आणि या प्रयत्नांचा परिणाम असा झाला आहे की, आपले मासे उत्पादन दुप्पट आणि निर्यातही दुप्पट झाली आहे, आणि याचा थेट फायदा आपल्या मच्छीमार बंधू-भगिनींना झाला आहे. म्हणजे समाजातील सर्वात उपेक्षित असलेल्या आपल्या बांधवांनाअधिक प्राधान्य देऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आज जे जातीयतेचे विष पसरवण्याची ज्यांना नवा  छंद जडला आहे,  आपल्या देशातील आदिवासी समाज,  त्या आदिवासी समाजामध्येही अनेक स्तर आहेत. काही समूह असे आहेत, ज्यांची संख्या खूपच कमी आहे आणि जे देशभर 200-300 ठिकाणी विखुरलेले आहेत. त्यांची एकूण लोकसंख्या खूपच अल्प आहे, पण ते फारच उपेक्षित राहिले आहेत. त्याबद्दल तपशीलवार माहिती घेतली तर  हृदय हेलावून जाते. आणि माझं भाग्यच होतं की या विषयावर मला राष्ट्रपती महोदयांकडून खूप मार्गदर्शन मिळाले, कारण त्या समाजाला राष्ट्रपती महोदय फारच जवळून ओळखतात. आणि त्यापैकीच आदिवासी समाजामधील अत्यंत वंचित अवस्थेत जगणारे जे छोट्या स्तरावरचे लोक आणि विखुरलेल्या लोक आहेत त्यांचा विशेषत्वाने या योजनेत समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी आम्ही पीएम जनमन योजना सुरू केली आणि 24,000 कोटी रुपये, ज्यामुळे त्यांना त्या सुविधा मिळाव्यात, त्यांच्या कल्याणाची कामे व्हावीत आणि सर्वप्रथम ते सुद्धा इतर आदिवासी समाजाच्या बरोबरीला पोहोचावेत. त्यानंतर संपूर्ण समाजाची बरोबरी करण्यासाठी सक्षम व्हावेत, त्या दिशेने आम्ही काम केले आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची काळजी तर वाहिली आहेच, आम्ही देशाच्या विविध भौगोलिक भागांतही अशी काही परिस्थिती आहे, की जिथे अजूनही प्रचंड मागासलेपण आहे. जसे की आपली सीमावर्ती गावे – जी मागासलेली गावे म्हणून दुर्लक्षित केली गेली, जी शेवटची गावे म्हणून दुर्लक्षित केली गेली. आम्ही सर्वात आधी मानसिकतेत बदल घडवले. आपण जे यापूर्वी दिल्ली आधी नंतर हळू निघूनच जाईल, हे आम्ही बदलले.

आम्ही ठरवले की सीमावर्ती जे लोक आहेत ते पहिले. जिथे सूर्याची पहिली किरणे पडतात आणि जिथे सूर्याची शेवटची किरणेही ज्यांच्यापाशी असतात, अशा शेवटच्या गावांना ज्यांना आम्ही पहिली गावे म्हणून विशेष दर्जा देत, विशेष योजना आखत, आम्ही त्यांच्या विकासकामांना इतकेच नाही तर त्यांना इतके प्राधान्य दिले की मी गेल्या कार्यकाळात मंत्रिमंडळातील सदस्यांना अशा दुर्गम गावांमध्ये 24 तास राहण्यास पाठवले. आणि तापमान उणे 15 डिग्री असलेली काही गावे होती, तिथेही आमचे मंत्री  प्रत्यक्ष जाऊन राहिले. त्यांना समजून घेण्याचा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.  आम्ही, तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी च्या निमित्ताने ज्या मान्यवरांना निमंत्रित केले जाते, त्यामध्येही ही जी सीमांवर वसलेली आमची पहिली गावे आहेत, आज त्यांच्या प्रमुखांना आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आमंत्रित केले जाते. राष्ट्रपती महोदयांचे इथे 'अॅट होम' होतात, कारण आम्ही आमचा प्रयत्न आहे सबका साथ, सबका विकास, आणि आम्ही सतत शोध घेत असतो की अजून कोणापर्यंत पोहोचायचे बाकी आहे? चला, लवकर करा!

आदरणीय अध्यक्ष महोदय,

वायब्रंट व्हिलेज योजना ही देशाच्या सुरक्षेसाठीदेखील अत्यंत महत्त्वाची ठरू लागली आहे, खूपच उपयुक्त ठरत आहे. आणि आम्ही त्यावरही विशेष भर देत आहोत.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

राष्ट्रपती महोदयांनी प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या अभिभाषणात राज्यघटनाकारांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले आहे. मी आज अत्यंत समाधानाने सांगू इच्छितो की आपल्या घटनाकारांची जी भावना होती, त्याचाच सन्मान राखत, त्यापासून प्रेरणा घेत, आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. काही लोकांना वाटते की ही UCC (सार्वत्रिक नागरी संहिता) यात काय आणले आहे ?  पण जे संविधान सभेच्या चर्चांचा अभ्यास करतील, त्यांना हे समजेल की त्या भावनेला इथे आकार  देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. काहींसाठी राजकारण आडवे येत असेल, पण आम्ही घटनाकारांच्या या भावनेला जगतो ना, तेव्हा कुठे हे धाडस करू शकतोय आणि दृढनिश्चयाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

घटनाकारांचा सन्मान राखला गेला पाहीजे होता, घटनाकारांच्या प्रत्येक विचारातून प्रेरणा घ्यायला हवी होती. पण हीच काँग्रेस आहे, जिने स्वातंत्र्यानंतर लगेचच घटनाकारांच्या भावनांची पायमल्ली केली, आणि हे मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे. आपण कल्पना करू शकता का की जेव्हा देशात निवडून आलेले सरकार नव्हते. केवळ निवडणुकीपर्यंतचे तात्पुरते प्रशासन (स्टॉपगॅप अरेंजमेंट) होते. त्या तात्पुरत्या व्यवस्थेत बसलेल्या ज्या व्यक्ती होत्या, त्याने घटनेत बदल केला. आल्या आल्याच. निवडून आलेल्या सरकारने हे केले असते, तर कदाचित समजू शकले असते, पण त्यांनी तेवढी प्रतीक्षा देखील केली नाही. आणि केले तरी काय, त्यांनी मुक्त अभिव्यक्तीच्या अधिकार (Freedom of Speech) पायदळी तुडवला, फ्रीडम ऑफ स्पीचला पायदळी तुडवले, वर्तमानपत्रे आणि माध्यमांवर निर्बंध लादले आणि लोकशाहीवादी लोकशाहीवादी असा शिक्का लावून फिरत राहिले जगभर .

देशातील लोकशाहीचा एक महत्त्वाच्या स्तंभाला पायदळी तुडवण्याचे काम झाले, आणि हा संविधानाच्या मूळ भावनांचाच पूर्णतः अनादर होता.

आदरणीय सभापतीजी,  

वरिष्ठ नेते आदरणीय खरगे यांचा मी कायमच सन्मान करत राहीन आणि इतका प्रदीर्घ कालावधी सार्वजनिक जीवनात घालवणे, ही छोटी गोष्ट नाही. या देशात शरद राव असोत किंवा खरगेजी असोत, त्यांचा मी कायमच सन्मान करतो. आमचे देवगौडा जी येथे उपस्थित आहेत, त्यांचेही जीवन असामान्य सिद्धींचे आहे. खरगेजी, तुम्हाला तुमच्या घरी या गोष्टी ऐकायला मिळणार नाहीत, त्यामुळे मीच सांगतो.  
या वेळी मी पाहत होतो की खरगेजी कविता वाचत होते, पण ज्या गोष्टी ते सांगत होते आणि तुम्ही योग्यच ओळखले की, “जरा सांगा, ही कविता कधीची आहे?” त्यांना ठाऊक होते, सभापतीजी, त्यांना ठाऊक होते की ही कविता कधीची आहे. काँग्रेसच्या आतल्या दुर्दशेचे त्यांना इतके दुःख झाले होते, पण तिथे परिस्थिती अशी आहे की बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी विचार केला की हा चांगला मंच आहे, इथेच बोलून टाकू. म्हणूनच त्यांनी नीरज यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाची स्थिती येथे मांडली.

आदरणीय सभापतीजी,  

खरगेजींना मी आज त्याच कवी नीरज यांच्या काही ओळी ऐकवू इच्छितो. काँग्रेस सरकारच्या काळात नीरजजींनी या कविता लिहिल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी म्हटले होते – "है बहुत अंधियारा, अब सूरज निकलना चाहिए, जिस तरह से भी हो, यह मौसम बदलना चाहिए।" नीरजजींनी काँग्रेसच्या त्या कालखंडात ही कविता मांडली होती.  

1970 मध्ये, जेव्हा देशभर काँग्रेसचेच वर्चस्व होते, त्याच काळात नीरजजींचा आणखी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता – "फिर दीप जलेगा।" हरिओमजी अभ्यासू आहेत, त्यामुळे त्यांना निश्चितच माहिती असेल की त्या वेळी हा संग्रह आला होता. या संग्रहात त्यांनी म्हटले होते, आणि हे खूप महत्त्वाचे आहे – "मेरे देश उदास न हो।"नीरजजींनी त्यांच्या कवितेत सांगितले होते – "मेरे देश उदास ना हो, फिर दीप चलेगा, तिमिर ढलेगा।" आणि हे आपले मोठे सौभाग्य आहे की आपले प्रेरणास्थान, आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनीही 40 वर्षांपूर्वी म्हटले होते – "सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा।"

आदरणीय नीरजजींनी ज्या गोष्टी मांडल्या होत्या, त्या खरोखरच विचार करण्यासारख्या आहेत. जेव्हा काँग्रेसचे राज्य होते,तेव्हा "सूरज चमकता रहा,देश अंधेरे में रहता रहा।"अनेक दशकांपर्यंत देश अशाच परिस्थितीत अडकून राहिला.

आदरणीय सभापतीजी,

गरीबांना सामर्थ्य देण्यासाठी, त्यांना सशक्त करण्यासाठी जितके काम आमच्या कार्यकाळात झाले आहे,तसेच आमच्या सरकारने जितके काम केले आहे, तितके यापूर्वी कधीही झाले नव्हते.गरीबांचे सशक्तीकरण आणि "गरीबच गरीबीवर मात करेल," या दिशेने आम्ही योजनांना आकार दिला आहे.  

माझ्या देशातील गरीबांवर मला पूर्ण विश्वास आहे, त्यांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे.जर त्यांना संधी मिळाली, तर ते कोणतीही आव्हाने पार करू शकतात; आणि गरीबांनी ते करूनही दाखवले आहे.सरकारच्या योजना, संधींचा लाभ घेत, सशक्तीकरणाच्या माध्यमातून 25 कोटी लोकांनी गरीबीवर विजय मिळवला आहे.

25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढणे, हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे.आम्ही हे मोठे कार्य साध्य केले आहे. जे लोक गरीबीमधून बाहेर आले आहेत, त्यांनी कठोर परिश्रम करून, सरकारवर विश्वास ठेवून, योजनांना आधार मानून प्रगती साधली आहे. त्यामुळे आज, गरीबीवर मात करत एक नवीन मध्यमवर्ग आमच्या देशात तयार झाला आहे.

आदरणीय सभापतीजी,

माझे सरकार नवमध्यमवर्ग आणि मध्यमवर्गासोबत ठामपणे उभे आहे, ते पूर्ण वचनबद्धतेने त्यांच्या पाठिशी उभे आहे. आज हा नवमध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग म्हणजे देशाला गती देणारी मोठी शक्ती आहे, देशाची नवी ऊर्जा आहे आणि देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा आधार आहे.  
आम्हाला मध्यमवर्ग आणि नवमध्यमवर्गाच्या सामर्थ्याला अधिक बळ द्यायचे आहे. त्यामुळेच या वर्षीच्या अर्थसंकल्पात कर सवलतीचा मोठा निर्णय आम्ही घेतला आहे.

2013 मध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्ती होती. मात्र, आज आम्ही ती मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवली आहे.

याशिवाय, 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही समाजातील असो, आम्ही 'आयुष्मान भारत' योजनेचा लाभ दिला आहे; आणि त्याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय वृद्ध नागरिकांना होत आहे.

माननीय सभापतीजी,

आम्ही देशात चार कोटी घरे बांधून देशवासीयांना दिली.त्यापैकी एक कोटीहून अधिक घरे शहरांमध्ये बांधली गेली आहेत.घर खरेदी करणाऱ्यांसोबत मोठी फसवणूक व्हायची, त्यांना सुरक्षा पुरवणे खूप गरजेचे होते आणि या सभागृहात आम्ही रेरा कायदा बनवला आहे, जो मध्यमवर्गीयांच्या घराच्या स्वप्नातील अडथळे दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे शस्त्र बनला आहे.यावेळी अर्थसंकल्पात स्वामी हा उपक्रम आणला आहे… जे गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत, ज्यात मध्यमवर्गीयांचा पैसा अडकला आहे आणि त्यांच्या सुविधा अडकल्या आहेत, त्या दृष्टीने मध्यमवर्गाची ती स्वप्ने पूर्ण व्हावीत यासाठी आम्ही या अर्थसंकल्पात 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

माननीय सभापतीजी,

स्टार्टअप्सची जी क्रांती आज जगाने पाहिली आहे आणि त्यांचा एक प्रभाव देखील आहे….हे स्टार्टअप्स चालवणारे कोण आहेत…. हे स्टार्टअप चालवणारे तरुण बहुतांशी मध्यमवर्गीय तरुण आहेत. आज संपूर्ण जग भारताकडे आकर्षित झाले आहे. विशेषत: देशात 50-60 ठिकाणी झालेल्या जी-20 समुहाच्या बैठकींमुळे.पूर्वी प्रत्येकजण भारत म्हणजे दिल्ली, मुंबई किंवा बंगळुरु मानत असत, त्यांना आता भारताच्या विशालतेची-व्याप्तीची जाणीव झाली आहे….

आज भारताच्या पर्यटनाकडे जगाचे आकर्षण वाढले आहे आणि जेव्हा पर्यटन वाढते, तेव्हा व्यवसायाच्या अनेक संधीही चालून येतात…. त्याचा लाभ आपल्या मध्यमवर्गीयांना भरपूर मिळणार आहे… त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत म्हणून!

माननीय सभापतीजी,

आज आपला मध्यमवर्ग आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि हे विलक्षण आहे…यातूनच देशाची खूप मोठी क्षमता निर्माण होते, बळ वाढते आणि मला पूर्ण विश्वास आहे की विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी भारतातील मध्यमवर्ग कंबर कसून सज्ज झाला आहे….आपल्या सोबत वाटचाल करत आहे.

माननीय सभापतीजी,

विकसित भारत घडवण्यात सर्वात मोठा वाटा देशातील तरुणाईचा आहे…लोकसंख्येच्या ताकदीवर, त्यातून मिळणाऱ्या लाभावरही आमचा भर आहे… जे सध्या शाळा-महाविद्यालयात शिकत आहेत, ते विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी होणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात एक स्वाभाविक भावना आहे की त्यांचे वय जसजसे वाढत जाईल तसतसा देशाच्या विकासाचा प्रवास पुढे सरकेल आणि त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधील आपली तरुणाई हे एक मोठे सामर्थ्य आहे….विकसित भारताचा तो एक प्रकारे आधार-पाया आहे.  गेल्या 10 वर्षांत, आम्ही हा विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक धोरण आखून काम केले आहे.  एकविसाव्या शतकातील शिक्षण कसे असावे….शिक्षण धोरणाबाबत याआधी कधी कोणता विचारही केला गेला नव्हता…..जे चाललय तसच चालू देत…जे होईल ते होऊ द्या!  जवळपास तीन दशकांच्या कालावधीनंतर, आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले.  या धोरणा अंतर्गत अनेक उपक्रम आहेत, त्यापैकी एक, पीएम श्री स्कूल या शाळांबाबत मी बोलत आहे. या पी एम श्री शाळा उपक्रमा अंतर्गत आज जवळपास 10 ते 12000 शाळा आधीच बांधल्या आहेत आणि आम्ही नवीन शाळा बांधण्याच्या दिशेने पुढे जात आहोत.

माननीय सभापतीजी,

शैक्षणिक धोरणात बदल करून आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आम्ही मातृभाषेतून अभ्यास आणि मातृभाषेत परीक्षा यावर भर दिला आहे. देश स्वतंत्र झाला,पण काही ठिकाणी या गुलामगिरीच्या मानसिकतेने जखडून ठेवले होते, त्यात आपली भाषाही होती.  आपल्या मातृभाषांवर घोर अन्याय झाला आहे आणि गरिबांची मुले, दलितांची मुले, आदिवासींची मुले, वंचितांची मुले…त्यांना भाषा येत नाही म्हणून त्यांची प्रगती थांबली होती. हा त्यांच्यावर घोर अन्याय होता आणि सबका साथ, सबका विकास (सर्वांचे सहकार्य, सर्वांचा विकास) या मंत्राने मला शांत झोपू दिले नाही आणि म्हणूनच… देशात शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे, डॉक्टर मातृभाषेतून झाले पाहिजे, अभियंते (इंजिनिअर) मातृभाषेतून घडले पाहिजेत,असे मी म्हणालो. ज्यांना इंग्रजी शिकण्याची संधी मिळाली नाही त्यांची क्षमता आपण केवळ त्या कारणासाठी रोखू शकत नाही.  आपण खूप मोठा बदल घडवून आणला आहे आणि त्यामुळे एका गरीब आईच्या आणि विधवेच्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचे स्वप्न बघायला सुरुवात केली आहे. आम्ही आदिवासी तरुणाईसाठी एकलव्य मॉडेल स्कूलचा व्याप वाढवला आहे.10 वर्षांपूर्वी सुमारे 150 एकलव्य शाळा होत्या.  आज त्या 470 झाल्या असून आता आणखी 200 एकलव्य शाळा उभारण्याकडे आपण वाटचाल करत आहोत.


माननीय सभापतीजी,

आम्ही सैनिकी शाळांमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत आणि सैनिकी शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाची देखील व्यवस्था केली आहे. आपण स्वतः सैनिकी शाळेचे विद्यार्थी राहिला आहात.  पूर्वी मुलींसाठी या शाळांचे दरवाजे बंद होते आणि सैनिकी शाळांचे महत्त्व काय आहे हे तुम्हालाही माहीत आहे…..त्यांचे सामर्थ्य काय आहे, ज्या शाळेने तुमच्यासारख्यांना जन्म दिला आहे. आता ही संधी माझ्या देशाच्या कन्यांनाही मिळणार आहे.  आम्ही सैनिकी शाळेचे दरवाजे उघडले आहेत.  आणि सध्या आपल्या शेकडो मुली या देशप्रेमाच्या वातावरणात शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये देशासाठी जगण्याची तळमळ स्वाभाविकपणे वाढत आहे.

माननीय सभापतीजी,

तरुणाईच्या जडणघडणीत एनसीसीचा मोठा वाटा आहे.  आपल्या सर्वांपैकी जो कोणी एनसीसी च्या संपर्कात आला आहे त्यांना माहीत आहे की त्या वयात आणि त्या काळात माणसाच्या विकासाची, सर्वांगीण विकासाची खूप सुवर्णसंधी असते….तिला वाव मिळतो. गेल्या काही वर्षांत एनसीसीचा मोठा विस्तार झाला आहे….पूर्वी तो देखील रखडला होता.  2014 पर्यंत एनसीसीमध्ये सुमारे 14 लाख कॅडेट्स होते, आज ही संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे.

माननीय सभापतीजी,

देशातील तरुणाईमध्ये जो आवेश आहे…उत्साह आहे… काहीतरी नवीन करण्याची त्यांची जिद्द, रोजच्या कामाच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करुन दाखवण्याची त्यांची इच्छा…..हे सर्व स्पष्टपणे दिसून येते.  जेव्हा मी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली तेव्हा मी पाहिले की आजही अनेक शहरातील तरुणाईचे गट त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या प्रेरणेने स्वच्छता अभियान पुढे नेत आहेत.  काही जण झोपडपट्टीत जाऊन शिक्षणासाठी काम करत आहेत, तर अनेक तरुण इतर काही ना काही करत आहेत.  या सर्व गोष्टी पाहून आम्हाला असे वाटले की देशातील तरुणाईला संधी मिळाली पाहिजे. संघटित प्रयत्न झाले पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही माय भारत नावाची चळवळ सुरू केली आहे.  माझा तरुण भारत, माय भारत!  आज दीड कोटींहून अधिक तरुणांनी त्यात आपली नोंदणी केली आहे आणि ते सक्रियपणे चर्चा करत आहेत, विचारमंथन करत आहेत आणि देशाच्या वर्तमान समस्यांबद्दल समाजाला जागरूक करत आहेत….स्वयंप्रेरणेने सक्रियपणे ते हे सर्व करत आहेत.  त्यांना चमच्याने भरवण्याची (स्पून फिडींग) गरज नाही, ते त्यांच्या परीने चांगली कामे करून पुढे जात आहेत.

माननीय सभापतीजी,

क्रीडा क्षेत्र हे खिलाडू वृत्तीला जन्म देते आणि ज्या देशात खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो, त्या देशात ही  खिलाडू वृत्ती आपोआप फोफावते. क्रीडा गुणवत्तेला खतपाणी घालण्यासाठी आम्ही अनेक पैलूंवर काम सुरू केले आहे.  देशातील तरुणाईला संधी मिळावी या दृष्टीने खेळांकरता आवश्यक पायाभूत सुविधा आणि आवश्यक आर्थिक पाठबळ देण्यासाठी आम्ही भरभक्कम मदत केली आहे. लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजना (टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम स्कीम) आणि खेलो इंडिया मोहिम, या योजनांमध्ये आपल्या क्रीडा परिसंस्थेला पूर्णपणे बदलण्याची ताकद आहे आणि आपण ते अनुभवत देखील आहोत.गेल्या 10 वर्षात झालेल्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने आपला झेंडा फडकवला आहे, भारताने आपली ताकद दाखवली आहे, भारतातील तरुणाईने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे आणि यात आपल्या मुलीही तितक्याच जोरदारपणे  भारताची ताकद जगाला दाखवून देत आहेत.

आदरणीय सभापती महोदय,

कोणत्याही देशाच्या विकसनशील ते विकसित देश या प्रवासात  लोककल्याणकारी कामांचे स्वतःचे एक महत्त्व असते. पायाभूत सुविधा हा देखील त्यातील महत्त्वाचा भाग  असतो. प्रचंड ताकद असते.  विकसनशील ते विकसित देश होण्याचा प्रवास पायाभूत सुविधांमधूनच जातो. आम्ही पायाभूत सुविधांचे महत्त्व समजून घेतले आणि त्यावर भर दिला आहे. आज जेव्हा पायाभूत सुविधांविषयी बोलले जाते, तेव्हा त्या वेळेवर पूर्ण होणेही महत्त्व आहे. ज्या गोष्टींचा आपण विचार करतो, नियोजन करतो, त्याची गरज जाणून घेतली पाहिजे.  त्या प्रलंबित राहिल्या तर त्याचे फायदे मिळत नाहीत. त्यामुळे करदात्याचा पैसा वाया जातो आणि राष्ट्राला त्याचा कोणताही फायदा होत नाही. आपण त्या अनेक वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहातो, त्यामुळे खूप मोठे नुकसान होते ज्याचे शब्दांत वर्णन करता येत नाही.

काँग्रेसच्या कालखंडात रखडणे, दिशाभूल करणे, प्रलंबित ठेवणे ही त्यांची संस्कृती झाली होती आणि यामुळे आणि तो त्यांच्या राजकारणाचा भाग असल्याने, कोणता प्रकल्प करायचा, कोणत्याला परवानगी द्यायची नाही, यामध्ये राजकीय मोजमाप असे. सर्वांची साथ, सर्वांचा विकास हे धोरण नव्हते. काँग्रेसच्या या संस्कृतीपासून मुक्त होण्यासाठीच आम्ही प्रगती नावाची एक प्रणाली तयार केली आणि नियमितपणे मी स्वतः 'प्रगती' प्रणालीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे तपशीलवार निरीक्षण करतो. कधी कधी ड्रोनच्या माध्यमातून त्या परिसराचे छायाचित्रण आणि प्रत्यक्ष संवाद साधतो, त्या सर्वांमध्ये मी जास्त सहभाग घेतो. जवळपास १९ लाख कोटी रुपयांचे असे प्रकल्प रखडले होते, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने, राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय नसल्याने किंवा एका विभागाचा दुसऱ्या विभागाशी समन्वय नसल्याने, फायलींमध्ये प्रलंबित राहिले असतील. या साऱ्या गोष्टींचा आढावा घेतो आणि त्यावर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने, त्या 'प्रगती' वर, आमच्या पुढाकारावर अभ्यास करून एक चांगला अहवाल सादर केला आहे.  त्यात मोठी सूचना केली आहे. त्यांना 'प्रगती' या पुढाकारा विषयी मी सांगितले. त्यांनी असं म्हटलेय की, प्रगतीच्या अनुभवातून शिकून अन्य विकसनशील देशांनाही पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये क्रांती घडवून आणण्याची मौल्यवान संधी मिळणार आहे.  सर्वच विकसनशील देशांसाठी त्यांनी ही सूचना  आहे. देशाचे कसे नुकसान झाले हे समजून घेण्यासाठी, पूर्वी कामे कशा पद्धतीने व्हायची, याच, वस्तुस्थितीसह, काही उदाहरणे देऊ इच्छितो. कोणत्याही एका व्यक्तिने जाणूनबुजून हे केले असेही मी म्हणत नाही. मात्र, एक संस्कृती विकसित झाली आणि त्याचा परिणाम झाला. उत्तरप्रदेशात, शेतीसाठी एक योजना होती, शरयू कालवा प्रकल्प. शरयू कालवा परियोजना 1972. विचार करा 1972 मध्ये मंजूर झाली. पाच दशकांपर्यंत प्रलंबित राहिली. 1972 मध्ये ज्या योजनेचा विचार केला गेला होता. योजना तयार केली गेली होती.त्याला फाईलवर मंजूरी मिळाली होती. 2021 मध्ये आम्ही आल्यावर पूर्णत्वास नेली.

आदरणीय सभापती महोदय,

जम्मू-काश्मिरच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्गाला 1994 मध्ये स्वीकृती मिळाली होती. 1994 पासून हा रेल्वेमार्ग प्रलंबित राहिला. तीन दशकांनंतर शेवटी आम्ही 2025 मध्ये तो पूर्ण केला.

आदरणीय सभापती महोदय,

ओडिसाच्या हरिदासपूर-पारदीप रेल्वेमार्गाला 1996 मध्ये मंजुरी मिळाली होती. ती देखील अनेक वर्ष प्रलंबित राहिली होती आणि 2019 मध्ये आमच्या कार्यकाळात ती पूर्ण झाली.

आदऱणीय सभापती महोदय,

आसाममधील बोगीबिल पूलाला 1998 मध्ये मंजुरी मिळाली होती. तो देखील आमच्या सरकारने 2018 मध्ये पूर्ण केला. आणि अशी शेकडो उदाहरणे मी आपल्याला देऊ शकतो. रखडवणे, लटकवणे, दिशाभूल करण्याच्या संस्कृतीने देशाला किती उद्धवस्त केले आहे. याची शेकडो उदाहरणे मी देऊ शकतो.काँग्रेसने आपल्या कार्यकाळात,देशाचा प्रगतीचा हक्क होता, जी होण्याची शक्यताही होती ती प्रगती न करता किती नुकसान केले आहे, याचा कल्पना तुम्ही करू शकता.

पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये योग्य नियोजन आणि वेळेवर अंमलबजावणी व्हावी यासाठी पीएम गति शक्ती राष्ट्रीय महाआराखडा तयार करण्यात आला. ज्या लोकांना डिजीटल जगात रस आहे, त्यांनी पीएम गती शक्ती अभियान समजून घेणे गरजेचे आहे आणि राज्यांनाही त्याचा उपयोग केला पाहिजे असे मला वाटते. पीएम गती शक्ती मंचामध्ये 1600 डेटा लेयर्स(माहिती स्तर) आहेत, जे आपल्या देशाच्या विविध कामांच्या निर्णय प्रक्रियेला गती देतात,सुलभ करतात आणि त्याची जलद अंमलबजावणीही केली जाऊ शकते. आज गती शक्ती मंच हा स्वतःमध्येच, पायाभूत सुविधांच्या कामाला गती देणारा एक मोठा आधारस्तंभ झाला आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आजच्या तरूणांनी, त्यांच्या पालकांना अडचणीचे आयुष्य का जगावे लागले हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.देशाची अशी अवस्था का झाली,हे त्यांना माहीत असणे गरजेचे आहे. गेल्या दशकामध्ये डिजीटल इंडियाविषयी आम्ही सक्रीय/ स्वयंप्रेरित राहिले नसतो, आम्ही त्यासाठी पावले उचलली नसती तर आजसारख्या सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागली असते. आमच्या स्वयंप्रेरित निर्णय आणि सक्रीय कृतीचा परिणाम म्हणून आज आपण काळाच्या पुढे, काळाबरोबर, कुठे कुठे काळाच्या पुढे मार्गक्रमण करतो आहोत.जगभरात, आपल्या देशात आज 5 जी तंत्रज्ञानाचा सर्वात वेगाने प्रसार होत आहे.

आदरणीय सभापती महोदय,

माझ्या भूतकाळातल्या अनुभवातून सांगतो आहे. संगणक असो, मोबाईल फोन असो, एटीएम असो, अशी कितीतरी तंत्रज्ञाने आपल्यापेक्षा कितीतरी आधीच जगातल्या इतर देशांमध्ये पोचली होती, मात्र, ती भारतात पोहोचण्यासाठी अनेक दशके उलटून जावी लागली. जर मी आरोग्याविषयी, आजारांविषयी, लसीकरणाविषयी बोलायचे तर, जेव्हा आपण गुलाम होतो तेव्हा  देवी, बीसीजीची (क्षयरोग प्रतिबंधक) लस, तेव्हा जगभरात त्याचे लसीकरण केले जात होते. काही देशांमध्ये ते करूनही झाले होते, पण भारतात मात्र अनेक दशकांनतर ते उपलब्ध झाले. पोलिओच्या लसीसाठीही आपल्याला दशकांपर्यंत वाट पहावी लागली होती. जग पुढे गेले आणि आपण मागे राहिलो. कारण देशाच्या व्यवस्थेवर काँग्रेसची एवढी मजबूत पकड होती, त्यांना असे वाटत होते की जे सरकारात सामील आहेत त्यांनाच सारे ज्ञान आहे, तेच सर्वकाही करतील आणि त्याचाच एक परिणाम पहायला मिळाला तो म्हणजे परवाना परमिट राज, मी देशातल्या तरूणांना सांगेन, परवाना परमिट राज म्हणजे अन्याय होता, म्हणून देश विकास करू शकत नव्हता आणि परवाना परमिट राज हीच काँग्रेसची ओळख झाली होती

आदरणीय सभापती महोदय,

संगणकाच्या सुरूवातीच्या काळात, ज्याला संगणक आयात करायचा आहे त्याला त्यासाठी परवाना घ्यावा लागे, संगणकासाठी आणि संगणक आणण्यासाठीही अनेक वर्ष लागत असत.

आदरणीय सभापति जी,

तो काळ असा होता, घर बांधण्यासाठी सिमेंट हवे असेल तर सिमेंटसाठी देखील परवानगी घ्यावी लागत होती. घर बांधण्यासाठी … एवढंच नाही सभापती जी,  लग्न समारंभात  साखरेची गरज असेल , साखर! चहा पाजायचा असेल तरी परवाना घ्यावा लागायचा. माझ्या देशातील तरुणांना हे माहित असायला हवे ,आणि हे  मी स्वतंत्र भारताबद्दल बोलतोय, मी ब्रिटीशांच्या काळाबद्दल बोलत नाही. मी काँग्रेसच्या कालखंडाबद्दल बोलतोय आणि काँग्रेसचे माजी अर्थमंत्री जे स्वत:ला अत्यंत जाणकार समजतात , त्यांचे मत होते की लायसन्स परमिट शिवाय कोणतेही काम होऊच  शकत नाही. सर्व कामे  लायसन्स परमिट मार्गानेच होतात   आणि लाच दिल्याशिवाय लायसन्स परमिट मिळत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. काँग्रेसचे अर्थमंत्री जे म्हणाले तेच मी सांगत  आहे. लाच घेतल्याशिवाय होत नाही.  आता कुणाही युवकाला  अगदी सहज समजू शकते की, त्या काळात लाच म्हणजे हातसफाई कोण करत होते , हा कोणाचा पंजा होता? तो पैसा कुठे जायचा  हे देशातील युवक चांगल्या प्रकारे समजू शकतात . इथेच या सभागृहात काँग्रेसचे एक सन्माननीय सदस्य उपस्थित आहेत, ज्यांच्या वडिलांकडे स्वतःचे पैसे होते, त्यांचे स्वतःचे होते , कुणाकडून घ्यायचे नव्हते  आणि त्यांना एक गाडी विकत घ्यायची होती. येथे उपस्थित काँग्रेसचे एक खासदार आहेत, त्यांच्या वडिलांना स्वतःच्या पैशाने गाडी घ्यायची होती. काँग्रेसच्या राजवटीत त्यांना 15 वर्षे गाडी घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती.

आदरणीय सभापति जी,

आपल्या सर्वांना माहीत आहे, स्कूटर विकत घ्यायची असेल तर ती बुक करून पैसे द्यायचे , एक  स्कूटर घ्यायला  8-8, 10-10 वर्षे लागायची आणि नाईलाजाने स्कूटर विकायची झाली तरी त्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागत होती. म्हणजे पहा , कसा देश चालवला या लोकांनी आणि एवढेच नाही तर खासदारांना गॅस सिलिंडरसाठी कूपन दिली जात होती , खासदारांना कुपन दिले जायचे की  तुम्ही तुमच्या परिसरातील 25 लोकांना गॅस कनेक्शन देऊ शकता.   गॅस सिलिंडरसाठी रांग लागायची.  टेलीफोन कनेक्शन मिळणे अवघड होते , देशातील युवकांना माहीत असायला हवे , हे जे आज मोठमोठी भाषणे करत आहेत त्यांनी काय केले हे देशाला कळायला हवे.

आदरणीय सभापति जी,

हे  सर्व निर्बंध आणि लायसन्स राजच्या धोरणांनी भारताला जगातील सर्वात मंद आर्थिक विकास दर असलेल्या देशांमध्ये ढकलले. पण तुम्हाला माहीत आहे का, या कमी विकास दराला, या अपयशाला, जगात कुठल्या नावाने संबोधित करायला सुरुवात झाली होती,  हिंदू विकास दर म्हणत होते. एखाद्या समाजाचा एवढा अपमान ! हे अपयश सरकारमध्ये बसलेल्या लोकांचे , कामाबाबत असमर्थता इथे बसलेल्या लोकांची , या लोकांमधील समजूतदारपणाचा अभाव, दिवसरात्र भ्रष्टाचारात बुडलेल्या लोकांचे हे अपयश आहे आणि अपमान झाला एका खूप मोठ्या समाजाचा , हिंदू विकास  दर…

आदरणीय सभापति जी,

शाही घराण्याच्या आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण समाजाला दोषी ठरवले गेले आणि जगभरात बदनाम केले गेले. आपण जर इतिहास पाहिला, भारतातील लोकांच्या पद्धती आणि धोरणे , भारताच्या स्वभावात लायसन्स राज नव्हते, परमिट नव्हते. भारतातील लोकांचा शतकानुशतके आणि हजारो वर्षांपासून मुक्त व्यापारावर  विश्वास होता आणि आपण त्या  समुदायांमध्ये सर्वप्रथम होतो जे जगभरात मुक्त व्यापार, फ्री ट्रेडसाठी मेहनत करत होते, काम करत होते.

अनेक शतकांपूर्वी भारतीय व्यापारी दूर - दूरच्या देशांमध्ये व्यापारासाठी जात होते , कुठलेही बंधन नव्हते , अडथळे नव्हते. ही आपली नैसर्गिक संस्कृती होती, ती आपण नष्ट केली.

आज जेव्हा संपूर्ण जग भारताची आर्थिक क्षमता ओळखू लागले आहे, आज जग भारताकडे जलद गतीने  वाढणारा देश म्हणून पाहत आहे, आज जग भारताचा विकासदर पाहत आहे आणि आम्हा प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही आपली अर्थव्यवस्था विस्तारत आहोत.

आदरणीय सभापति जी,

आदरणीय सभापति जी,

काँग्रेसच्या पंजापासून मुक्त होऊन देश आता सुटकेचा श्वास घेत आहे आणि उंच झेप  घेत आहे. काँग्रेसच्या लायसन्स राज आणि कुटील धोरणांमधून बाहेर पडून आम्ही मेक इन इंडियाला प्रोत्साहन देत आहोत. भारतात उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही पीएलआय योजना सुरू केली आणि एफडीआयशी संबंधित सुधारणा केल्या. आज भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादन करणारा देश बनला आहे. पूर्वी आपण बहुतांश फोन बाहेरून आयात करत होतो, आता मोबाइल निर्यातदार अशी  आपली ओळख झाली आहे.

आदरणीय सभापति जी,

आज भारताची ओळख संरक्षण सामग्रीचे उत्पादन  करणारा देश अशी बनली आहे. 10 वर्षांमध्ये आपल्या  संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत 10 पट वाढ झाली आहे. 10 वर्षांमध्ये  10 पट वाढ झाली आहे.

आदरणीय सभापति जी,

भारतात सोलर मॉड्युल उत्पादनातही 10 पटीने वाढ झाली आहे. आज आपला देश जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे.गेल्या 10 वर्षांमध्ये आपली यंत्रसामग्री आणि इलेक्ट्रॉनिक निर्यात झपाट्याने वाढली आहे.मागील 10 वर्षांमध्ये भारतीय  खेळण्यांच्या निर्यातीत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये कृषी रसायनांची निर्यातही वाढली आहे. कोरोनाच्या काळात, आपण 150 हून अधिक देशांना लस आणि औषधांचा पुरवठा केला – मेड इन इंडिया. आपली आयुष आणि हर्बल उत्पादनांची निर्यातही अतिशय वेगाने वाढली आहे आणि वाढत आहे.

आदरणीय सभापति जी,

खादी,काँग्रेसने खादीसाठी सर्वात मोठे एक  काम केले असते ना , तरी मला वाटले असते की हो, हे  स्वातंत्र्य चळवळीतील लोकांकडून काही प्रेरणा घेत आहे, पण तेही  केले नाही.खादी आणि ग्रामोद्योगाची उलाढाल प्रथमच दीड लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. 10 वर्षांमध्ये त्याचे उत्पादनही  चौपट झाले आहे. या सर्व उत्पादनाचा आपल्या एमएसएमई क्षेत्राला  खूप मोठा फायदा झाला आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

आदरणीय सभापति जी,

आपण सर्व लोकप्रतिनिधी आहोत. आपण जनतेचे सेवक आहोत, लोकप्रतिनिधींसाठी देश व समाजाचे ध्येयच सर्वकाही असते.आणि सेवेचे व्रत घेऊन काम करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते.

आदरणीय सभापति जी,

देशाची आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे की विकसित भारताला आत्मसात करण्यात आपण कोणतीही कसर सोडू नये.ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी असायला हवी. हा देशाचा संकल्प आहे, हा कोणत्याही सरकारचा संकल्प नाही. हा कोणा एका व्यक्तीचा संकल्प नाही, 140 कोटी देशवासीयांचा संकल्प आहे आणि सभापती महोदय, माझे शब्द लिहून ठेवा , जे लोक विकसित भारताच्या संकल्पापासून स्वतःला दूर ठेवतील,देश त्यांना दूर  ठेवेल. प्रत्येकाला यात सहभागी व्हावे लागेल , तुम्ही यापासून दूर  राहू शकत नाही, कारण भारतातील मध्यमवर्ग, भारताचे युवक पूर्ण ताकदीनिशी  देशाला पुढे नेण्याचे काम करत आहेत.

आदरणीय सभापति जी,

आज देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत  आहे.देश विकासाची नवी उंची गाठत आहे,तेव्हा आपल्या सर्वांची भूमिका अतिशय  महत्त्वाची आहे.सरकारांमध्ये विरोध असणे हा लोकशाहीचा स्वभाव आहे.धोरणांना विरोध होणे  ही लोकशाहीची जबाबदारी देखील आहे.मात्र टोकाचा विरोध, घोर  निराशावाद आणि आपली रेषा लांब न करता दुसऱ्याची रेषा लहान करण्याचे प्रयत्न हे विकसित भारतात अडथळे ठरू शकतात, त्यापासून आपल्याला मुक्त व्हावे लागेल आणि आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल, निरंतर विचारमंथन करावे लागेल.मला विश्वास आहे की सभागृहात जी चर्चा झाली त्यात ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत,त्या घेऊन आपण पुढे जाऊ आणि आपले मंथन सुरूच राहील,राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून आपल्याला निरंतर ऊर्जा मिळत राहील.पुन्हा एकदा मी राष्ट्रपतींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय खासदारांचे देखील आभार मानतो.खूप खूप धन्यवाद !


GC/JPS/SP/Nilima/Shailesh/Tushar/Gajendra/Ashutosh/Vijayalaxmi/Sushama/PM  

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

    

 


(Release ID: 2102897) Visitor Counter : 92


Read this release in: English