संरक्षण मंत्रालय
भारतात प्रगत- प्रणालीसाठी सह विकास आणि सह उत्पादन करण्याचे संरक्षणमंत्र्यांचे जागतिक समुदायाला आवाहन
सध्याच्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि मजबूत सहकार्याची आवश्यकता : संरक्षण मंत्र्यांच्या जागतिक परिषदेत राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
11 FEB 2025 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025
सध्याच्या जागतिक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि मजबूत सहकार्याची आवश्यकता आहे, यावर भर देत प्रगत प्रणालींसाठी सह-विकास आणि सह उत्पादनांत भारतासोबत सामील होण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जागतिक समुदायाला केले आहे.आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे 15 व्या एरो इंडियाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या विविध देशांतील संरक्षण मंत्र्यांची परीषद ‘बिल्डिंग रेझिलियन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एंगेजमेंटला (ब्रिज)’ संरक्षणमंत्री संबोधित करत होते. या कार्यक्रमात 81 देशांतील 162 प्रतिनिधींचा सहभाग होता, ज्यात विविध 15 देशांतील संरक्षणमंत्री,11 संरक्षण उपमंत्री, संरक्षण सचिव आणि 17 सेवा प्रमुखांचा समावेश होता.
“सतत वाढत असलेले संघर्ष, नवीन सत्ताकेंद्रे, शस्त्रास्त्रांच्या नवीन पद्धती आणि साधने आणि विनाशकारी तंत्रज्ञानाचा उदय यामुळे जागतिक संरक्षण व्यवस्था अधिक नाजूक बनली आहे. सायबरस्पेस आणि आऊटर स्पेस सार्वभौमत्वाच्या प्रस्थापित व्याख्येला आव्हान देत आहेत,” असे संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, हायपरसॉनिक यासारखे विनाशकारी तंत्रज्ञान युद्धाचे स्वरूप बदलत आहेत, नव्याने असुरक्षितता निर्माण करत आहेत. या बदलांचा भविष्यातील युद्धांवर गहन परिणाम होईल, तसेच उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक क्षमतेचे पुनर्मूल्यांकन करणे भाग पडेल,यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.
“आम्ही एक अनुकूल धोरण व्यवस्था लागू केली आहे जी अत्याधुनिक जमीन, सागरी आणि हवाई प्रणालींच्या संपूर्ण श्रेणीतील गुंतवणूक आणि उत्पादनास प्रोत्साहन देते. विकास आणि संशोधन यासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचा उदय आणि संरक्षण क्षेत्रातील नावीन्य हे आमच्या क्षमता आणि आकांक्षांचा पुरावा आहे,” असेही प्रतिपादन त्यांनी केले.
सिंह म्हणाले की, भारताकडे एक वैशिष्ट्यपूर्ण संरक्षण स्टार्ट-अप इकोसिस्टम आहे आणि युनिकॉर्न्सच्या क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी भरभराटीला येत असलेल्या भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या सहकार्याच्या अतुलनीय संधींवर प्रकाश टाकला,ज्याला महत्त्वपूर्ण विकास आणि संशोधन तसेच उद्योजकतेचा आधार आहे. "
दर्जा, विश्वासार्हता आणि भागीदारांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी असलेल्या वचनबद्धतेमुळे,संरक्षण भागीदार म्हणून निर्यातीसाठी भारताचे स्थान प्राधान्यक्रमावर आहे,असे राजनाथ सिंह यांनी यावेळी अधोरेखित केले.
"आमचा संरक्षण उद्योग अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून ते किफायतशीर किंमतीतील उपायांपर्यंत विविध आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आहे." असे ते पुढे म्हणाले.
यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि नवीनतम उपकरणांचा विकास तसेच उत्पादनांत सहकार्य करण्याची आपली इच्छा व्यक्त केली आणि भारताला पुरवठा साखळीतील महत्वपूर्ण भागीदार असे संबोधले. त्यांनी भारताची शांतता राखण्याची भूमिका आणि संरक्षण,आरोग्य आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात अनेक देशांच्या क्षमता सुधारण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
जनहितविरोधी आणि विकासविरोधी असल्याने सशस्त्र संघर्ष टाळण्यास सर्व मंत्र्यांनी सहमती दर्शविल्याने विचारविमर्शादरम्यान सामायिक सुरक्षेच्या समस्याही समोर आल्या. अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी, बेकायदेशीर मासेमारी, दहशतवाद आणि सायबर गुन्हे यासारख्या विविध आव्हानांवर यादरम्यान चर्चा करण्यात आली आणि सर्व राष्ट्रांनी या धोक्यांविरुद्ध एकत्रितपणे लढण्यासाठी कटिबद्धता दर्शवली.
संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात उपस्थित मान्यवरांचे त्यांच्या सहभागाबद्दल आभार मानले.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2101964)
Visitor Counter : 34