ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजुषा 2024-25 ची मुंबई प्रादेशिक फेरी टाटा सामाजिक विज्ञान संस्था परिसर येथे संपन्न


मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संघाला प्रथम पारितोषिक, तर सिक्किम कौशल्य विद्यापीठाच्या संघाने पटकावले दुसरे स्थान

Posted On: 10 FEB 2025 9:56PM by PIB Mumbai

मुंबई, 10 फेब्रुवारी 2025

 

एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजुषा 2024-25 च्या मुंबई प्रादेशिक फेरीचा समारोप आज टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस), मुंबई येथे झाला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा येथील प्रमुख अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थांमधील 65 संघ उत्साहाने सहभागी झाले होते.

चुरशीची स्पर्धा आणि वैचारिक वातावरणात झालेल्या या स्पर्धेत पहिला पुरस्कार वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईच्या सुयश पाटणकर आणि मधू टीके यांनी जिंकला. दुसरा पुरस्कार सिक्किम स्किल युनिव्हर्सिटीच्या शुभम झा आणि सौरव कुमार यांनी मिळवला, तर तिसरा पुरस्कार टीआयएसएस, मुंबईच्या अर्जुन व्ही.व्ही. आणि गौरव कुमार यांना प्रदान करण्यात आला. पहिले दोन संघ आता 27 आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी नोएडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीत मुंबई प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतील, जिथे ते भारतभरातील इतर आठ प्रादेशिक फेऱ्यांमधील विजेत्या संघांशी स्पर्धा करतील.

या प्रसंगी बोलताना, एनटीपीसीचे प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम-1)  कमलेश सोनी यांनी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले, “एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजुषा ही केवळ एक स्पर्धा नाही, तर ती ज्ञान, नवकल्पना आणि धोरणात्मक विचारांचा एक आनंदोत्सव आहे. एनटीपीसीने देशाला वीजपुरवठा करत 50 वर्षे पूर्ण केली आहेत आणि आम्ही भविष्यातही विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः ऊर्जा, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात भारताचे नेतृत्व करणाऱ्या नवोदित प्रतिभांना प्रेरणा देण्यास वचनबद्ध आहोत.”

जिंकल्यानंतर आपले विचार व्यक्त करताना, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे प्रथम पुरस्कार विजेते सुयश पाटणकर म्हणाले, "या प्रश्नमंजुषेमुळे फक्त आमची व्यवसाय आणि व्यवस्थापन कौशल्ये तपासली गेली नाहीत, तर आम्हाला पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे विचार करण्यास आणि संकल्पनांना व्यावहारिक परिस्थितीत लागू करण्यास देखील प्रवृत्त केले."

एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजुषेची सुरुवात 2004 मध्ये झाली आणि गेल्या काही वर्षांत ती एक प्रतिष्ठित ज्ञान-आधारित स्पर्धा म्हणून विकसित झाली आहे. व्यवसाय आणि व्यवस्थापन संकल्पनांमध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची चाचणी घेण्याचे हे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. एनटीपीसीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, यावर्षीच्या प्रश्नमंजुषेमुळे ज्ञान, नवकल्पना आणि नेतृत्वाच्या दिशेने कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा  सन्मान  केला  जात आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2101564) Visitor Counter : 19


Read this release in: English