माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मुंबई येथील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ इथे कथात्मक मांडणी आणि कथेचे सार प्रभावीपणे मांडणारे सादरीकरणासंबंधी कथात्मक मांडणीच्या कलेत पारंगत व्हा आणि भविष्यावर छाप सोडा (Master the Art of Storytelling and Influence the Future) या विषयावरील कार्यशाळेचे सत्र संपन्न
वेव्हज - क्रिएट इन इंडिया स्पर्धेचा एक भाग म्हणून या कार्यशाळेत अॅनिमेशन क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना कथात्मक मांडणीच्या कलेविषयी मार्गदर्शन
Posted On:
05 FEB 2025 9:48PM by PIB Mumbai
मुंबई, 5 फेब्रुवारी 2025
मुंबई येथील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC), जे. बी. सभागृहात आज (5 फेब्रुवारी 2025) कथात्मक मांडणीच्या कलेत पारंगत व्हा आणि भविष्यावर छाप सोडा (Master the Art of Storytelling and Influence the Future) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने डान्सिंग अॅटम्सच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती. भारतातील सर्जनशील कथात्मक मांडणीकारांच्या भावी पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले गेले होते. या कार्यशाळेत डान्सिंग अॅटम्स स्टुडिओच्या संस्थापक दृश्य कथा मांडणीकार (Visual Storyteller), लेखिका, दिग्दर्शिका आणि क्रिएटिव्ह निर्मात्या सरस्वती वाणी बुयाला यांनी अॅनिमेशन चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माती क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वत: च्या प्रकल्पांबद्दल चर्चा केली आणि त्यावर या क्षेत्रातील उद्योग व्यावसायिकांकडून मार्गदर्शनपर अभिप्राय घेतले.
या कार्यशाळेत कथात्मक मांडणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अॅनिमेशन साधनांचा वापर करण्यावर आणि लक्ष वेधून घेणारी पात्रे तयार करण्यावर भर देण्यात आला. या कार्यशाळेतील तज्ञ मार्गदर्शक असलेल्या कथात्मक मांडणीकारांनी विद्यार्थ्यांना या कलेच्या माध्यमातून अस्सल भारतीय कथा मांडण्यासाठी तसेच 'क्रिएट इन इंडिया - फॉर इंडिया अँड द वर्ल्ड' अर्थात भारतात निर्मिती करा - भारतासह जगभरासाठी या उपक्रमातील सहभागासाठी प्रोत्साहन दिले. लेखिका-दिग्दर्शिका सरस्वती बुय्याला यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले आणि प्रत्येकाला त्यांच्या सर्जनशील दृष्टीकोनाचे मनोरंजक कथांमध्ये रूपांतर करण्यापर्यंतचा परिवर्तनशील प्रक्रियेचा प्रवास घडवून आणला. या सत्रात लक्षवेधी कथेची निर्मिती करण्यासंबंधी कथेची रचना, एकसामायिक सामाजिक भावनांचे आकलन आणि गुंतवणूकदार तसेच निर्मात्यांसाठी कथेचे सार प्रभावीपणे मांडणारे सादरीकरण, या आणि अशा अनेक महत्वाच्या पैलूंवर मार्गदर्शन केले गेले. या कार्यशाळेत लेखनाच्या नियमित सरावाचे महत्त्व, रसिकांना भावणाऱ्या आशयघन कथांची गरज आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्यामध्ये एकसामायिक सामाजिक भावनांची ताकद अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. या कार्यशाळेत भारतातील ऍनिमेशन क्षेत्राच्या सद्यस्थितीवर ही चर्चा करण्यात आली. नवोदित चित्रपट दिग्दर्शकांना अतिरिक्त पाठबळ देणे, चित्रपट उद्योग आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या विद्यार्थ्यांमध्ये अधिक एकात्मिकता निर्माण करणे आणि भारतीय अॅनिमेटेड चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी अधिक मंच उपलब्ध करून देण्याची गरजही या चर्चांमधून अधोरेखित करण्यात आली

या कार्यशाळेत सहभागी झालेल्या नवोदित अॅनिमेशन चित्रपट दिग्दर्शिकांनी अस्सल स्वरुपाची आशय निर्मिती, यूट्यूब आणि समाज माध्यमांसारख्या मंचांद्वारे प्रेक्षकवर्ग तयार करणे आणि अॅनिमेशनकारांच्या वर्तुळात परस्पर सहकार्याचे वातावरण वृद्धिंगत करण्याच्या महत्त्वावर चर्चा केली.

ही कार्यशाळा वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेअंतर्गच्या (World Audio Visual & Entertainment Summit - WAVES) वेव्हज - क्रिएट इन इंडिया कॉम्पिटिशन - वेव्ह्स एएफसी मास्टरक्लासेस उपक्रमाचा एक भाग आहे. विविध संस्थांमधील विद्यार्थी, या क्षेत्रातील भविष्यातील यशस्वी व्यक्तिमत्वे आणि कथात्मक मांडणीकारांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने अॅनिमेशन, डिझाइन व्हर्च्युअल प्रॉडक्शन, एआर - व्हीआर आणि गेम्सच्या परस्पर संबंध येण्याच्या बिंदूवर चर्चा करता यावी यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलतेचे मूल्य जोपासणे, मनोरंजन मूल्याला प्राधान्य देणे आणि प्रभाव सोडणाऱ्या कथांची निर्मिती करण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचा वापर करण्याबाबत प्रोत्साहन दिले जात आहे.
हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आणि देशात सर्जनशीलतेच्या समृद्ध परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने राबवल्या जात असलेल्या क्रिएट इन इंडिया या मोहिमेशी सुसंगत आहे.
या उपक्रमाअंतर्गत भारतातील प्रतिभेला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी सध्या अनेक स्पर्धांचा प्रारंभ केला गेला आहे.
खुल्या स्पर्धा आणि उपक्रमांविषी अधिक माहितीसाठी, https://wavesindia.org/challenges-2025 या संकेतस्थळाला भेट द्या.
* * *
PIB Mumbai | S.Patil/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2100149)
Visitor Counter : 49