पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) अधिकृतपणे एक पूर्ण विकसित करार-आधारित आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून आली अस्तित्वात
Posted On:
03 FEB 2025 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025
एक महत्त्वपूर्ण घडामोडीत, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए- आंतरराष्ट्रीय मार्जारकुळ आघाडी) च्या स्थापनेवरील करार आराखडा अधिकृतपणे अंमलात आला आहे. दिनांक 23 जानेवारी 2025 पासून, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आणि त्याचे सचिवालय एक पूर्ण विकसित करार-आधारित आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर संघटना म्हणून अस्तित्वात आली आहे.
परिणामी, परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली आहे की पाच देश - निकाराग्वा प्रजासत्ताक, इस्वातिनी राज्य, भारत प्रजासत्ताक, सोमालिया संघीय प्रजासत्ताक आणि लायबेरिया प्रजासत्ताक - यांनी या आराखड्यातील कराराच्या कलम VIII (1) अंतर्गत मान्यता किंवा स्वीकृती किंवा मंजुरीची साधने जमा केली आहेत.
आतापर्यंत, भारतासह 27 देशांनी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सहभागी होण्यास संमती दिली आहे तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संघटनांनी देखील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्ससोबत भागीदारी केली आहे. वर उल्लेख केलेल्या पाच देशांनी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे औपचारिक सदस्य होण्यासाठी आराखड्यातील करारावर स्वाक्षरी केली आहे.
इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सबाबत अधिक माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी 'व्याघ्र प्रकल्पच्या 50 व्या वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा प्रारंभ केला. दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारतात मुख्यालय असलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली. वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, चित्ता, जग्वार आणि प्यूमा या सात मोठ्या मार्जार वर्गीय प्राण्यांच्या संवर्धनाच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2099340)
Visitor Counter : 40