संरक्षण मंत्रालय
डीआरडीओद्वारे ओदिशाच्या किनाऱ्याजवळ अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या सलग उड्डाण चाचण्या यशस्वी
Posted On:
01 FEB 2025 8:32PM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ओदिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या (व्हीएसएचओआरएडीएस) सलग तीन उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या. या चाचण्या खूप कमी उंचीवर उडणाऱ्या, अतिशय गतिमान लक्ष्यांवर करण्यात आल्या.
तिन्ही उड्डाण चाचण्यांदरम्यान, क्षेपणास्त्रांनी वेगवेगळ्या उड्डाण परिस्थितीत कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोनप्रमाणे कमी ‘थर्मल सिग्नेचर’सह लक्ष्यांना रोखले आणि पूर्णपणे नष्ट केले. उड्डाण चाचण्या अंतिम तैनातीसाठी असलेल्या बाह्यस्वरूपामध्ये घेण्यात आल्या. यावेळी प्रत्यक्ष क्षेत्रावरील ऑपरेटर्सनी शस्त्र सज्जतेसह लक्ष्य हेरून क्षेपणास्त्र मारा केला.
व्हीएसएचओआरएडीएस ही एक ‘मॅन पोर्टेबल’ हवाई संरक्षण प्रणाली आहे जी इमरत या संशोधन संस्थेने इतर डीआरडीओ प्रयोगशाळा आणि विकास सह उत्पादन भागीदारांच्या सहकार्याने स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि विकसित केली आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे.
हे भरीव यश असल्याचे नमूद करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि उद्योगांचे अभिनंदन केले आहे.
***
S.Bedekar/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2098830)
Visitor Counter : 34