शिक्षण मंत्रालय
पीएम-उषा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात
Posted On:
29 JAN 2025 7:45PM by PIB Mumbai
नागपूर, 29 जानेवारी 2025
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे "सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता" या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे 29 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मिलिंद सुधाकर मराठे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे प्रा. मिलिंद एस. मराठे यांनी भारतीय सांस्कृतिक विविधता आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातील संवेदनशीलता याबाबत आपले विचार व्यक्त केले. न्यूटनचे नियम विशद करून त्यांनी पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक प्रगती कसा परस्परसंवाद साधतात हे स्पष्ट केले. आपल्या भाषणात, त्यांनी उपस्थितांना सांगितले की नवोन्मेषाद्वारे समाजातील सर्व घटकांच्या गरजा पूर्ण होतील, स्वदेशी ज्ञान, नैतिक विचार आणि प्रादेशिक आव्हानांचा आदर होईल याची काळजी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संवेदनशीलता घेते. त्यांनी अधोरेखित केले की आयुर्वेदाच्या आधुनिक वैद्यकशास्त्रातील एकीकरणापासून ते बहुभाषिक एआय साधनांपर्यंत, भारताची वैज्ञानिक प्रगती सर्वसमावेशकतेच्या आधारे जोमाने बहरत आहे आणि सांस्कृतिक विविधता हा केवळ वारसा नसून तांत्रिक उत्कृष्टता आणि सामाजिक प्रगतीसाठी एक प्रेरक शक्ती आहे हे सिद्ध करते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रशांत एस. बोकारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, "भारताच्या साडी परंपरेतून तिची अफाट सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते, ज्यामध्ये प्रत्येक प्रांत ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असलेले वैशिष्ट्यपूर्ण कापड, विणकाम आणि साडी नेसण्याच्या वैविध्यपूर्ण शैली प्रदर्शित करतो." उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, "भारतीय हे नेहमीच सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्ती असतात, जे मतभेदांना खुल्या मनाने आणि मोकळेपणाने स्वीकारतात."
डॉ. बोकारे म्हणाले की, एकमेकांच्या मतभिन्नतेचा आदर आणि जतन करण्याबाबत तसेच प्रत्येक संस्कृतीचे महत्त्व जपले जाईल असा समाज निर्माण करण्यासाठी आपण नेहमीच सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असतो.
J6WQ.jpeg)
मान्यवरांचे स्वागत करताना, कार्यक्रमाच्या समन्वयक तसेच ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विभागाच्या प्राध्यापक प्रा. शालिनी लिहिटकर म्हणाल्या, “आमच्या कार्यक्रमाची रचना आम्ही विविध समुदायांमध्ये अर्थपूर्ण सहभागाला प्रेरणा देण्यासाठी आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने केली आहे. विज्ञानाच्या विकासावर सांस्कृतिक विविधतेच्या प्रभाव यावरील पोस्टर स्पर्धा, उच्च शिक्षणातील सांस्कृतिक सर्वोत्तम पद्धतींवरील वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक सक्षमीकरणावरील केस स्टडी, सांस्कृतिक प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि खाद्य आणि सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम यासारख्या आकर्षक उपक्रमांमधून शिकण्यासाठी, परस्परसंवादासाठी आणि सांस्कृतिक समृद्धता साजरी करण्यासाठी एक उत्साही व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेत केला जातो."

"विविधता स्वीकारण्याची, ज्ञान सामायिक करण्याची आणि अधिक मजबूत व सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याची ही एक संधी आहे." असे त्यांनी नमूद केले.
सत्राच्या विशेष अतिथी आणि भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षण आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत पूर्व विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या माजी संचालक डॉ. गौरी बासू म्हणाल्या, “भारत ही असाधारण सांस्कृतिक विविधता असलेली भूमी आहे. 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश, प्रत्येकाच्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, भाषा आणि पद्धतींसह, भारत सहअस्तित्वाच्या सौंदर्याचा दाखला म्हणून सर्वांसमोर उभा आहे."
डॉ. बसू म्हणाल्या, “सांस्कृतिक विविधता म्हणजे विविध धर्म, भाषा, उत्सव, पाककृती आणि कला प्रकारांचे लयबद्ध मिश्रण आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारताचा प्रत्येक कानाकोपरा वेगळीच कथा सांगतो. मात्र, या विविधतेबरोबरच एक जबाबदारी येते आणि ती म्हणजे सांस्कृतिक संवेदनशीलता. सर्वसमावेशकतेला चालना देतानाच वेगळेपण समजून घेणे, त्याचा आदर करणे आणि ते साजरे करणे म्हणजे सांस्कृतिक संवेदनशीलता होय.”
इतर मान्यवरांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र -कुलगुरू प्रा. राजेंद्र काकडे, आयक्यूएसीच्या संचालिका प्रा. स्मिता आचार्य आणि विद्यापीठातील कायदा विभागाच्या प्रा. पायल थाओरे उपस्थित होत्या.
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097437)
Visitor Counter : 25