राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय
सायबर सुरक्षा सहकार्यावरील बिमस्टेक तज्ञ गटाची दुसरी बैठक संपन्न
Posted On:
24 JAN 2025 11:48AM by PIB Mumbai
भारत सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने, 21 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे सायबर सुरक्षा सहकार्यावरील बिमस्टेक तज्ञ गटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. सायबर सुरक्षेवरील बिमस्टेक तज्ञ गटाची पहिली बैठक 2022 मध्ये भारतात नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांमध्ये आयसीटी वापरामध्ये सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी समन्वय आणि सहकार्याला चालना देऊन कृती आराखडा तयार करणे हा बिमस्टेकच्या या तज्ञ गटाच्या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. या कृती आराखड्याची अंमलबजावणी येत्या 5 वर्षांच्या कालावधीत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या दुसऱ्या बैठकीदरम्यान काही महत्त्वपूर्ण बाबींबाबत देवाणघेवाण झाली, ज्यामध्ये बिमस्टेक CERT-TO-CERT सहकार्य यंत्रणा निर्माण करणे , कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमध्ये सायबर गुन्ह्यांसाठी सहकार्य आराखडा तयार करणे आणि या प्रदेशांमध्ये सायबर सुरक्षेबाबत क्षमता निर्माण कार्यक्रम तयार करण्याचा समावेश आहे. यावेळी झालेल्या विविध सादरीकरणांमध्ये, भारताने "शालेय मुलांसाठी सायबर स्वच्छता" या विषयावर भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) या उपक्रमाविषयी एक सादरीकरण देखील केले.
कृती आराखड्याची अंमलबजावणी हे बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांतील (BIMSTEC) सायबर सुरक्षा सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल यावर या बैठकीत सहमती झाली. ही पावले उचलून, बिमस्टेक देश प्रदेशात अधिक सुरक्षित आणि लवचिक सायबर स्पेस निर्माण करण्यासाठी एकत्र काम करू शकतील.
***
SushamaK/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2095770)
Visitor Counter : 31