कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील गांधीनगर येथे 30-31 जानेवारी 2025 रोजी सुशासनावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Posted On: 23 JAN 2025 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "कमाल शासन - किमान सरकार" या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी) गुजरात सरकारच्या सहकार्याने 30 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान गांधीनगर येथे "सुशासन" या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करत आहे.

परिषदेच्या उद्घाटन सत्राला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, गुजरात सरकारचे मुख्य सचिव संबोधित करतील. परिषदेतील सत्रादरम्यान, दोन खंडात असलेल्या 'किमान सरकार – कमाल शासन' या शीर्षकाच्या प्रशासकीय सुधारणांवरील ई-जर्नलचे भूपेंद्र पटेल आणि डॉ. जितेंद्र सिंह संयुक्तरित्या प्रकाशन करतील.  वर्ष 2023 साठी पंतप्रधान पुरस्कारासाठी निवडलेल्या उपक्रमांची यादी 'किमान सरकार – कमाल शासन' (एमजीएमजी) जर्नलच्या दोन खंडांमध्ये सादर करण्यात आली आहे. उद्घाटन सत्राला गुजरात सरकारचे मुख्य सचिव आणि डीएआरपीजी सचिव देखील संबोधित करणार आहेत.

नागरिक केंद्रित सेवा प्रदान करण्यासाठी सरकारी प्रक्रियांची पुनर्अभियांत्रिकी यावर परिषदेचा भर असेल. सत्रादरम्यान, सार्वजनिक सेवा वितरण यंत्रणेत उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून चार नवोन्मेषी उपक्रम, संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांद्वारे सामायिक केले जातील. त्यानंतर डीएआरपीजी चे अतिरिक्त सचिव आणि सहसचिव अनुक्रमे पंतप्रधान पुरस्कार, 2024 आणि ई-शासनावरील राष्ट्रीय परिषदेबाबत एक संक्षिप्त सादरीकरण करतील. सुशासनावर लक्ष केंद्रित करणारी ही परिषद जिल्ह्यांच्या एकूण विकासातील समग्र दृष्टिकोनाचे प्रदर्शन करेल.

गांधीनगर राष्ट्रीय परिषद ही 2014 ते 2025 या कालावधीत डीएआरपीजीने आयोजित केलेली सुशासन पद्धतींवरील 27 वी परिषद आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सार्वजनिक प्रशासन संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून सार्वजनिक प्रशासनातील नवोन्मेष, जीवनमान सुधारण्यासाठी भविष्यातील सार्वजनिक उपाय, सुशासन, ई-शासन, डिजिटल प्रशासन इत्यादी क्षेत्रातील अनुभव सामायिक करणे आहे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय परिषदेत जिल्हाधिकारी, राज्य आणि केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 30 वक्ते त्यांच्या पुरस्कारप्राप्त सर्वोत्तम पद्धती सादर करतील. राष्ट्रीय परिषदेत प्रतिकृतीसाठी सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो. गांधीनगर येथे होणाऱ्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत विविध विषयांवर एकूण सहा सत्रे आयोजित केली जातील. या सत्रांमध्ये ई-शासनातील जिल्हास्तरीय उपक्रम आणि गुजरात सरकारच्या सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा समाविष्ट असून यात राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आपले अनुभव सर्वांसमोर कथन करतील.  

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2095650)
Read this release in: English , Urdu , Hindi