युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होणार खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 चे उद्घाटन
Posted On:
22 JAN 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2025
आईस हॉकी आणि आईस-स्केटिंग या क्रीडा प्रकारांमध्ये 19 संघांमधील 428 खेळाडू भाग घेणार असून लष्कर आणि महाराष्ट्राचे संघ या दोन्ही स्पर्धांचे गतविजेतेपद राखण्यासाठी सज्ज झाले आहेत.
खेलो इंडिया स्पर्धांच्या या मोसमाला येत्या 23 जानेवारी रोजी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 ने आरंभ होत आहे.पाच दिवस चालणार्या या स्पर्धेत,राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सरकारी संस्थांचे 19 संघ, आईस हॉकी आणि आईस-स्केटिंग या क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणार आहेत.खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 चा हा पहिला टप्पा आहे.स्कीइंग सारख्या स्नो गेम्सचा समावेश असलेला दुसरा भाग 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये आयोजित केला जाणार आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय गुरुवारी लेहोन येथील प्रतिष्ठित नवांग दोरजे स्तोबदान क्रीडा संकुलात होणाऱ्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील आणि स्पर्धेला सुरुवात झाल्याची घोषणा करतील.
स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्वांचे स्वागत, पारंपरिक लडाखी पद्धतीने केले जाणार आहे. यामध्ये एकूण 594 सहभागी असून त्यापैकी 428 खेळाडू आहेत. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांची ही पाचवी आवृत्ती असून लडाख दुसऱ्यांदा यांचे यजमानपद भूषवत आहे.
नवांग दोरजे स्तोबदान क्रीडा संकुल आणि गुपुक्स तलाव या दोन ठिकाणी शॉर्ट आणि लॉंग स्केटिंगचे आयोजन केले जाईल, जिथे अनेक युवा स्केटिंग करताना दिसतील. आईस हॉकी स्पर्धा नवांग दोरजे स्तोबदान संकुल आणि लडाख स्कॉउटस रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरण, राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या मदतीने या स्पर्धांच्या तांत्रिक संचालनाचे पर्यवेक्षण करणार आहे. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांच्या उदघाटन सोहळ्याचे प्रसारण दूरदर्शन स्पोर्ट्स वाहिनीद्वारे केले जाणार असून 27 जानेवारी पर्यंत दररोज स्पर्धांचे थेट प्रसारण केले जाईल. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 मध्ये, महाराष्ट्राने स्केटिंग क्रीडाप्रकारात 20 पदके जिंकली होती त्यापैकी सहा सुवर्ण पदके होती. कर्नाटकनेही सहा सुवर्ण पदकांची कमाई केली होती मात्र महाराष्ट्राच्या एकूण 20 पदकांच्या तुलनेत कर्नाटकच्या एकूण आठ पदके या प्रमाणानुसार त्यांना पदकतालिकेच्या क्रमवारीत द्वितीय स्थानावर वर समाधान मानावे लागले होते. स्पीड स्केटिंग प्रकारात यजमान लडाखने खेलो इंडिया स्पर्धेतील ऐतिहासिक दोन सुवर्णपदके जिंकून एकूण 13 पदकांसह तिसरे स्थान पटकावले होते.
लष्कर,आय टी बी पी, हिमाचल प्रदेश आणि लडाख या संघांमध्ये आईस-हॉकी स्पर्धेत जोरदार चुरस दिसून येते. पुरुष गटात लष्कराचा संघ गतविजेता ठरला होता आणि महिला आईस-हॉकी मध्ये आय टी बी पी ने विजेतेपद पटकावले होते. या दोन्ही संघांनी बहुतेकवेळा राष्ट्रीय आणि खेलो इंडिया हिवाळी खेळांचे विजेतेपद पटकावले आहे.
स्पर्धेत भाग घेणारे सर्व संघ 11,562 फूट उंचीवर असलेल्या लेहमध्ये दाखल झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या संघात सर्वाधिक म्हणजे 78 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. हरियाणा (62 खेळाडू ), लडाख (52 खेळाडू ) आणि महाराष्ट्र (48 खेळाडू ) लडाख येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी सज्ज आहेत.
KIWG 2025 वेबसाइटसाठी, https://winter.kheloindia.gov.in/ क्लिक करा:
KIWG 2025 पदक क्रमवारीसाठी, https://winter.kheloindia.gov.in/medal-tally क्लिक करा:
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2095292)
Visitor Counter : 13