संरक्षण मंत्रालय
नागपूर येथील वायुसेना नगर इथल्या मेंटेनन्स कमांड मुख्यालयात साजरा झाला नववा सशस्त्र सेना माजी सैनिक दिन
Posted On:
14 JAN 2025 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025
नागपुरात वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांड मुख्यालयात 14 जानेवारी 2025 रोजी नववा सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा झाला. या हृद्य समारंभात आपल्या सैन्यदलातील माजी सैनिकांच्या अतुल्य सेवेला व त्यागाला आदरांजली वाहण्यासाठी सेवारत आणि निवृत्त सैनिक, त्यांची कुटुंबे आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.या समारंभात देशवासीयांचा सैनिकांप्रती असलेला आदर व्यक्त झाला,त्याबरोबरच देशाचे सार्वभौमत्व व एकतेचे रक्षण करण्याकामी आपले बलिदान देणाऱ्या अनेक हुतात्म्यांचे स्मरणही करण्यात आले.

सैन्यदलाच्या माजी सैनिक दिनाचे भारतीय इतिहासात खास महत्व आहे.भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्ड मार्शल के एम करिअप्पा 1953साली याच दिवशी सैन्यदलातून निवृत्त झाले. त्यांनी दिलेल्या अतुलनीय सेवेच्या स्मरणार्थ 2016 सालापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या वर्षी आपण 9वा माजी सैनिक दिन साजरा करत आहोत.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,तसेच मेंटेनन्स कमांडचे प्रमुख एअर मार्शल विजय कुमार गर्ग उपस्थित होते.

समारंभाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे तसेच इतर मान्यवरांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.हवाई दल माजी सैनिक संचालनालयाच्या ,नागपूर जिल्हा सैनिक मंडळाच्या तसेच काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. त्यामधून त्यांनी माजी सैनिकांच्या आर्थिक नियोजन व कल्याणासाठी मार्गदर्शन केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणातून माजी सैनिकांच्या समर्पणभावनेबद्दल तसेच निःस्वार्थ त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माजी सैनिकांच्या कल्याणाप्रती देशाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला तसेच माजी सैनिकांच्या त्यागभावनेचा व देशभक्तीचा वारसा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक ठरेल असे त्यांनी सांगितले. भाषणाच्या शेवटी माजी सैनिक दिनाच्या उत्तम आयोजनाबद्दल त्यांनी सर्व सहभागींचे, अधिकाऱ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.
आपल्या माजी सैनिकांच्या शौर्य आणि त्यागाचा सन्मान ठेवताना त्यांच्या कल्याणासाठी आपल्या वचनबद्धतेचा आपण पुनरुच्चार करुया.त्यांचा धैर्य, त्याग व सेवेचा वारसा पुढील पिढ्यांना स्फूर्ती देत राहील.
N.Chitale/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2092874)
Visitor Counter : 42