युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करण्याबाबत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 152 वी एमओसी बैठक संपन्न
Posted On:
07 JAN 2025 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली आज मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे प्रमुख खेळाडू, प्रशासक आणि प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत 152 वी मिशन ऑलिंपिक सेल (एमओसी ) ची बैठक पार पडली.
नव्याने स्थापन झालेल्या एमओसी च्या सदस्यांचा परिचय आणि ऑलिम्पिकमधील भारताची पदकतालिका सुधारण्याच्या दिशेने लॉस एंजेलिस 2028 साठी नियोजन हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता.
भारतीय क्रीडा परिसंस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ , राज्य सरकारे, कॉर्पोरेट्स, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि बिगर -सरकारी संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांसह सर्वसमावेशक दृष्टीकोन अवलंबण्यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.
“माझ्यासाठी हा एक महत्त्वाचा मंच आहे, तुम्ही सर्वांनी सामायिक केलेल्या कल्पनांनुसार अनेक उपाययोजना आधीच सुरू झाल्या आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे एक वर्ष किंवा सहा महिन्यांचे काम नाही. त्यासाठी खूप आधीपासून तयारी करणे आवश्यक आहे. भारतातील क्रीडा विषयक पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्य जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांच्या दर्जाचे आहे. तुम्हाला माहित आहेच की, भारताला क्रीडा महासत्ता बनवण्याच्या कल्पनेला आपल्या पंतप्रधानांचे पूर्ण समर्थन आहे . त्यामुळे आपण एकमेकांची साथ द्यायला हवी आणि देशाला पुढे नेण्यासाठी सर्व हितधारकांनी योगदान दिले पाहिजे " असे डॉ. मांडविया दोन तास चाललेल्या या बैठकीत म्हणाले.
ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग, पुलेला गोपीचंद (उपाध्यक्ष, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया), वीरेन रसक्विन्हा (ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट), अपर्णा पोपट, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पॅरा कोच डॉ. सत्यपाल सिंग, अर्जुन पुरस्कार विजेती प्रशांती सिंग, क्रीडा मानसशास्त्रज्ञ गायत्री मडकेकर, कमलेश मेहता सरचिटणीस, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया), सायरस पोंचा (सरचिटणीस, स्क्वॉश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया), दीप्ती बोपय्या (गोस्पोर्ट्स फाउंडेशन), सिद्धार्थ शंकर (रिलायन्स फाऊंडेशन), मनीषा मल्होत्रा (जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स), गौतम वढेरा (सहसचिव, पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड) आणि प्रेम लोचब (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड) यांच्यासह युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI)चे अधिकारी बैठकीला उपस्थित होते
सचिव (क्रीडा) सुजाता चतुर्वेदी यांनी नव्याने स्थापन एमओसी च्या सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर TOPS चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नछतर सिंग जोहल यांनी टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेचा (TOPS) थोडक्यात परिचय आणि बैठकीचा उद्देश याबाबत माहिती दिली.
बैठकीत चर्चा करण्यात आलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे.
1. ब्रिस्बेन 2032 साठी विकास गटाचे मजबूत प्रतिभा ओळख निकष तयार करणे
2. टॉप्समध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंसाठी अल्प/मध्यम/दीर्घकालीन लक्ष्ये विकसित करणे
3. अल्प/मध्यम/दीर्घकालीन लक्ष्यांच्या तुलनेत सज्जता आणि वास्तविक कामगिरीचे निरीक्षण करणे
4. व्यक्ती आणि संघांच्या सानुकूलित प्रशिक्षणासाठी आवश्यक खर्चाला मान्यता देणे
5. खेळाडूंच्या प्रशिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च स्तरीय तज्ञांची निवड करणे आणि त्यांच्या सेवेचा लाभ घेणे
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091040)
Visitor Counter : 43