माहिती आणि प्रसारण मंत्रालय
क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1: वेव्ह समिट या परिषदेच्या उपक्रमाचा भाग म्हणून 'एक्सआर क्रिएटर हॅकाथॉन मुंबई मीटअप' या बैठकीचे आयोजन
Posted On:
05 JAN 2025 11:31AM by PIB Mumbai
क्रिएट इन इंडिया चॅलेंज (हंगाम 1) अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह समिट उपक्रमाचा एक भाग म्हणून, 4 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील riidl सोमय्या विद्याविहार विद्यापीठात ‘XR क्रिएटर हॅकाथॉन मुंबई मीट अप’ ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
हा कार्यक्रम, Wavelaps, BharatXR आणि XDG द्वारे सहआयोजित XR क्रिएटर हॅकाथॉनच्या ओपन नॉलेज (विदा आणि माहितीची उपलब्धता आणि प्राप्तता) उपक्रमाचा भाग होता. एक्सटेंडेड रिॲलिटी-XR(वास्तवाची डिजिटल माध्यमाशी सांगड) च्या विस्तारित आवाक्याचा धांडोळा घेण्यासाठी सुमारे 80 सहभागींनी सत्रात भाग घेतला.

riidl सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे (SVU) मुख्य कार्यकारी अधिकारी गौरांग शेट्टी यांनी सांगितले की, भारताच्या डिजिटल उत्क्रांतीमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज सारख्या उपक्रमांद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अविरत पाठबळ महत्वाचा स्रोत आहे. त्यांनी ठळकपणे नमूद केले की, riidl SVU मध्ये, तरुण निर्मिकांना नवीन संधी देत हे कार्यक्रम कसे नवनिर्मिती आणि उद्योजकता सक्षम करतील, याची काळजी घेतली जाते.
कार्यक्रमामध्ये एक ओघवते सुरुवातीचे सत्र झाले. यामध्ये WAVES उपक्रम आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजची ओळख करून देण्यात आली. सहभागींना भारताच्या वाढत्या XR परिसंस्थेमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. XR तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीवरील सादरीकरणाने विविध उद्योगांमधील AR, VR आणि MR अनुप्रयोग खोलवर पाहण्याची संधी मिळाली. सहभागींना व्यावसायिक-श्रेणीच्या XR प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन परस्परसंवादी AR/VR अनुभव क्षेत्रांचा धांडोळा घेण्याची संधी देखील होती. जबरदस्त बौद्धिक मंथन घडवणार्या सत्रांमधून सर्जनशीलता आणि नवोन्मेष समोर आले. या बौद्धिक मंथनातील विजेत्यांना प्रमाणपत्रे मिळाली आणि विशेष ओळख प्राप्त झाली.
या कार्यक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद मुंबईच्या तंत्रज्ञान तज्ञ समुदायाचा XR तंत्रज्ञानाबद्दलचा वाढता उत्साह दर्शवतो, असे मत XDG मुंबईचे संस्थापक,क्रुणाल एम बी गेडिया, यांनी व्यक्त केले. या क्षेत्रातील भागीदारांमधील सहकार्याने एक व्यासपीठ तयार केले आहे ज्यामुळे येऊ पाहणाऱ्या XR क्षेत्रातील निर्मिकांना शिकायची संधी आणि प्रेरणा देखील मिळेल, यावर त्यांनी जोर दिला.
XR क्रिएटर हॅकाथॉनमध्ये आतापर्यंत भारतातील सुमारे 150 शहरांमधून 2,200 निर्मिक सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाने देशाचे आभासी तंत्रज्ञाना मधील (इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीज) वाढते स्वारस्य दाखवून दिले आणि XR समुदायामध्ये नावीन्य आणि सहयोग वाढवण्याचे उद्दिष्ट असलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजचे यश अधोरेखित केले.
भारतातील उदयोन्मुख XR आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) नवंउद्योग (स्टार्टअप्स) देशाच्या डिजिटल रुपरेषेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण प्रगती करत आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रायोजित केलेले आणि WAVES आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंज सारख्या उपक्रमांचे प्रदर्शन करणारे यासारखे कार्यक्रम, इमर्सिव्ह तंत्रज्ञानामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताच्या वाटचालीच्या केंद्रस्थानी आहेत.
WAVES बद्दल माहिती, https://wavesindia.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) ही जागतिक ध्वनी-चित्र आणि करमणूक परिषद, माध्यम आणि मनोरंजन उद्योगात चर्चा, सहयोग आणि नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी एक प्रमुख मंच आहे. ही परिषद, आघाडीचे उद्योगपती, भागधारक आणि नवोदितांना एकत्र आणून, संधी, आव्हाने, जागतिक व्यापाराला चालना आणि या क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल करण्या बाबत विचारमंथन घडवून आणेल. आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून आकर्षक आशयघन निर्मिती करून, देशातील विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये पसरलेल्या गुणवंतांसह भारताने, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एक प्रमुख स्थान व्यापलेले आहे. ही परिषदत आशय निर्मिती, गुंतवणुकीचे गंतव्यस्थान आणि ‘क्रिएट इन इंडिया’ संधी तसेच जागतिक प्रसारासाठी भारताला एकाच ठिकाणी सर्व काही उपलब्ध करुन देण्याचे ठिकाण म्हणून चालना देईल.
***
S.Pophale/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090304)
Visitor Counter : 66