संरक्षण मंत्रालय
जवानांना लष्करी रणनीती आणि युद्धकौशल्यात पारंगत करण्यासाठी भारतीय लष्कर प्रशिक्षण संस्थांकडून होत असलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्र्यांनी केली प्रशंसा.
Posted On:
29 DEC 2024 5:22PM by PIB Mumbai
जवानांना लष्करी रणनीती आणि युद्ध कौशल्यांमध्ये पारंगत करण्यात भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण संस्था देत असलेल्या अमूल्य योगदानाचे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले आहे. त्यांनी 29 डिसेंबर 2024 रोजी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भारतीय लष्करातील इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत, मध्य प्रदेशातील महू येथील भारतीय लष्कराच्या तीन प्रमुख प्रशिक्षण संस्था - आर्मी वॉर कॉलेज, इन्फंट्री स्कूल आणि मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड इंजिनिअरिंग यांना भेट दिली.
आधुनिक उद्भवन आणि संशोधन केंद्राची (इंक्युबेशन अँड रिसर्च सेंटरर) स्थापना, तसेच तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि व्यवहारात उपयोग सक्षम करण्यासाठीच्या विविध सामंजस्य करारांबाबत राजनाथ सिंह यांना संबंधित अधिकारी कमांडंट यांनी माहिती दिली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील त्यांचे योगदान पाहण्यासाठी त्यांनी आर्मी मार्क्समनशिप युनिटला (नेमबाजी प्रशिक्षण केंद्र)भेट दिली. संरक्षण मंत्र्यांनी पायदळ संग्रहालयालाही (इन्फंट्री म्युझियम) भेट दिली. इथे त्यांना पायदळाचा इतिहास तसेच पायदळामध्ये आधुनिक शस्त्र आणि इतर सामुग्री समाविष्ट करण्याबाबत माहिती देण्यात आली.
संरक्षणमंत्र्यांनी AWC मध्ये, तिन्ही संस्थांमधील सर्व श्रेणींशी संवाद साधला. सैनिकांना संबोधित करताना त्यांनी, सीमांचे रक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेची हमी राखत असताना भारतीय लष्कराचे जवान दाखवत असलेल्या धैर्याची आणि सतर्कतेची प्रशंसा केली. “तुमचे समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या मेहनतीमुळे आणि वचनबद्धतेमुळेच आपला देश आणि त्याच्या सीमा अधिकाधिक सुरक्षित आणि मजबूत होत आहेत,” असे ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना, सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी सदैव सतर्क राहण्याचे आवाहनही केले.
तत्पूर्वी, राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशात महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेल्या भीम जन्मभूमी या स्मारकाला भेट दिली आणि त्यांच्या जन्मस्थानी भारतरत्न आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. सामाजिक समता आणि सक्षमीकरणासाठी आपले जीवन समर्पित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे निःस्वार्थ सेवेचे प्रतीक होते अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी बाबासाहेबांचा गौरव केला.
***
S.Kane/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2088786)
Visitor Counter : 60