कृषी मंत्रालय
शेती आणि बागायतीशी संबंधित विविध योजनांमार्फत पारंपरिक वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार उत्सुक – सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी
Posted On:
26 DEC 2024 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी शेती आणि बागायतीतील पारंपरिक वाणांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. नवी दिल्ली इथे आयोजित ‘हवामानानुसार लवचिक शेतीसाठी पावसावर शेती अवलंबून असलेल्या प्रदेशातील कृषिजैवविविधतेचे पारंपरिक वाणांमार्फत पुनरुज्जीवन’ या विषयावरील बहुपक्षीय परिषदेला ते संबोधित करीत होते. एनएमएनएफ, शेतकरी उत्पादन संघटना (एफपीओ), बियाणे विकास कार्यक्रम आणि एनएफएसएम यासारख्या शेती आणि बागायतीशी संबंधित विविध योजनांमार्फत पारंपरिक वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले मंत्रालय उत्सुक असल्याचे ते म्हणाले. पारंपरिक वाणांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की या वाणांची विलक्षण गुणवैशिष्ट्ये आहेत जसे की अधिक चांगली चव, सुगंध, रंग, दर्जा आणि भरपूर पोषणमूल्य इ. ही गुण वैशिष्ट्ये आवडणारा ग्राहकवर्ग असल्यामुळे ही वाणे गटागटांनी वाढवून मोठ्या किंमतीला बाजारपेठेत विकता येतील, असे त्यांनी उदाहरणे देऊन सुचविले.
या वाणांची गरज आणि त्यांना असलेल्या धोक्याच्या तुलनेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक कमी असल्याबाबत आश्वस्त करीत डॉ. फैज अहमद किडवाई यांनी सांगितले की ही गुंतवणूक करण्यासाठी राज्यांना प्रेरित करण्याचे ध्येय आहे.
तमिळ नाडू आणि ओदिशासह 10 राज्यांमधील मोठे शेतकरी, बीज बचाव करणारे व राज्यांच्या प्रतिनिधींनी देशी वाणे प्रदर्शनार्थ आणली आणि त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांबाबत आपापल्या यशापयशाचे अनुभव सांगितले. लोकसमुदायांद्वारे बियाणे व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि किमान हमी भावासाठी सरकारचे पाठबळ आणि बीज संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तळागाळात काम करणाऱ्या संघटनांचा सहभाग या घटकांच्या महत्त्वावर चर्चांमध्ये भर देण्यात आला.
हवामान बदलाच्या अनुषंगाने शेतीला धोका निर्माण झाला असल्यामुळे आणि पारंपरिक वाणे नाहीशी होऊ लागल्यामुळे पावसाळी शेतीच्या भागासाठी धोरणासह या विषयीच्या चर्चांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यशाळा घेण्यात आली. पारंपरिक वाणे वापरातून जपण्याबाबत सर्व भागीदारांचे एकमत झाले.
भारतातील 50% भूप्रदेशातील 61% शेतकरी पावसाळी शेतीवर अवलंबून आहेत त्यांची पारंपरिक वाणे जपण्यात महत्त्वाची भूमिका राहील, ही बाब कार्यशाळेत अधोरेखित झाली.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2088234)
Visitor Counter : 26