आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
शंभर दिवसांच्या तीव्र क्षयरोग मुक्ती अभियानाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण केली
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल यांनी खासदारांना देशव्यापी मोहिमेसंदर्भात देखरेख, जागरुकता निर्माण आणि समुदाय एकत्रीकरणासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले
Posted On:
18 DEC 2024 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2024
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल यांनी आज संसद लायब्ररी इमारतीतील बालयोगी सभागृहात 100 दिवसांच्या तीव्र क्षयरोग निर्मूलन मोहिमेविषयी सर्व पक्षांच्या खासदारांमध्ये जाणीवजागृती निर्माण केली. या मोहिमेची उद्दिष्टे, त्याअंतर्गत राबवण्यात येत असलेले महत्त्वाचे उपक्रम, मोहिमेला पाठिंबा देण्याबाबतची त्यांची भूमिका याविषयी खासदारांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला संसदेचे 250 खासदार उपस्थित होते. या अभियानाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी चालना देण्याचे वचन त्यांनी दिले.
मेळाव्याला संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट गाठण्यात खासदारांच्या महत्त्वपूर्ण नेतृत्वाच्या भूमिका अधोरेखित केल्या. खासदारांनी आपल्या मतदारसंघांमध्ये 100 दिवसांच्या तीव्र क्षयरोग निर्मूलन मोहिमेवर देखरेख ठेवावी, जनजागृती करावी आणि या आजाराविषयी असलेली धारणा किंवा गैरसमज दूर करून मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी समुदायाला एकत्रित करावे असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकारने 2015 पासून क्षयरोगाचे रुग्ण कमी करण्यात मिळवलेले यश अधोरेखित करून केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की हा दर जागतिक पातळीवरील दरापेक्षाही अधिक आहे. गेल्या दहा वर्षात या दिशेने केलेल्या खाजगी आरोग्य सेवा क्षेत्राशी संलग्नता, नि:क्षय पोषण योजना, रुग्णांना थेट लाभ हस्तांतरण समर्थन दुप्पट करणे आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या निदान आणि उपचार क्षमतेचे आधुनिकीकरण यांसारख्या विविध उपक्रमांविषयी खासदारांना माहिती देण्यात आली. तसेच क्षयरोगाच्या रुग्णांना उपचार मिळण्यात 1.75 लाख आयुष्यमान आरोग्य मंदिरांनी देखील मध्यवर्ती भूमिका बजावली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रतापराव जाधव यांनी क्षयरोगाविरोधातील लढ्यात पंचायती आणि टीबी चॅम्पियन्स बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेवर भर दिला. क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना यश मिळावे, यासाठी वस्ती पातळीवर क्षयरोग तपासणी सेवा पोहोचवण्याचे आणि जागरुकता निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी नमूद केले. या प्रयत्नांना पाठबळ देऊन ते जन आंदोलन बनवण्यासाठी त्यांनी खासदारांना प्रोत्साहन दिले.
क्षयरोगाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक टीबी विषयक अहवालात नोंद घेण्यात आल्याचे पटेल यांनी अधोरेखित केले. "भारताने क्षयरुग्णांच्या मृत्यूदरात 28% वरून 22% इतकी घट नोंदवण्यात तसेच, क्षयरोग उपचारांची पोहोच 32% वर नेण्यात यश मिळवले आहे," त्या म्हणाल्या.
क्षयरोगाचा तपास वाढवण्यासाठी, तसेच निदान आणि उपचार सुरू करण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी प्रगत स्क्रीनिंग आणि निदान तंत्रज्ञानाचा वापर करून क्षयरोग रुग्ण शोधण्याची मोहीम आयोजित केली जाईल.
त्याच बरोबर, क्षयरोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी, या कार्यक्रमा अंतर्गत, उच्च जोखीम असलेल्या रूग्णांना विशेष सेवा देण्यासाठी आणि नि-क्षय पोषण योजनेद्वारे अधिक पोषण सहाय्य प्रदान करण्यासाठी विशेष टीबी केअर यासारख्या अभिनव उपक्रमांची पोहोच वाढवली जाईल.
खासदारांना योजनेच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित नि-क्षय शिबिर घेण्यासह त्यांच्या भूमिकेची माहिती देण्यात आली. खासदारांना जन भागीदारीचा दृष्टीकोन कायम ठेवत, नि-क्षय शपथ घेण्यासाठी समुदायातील सदस्यांना एकत्र आणणे, समाजातील नेते, व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट्स यांना नि-क्षय मित्र बनण्याचे आवाहन देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
त्याच बरोबर, खासदारांना टीबी विजेते (टीबी चॅम्पियन) आणि नि-क्षय मित्रांचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान करण्याची विनंती करण्यात आली , ज्यामुळे या सामूहिक कृतीला आणखी प्रेरणा मिळेल.
शेवटी, खासदारांना टीबी मुक्त पंचायत प्रमाणीकरणासाठी पंचायती राज संस्थेच्या सदस्यांबरोबर काम करण्यासाठी, टीबीवर नियमित ग्रामसभा आयोजित करण्यासाठी आणि टीबी विषयक आवश्यक सेवांचा लाभ देताना सामूहिक जागरूकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
* * *
S.Patil/Bhakti/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085872)
Visitor Counter : 18