लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

विकास आणि शाश्वतता यामध्ये समतोल साधण्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आवाहन


लोकसभा अध्यक्षांनी भारतीय वन सेवेच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना केले संबोधित

Posted On: 18 DEC 2024 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2024

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विकास आणि शाश्वततेमध्ये समतोल साधण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हवामान बदल हे जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मिशन LiFE – पर्यावरणाला अनुकूल जीवनशैली’ सह, या आव्हानाचा सामना करण्यात भारत आघाडीवर आहे. ओम बिर्ला आज भारतीय वन सेवेच्या 2023-25 तुकडीच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या (ओटी) गटासाठी संसद भवन संकुलात आयोजित संसदीय प्रक्रिया आणि कार्यप्रणाली विषयक अभ्यासक्रमाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते.

लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (PRIDE), लोकसभा सचिवालय, द्वारे हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हवामान बदलाच्या आव्हानाविरोधातील मोहिमेचे नेतृत्व करण्याची भारतीय वन सेवेची (IFoS) स्वाभाविक जबाबदारी लक्षात घेऊन, बिर्ला यांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना देशाचे वनक्षेत्र वाढवण्यासाठी आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी नमूद केले की, भारतीय संस्कृतीत निसर्गाचा आदर केला जातो, जिथे आपण झाडांची पूजा करतो आणि पृथ्वीला आपली माता मानतो. ते पुढे म्हणाले की, निसर्गाप्रति असलेल्या या आदराने पर्यावरण संवर्धनाबाबतच्या आपल्या पद्धती आणि धोरणांना आकार दिला आहे. यामुळे केवळ देशातील वनउद्यानांची संख्या वाढून वनक्षेत्रांचा विकास करण्यासाठीचे विविध धोरणात्मक प्रयत्न झाले नाहीत, तर या प्रदेशांमधील पर्यटनालाही गती मिळाली.

बिर्ला यांनी नमूद केले की, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणीय असमतोल या मुद्द्यांवर संसदेत नियमितपणे चर्चा केली जाते. आत्मविश्वास, तसेच नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले तरुण अधिकारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी संसदेत मंजूर झालेल्या कायद्यांचा अभ्यास करावा आणि नव्या आव्हानांचा सामना कसा करावा, हे जाणून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. वन उत्पादनांचा वापर शास्त्रीय पद्धतीने व्हावा, आणि त्याला योग्य भाव मिळावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

संविधानाच्या स्वीकृतीला यंदा 75 वर्ष पूर्ण झाल्याचे नमूद करून, भारतीय राज्यघटना आज जगासाठी मार्गदर्शक प्रकाश स्रोत झाल्याचे ओम बिर्ला म्हणाले. राज्यघटनाकारांच्या दूरदृष्टीमुळे  भारतीय संविधानात न्याय, समता, बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांचा समावेश करण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बिर्ला यांच्या बरोबर अधिकारी प्रशिक्षणार्थींनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

 

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2085846) Visitor Counter : 37