युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
देशभरात फिटनेस अर्थात तंदुरुस्ती आणि शाश्वततेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय युवाव्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी "फिट इंडिया सायकल अभियानाचा" केला प्रारंभ
हरित भविष्यासाठी सायकलस्वारी : फिट इंडिया सायकल अभियान देशभरातील 1,000 ठिकाणी पोहोचले
Posted On:
18 DEC 2024 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 18 डिसेंबर 2024
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण येथे फिट इंडिया सायकल अभियानाचा प्रारंभ केला. सायकल हे वाहतुकीसाठी एक आरोग्यपूर्ण आणि शाश्वत साधन असल्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे राष्ट्रव्यापी अभियान राबवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताबद्दलचे स्वप्न आपल्याला प्रत्यक्षात साकार करायचे आहे. सायकल चालवणे हा प्रदूषणावर उत्तम उपाय असून ते शाश्वततेला चालना देणारे साधन आहे, असे मांडवीय यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत देशभरात 1,000 हून अधिक ठिकाणी फिट इंडिया सायकल अभियान राबवण्यात आले असून त्यात 50,000 पेक्षा अधिक जणांनी भाग घेतला आहे. या अभियानामुळे सामुदायिक संवाद, तंदुरुस्ती आणि पर्यावरणाविषयीची जाणीव वाढीस लागते, असे त्यांनी सांगितले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबईतील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राने 17 डिसेंबर 2024 रोजी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 8 किमी सायकलिंग इव्हेंटचे आयोजन केले होते यात प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह 150 जण सहभागी झाले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक आणि राष्ट्रकुल स्पर्धा रौप्य पदक विजेत्या ममता प्रभू, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि कुस्ती प्रशिक्षक राज सिंग चिकारा यांची प्रमुख उपस्थिती होती. तंदुरुस्तीसाठी सायकल चालवण्याचे महत्त्व आणि पर्यावरणावर त्याचा सकारात्मक परिणाम यावर त्यांनी भर दिला. यावेळी वनाधिकारी विशाल सावंत आणि मुकेश सोनवणे यांनीही हजेरी लावत प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवण्याविषयीचे महत्व अधोरेखित केले.
मुंबईतील या कार्यक्रमाव्यतिरिक्त भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबईतील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या अखत्यारीतील 11 ठिकाणी अशा प्रकारची मोहीम राबवण्यात आली. फिट इंडिया सायकल मोहिमेमध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध ठिकाणी व्यापक सहभाग दिसून आला, त्यात सिल्वासा येथील खेलो इंडिया राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, औरंगाबाद येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवाडे येथील राष्ट्रीय तालीम संघ यांसारख्या प्रमुख केंद्रांचा समावेश आहे.

एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी आणि पुण्यातील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सने देखील सायकल अभियान आयोजित केले होते, या अभियानाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्व उपस्थितांना तंदुरुस्ती आणि शाश्वतता विषयक मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या गोव्यातील फोंडा आणि पणजी येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राने देखील हा देशव्यापी उपक्रम आयोजित केला होता, तर जळगावमधील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलानेही या अभियानात भाग घेतला. या उपक्रमात 1,600 हून जणांनी एकत्रित सहभाग घेतला, यात खेळाडू, विद्यार्थी, पालक, स्थानिक सायकलिंग क्लब आणि माय भारतचे स्वयंसेवक यांचा समावेश होता.
फिट इंडिया सायकलिंग अभियान हे तंदुरुस्ती, पर्यावरणाविषयी जाणीव जागृती आणि सामुदायिक ऐक्य वाढवण्याच्या चळवळीच्या ध्येयाचे प्रतीक आहे. या अभियानातील व्यापक सहभागामुळे हा उपक्रम फिट इंडिया चळवळीच्या अनुषंगाने निरोगी, हरित भविष्यासाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.
* * *
PIB Mumbai | S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2085814)
Visitor Counter : 39