ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
प्रमुख ई-कॉमर्स मंच राष्ट्रीय ग्राहक दिन, 2024 रोजी ग्राहकांच्या सुरक्षेची प्रतिज्ञा घेणार
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे ई-कॉमर्स मंचांसाठी सुरक्षा प्रतिज्ञेचा मसुदा जाहीर
ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य असलेल्या सुरक्षा प्रतिज्ञेद्वारे ई-कॉमर्स मंचांना जनतेप्रती बांधिलकी निभावणे शक्य
Posted On:
14 DEC 2024 11:20AM by PIB Mumbai
अजिओ, जिओमार्ट, नेटमेड, बिग बास्केट, टाटा क्लिक, टाटा 1mg, झोमॅटो आणि ओला यांच्यासारखे प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 24 डिसेंबर 2024 रोजी साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन, 2024च्या निमित्ताने सुरक्षा प्रतिज्ञा स्वीकारणार आहेत.
सुरक्षा प्रतिज्ञा ही असुरक्षित, बनावट आणि अविश्वासार्ह उत्पादनांचा शोध घेऊन त्यांच्या विक्रीस आळा घालणे, उत्पादनांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या वैधानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, विक्रेत्यांना ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या सुरक्षेबद्दल अधिक सजग करणे आणि उत्पादन सुरक्षिततेबद्दल ग्राहकांना सक्षम बनवणे यासाठी ई-कॉमर्स मंचांनी स्वेच्छेने पाळावयाची वचनबद्धता आहे.
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने ई-कॉमर्स मंचांसाठी सुरक्षा प्रतिज्ञा जाहीर केली आहे. या सुरक्षा प्रतिज्ञेच्या अनुषंगाने झालेल्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने या क्षेत्रातील सर्व भागधारकांसोबत विचार विनिमय करण्यासाठी 16.11.2023 रोजी एक बैठक घेतली. त्याचवेळी 21.11.2023 रोजी प्रतिज्ञेचा मसुदा तयार करण्यासाठी ग्राहक हक्कांसाठी काम करणाऱ्या प्रसिद्ध कार्यकर्त्या आणि पत्रकार पुष्पा गिरिमाजी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख ई-कॉमर्स संस्था, उद्योग संस्था आणि कायदेशीर अध्यक्ष अशा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली.सुरक्षा प्रतिज्ञेचा मसुदा तयार करून तो ग्राहक व्यवहार विभागाकडे सादर करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले होते. समितीने सांगोपांग सल्लामसलत केल्यानंतर आणि विभागाकडून छाननी केल्यानंतर प्रतिज्ञेचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे.
विशेषत: जेव्हा प्रत्यक्ष विक्रेत्याचा शोध घेता येत नाही किंवा तो जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक नसतो नसतो अशा परिस्थितीत त्या वस्तूचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या समस्येचे सक्रियपणे निराकरण करण्यासाठी अनौपचारिकपणे ही वचनबद्धता पाळली जावी म्हणून जगभरातील अनेक अधिकारक्षेत्रांखाली येणाऱ्या ई-कॉमर्स मंचांनी स्वेच्छेने ही सुरक्षा प्रतिज्ञा घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहित केले गेले आहे.
ई-कॉमर्सच्या विशिष्ट स्वरूपामुळे, जिथे खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांची प्रत्यक्ष पारख करणे शक्य नसते, तिथे तिथे उत्पादने सुरक्षा मानकांची पूर्तता करणारी आणि विशिष्ट नियमांना धरून असतील ही अपेक्षा गृहीत धरलेली असल्याने उत्पादनाच्या सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित होते. परिणामी, ऑनलाइन खरेदीदारांच्यादृष्टीने उत्पादनाची सुरक्षितता ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.
ई-कॉमर्स मंचांवर असुरक्षित किंवा बंधनकारक असलेल्या मानकांची पूर्तता न करणाऱ्या उत्पादनांची विक्री झाल्यास ग्राहकांच्या आणि जनतेच्या सुरक्षिततेला आणि हिताला लक्षणीय धोका उद्भवू शकतो. गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) अंतर्गत मानकांची पूर्तता करणे आवश्यक असलेल्या उत्पादनांच्या बाबतीत हे विशेष महत्त्वाचे ठरते.
सुमारे 880 दशलक्ष एवढ्या संख्येने वापरकर्ते असलेली भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ आहे. वर्ष 2030 पर्यंत, भारतातील खरेदीदारांची संख्या 500 दशलक्षवर जाण्याचा अंदाज असून जागतिक स्तरावर ऑनलाइन खरेदीदार वर्गाची सर्वाधिक संख्या असलेली ती दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असेल [स्रोत: Invest India Ecommerce Brochure.pdf]. भारतातील ई-कॉमर्सचा सातत्याने होत असलेला विस्तार पाहता, ऑनलाइन विक्री केल्या जाणाऱ्या उत्पादनांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने गरजेचे आहे.
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मध्ये उत्पादन खरेदी करताना सुरक्षा आणि उत्पादन मानकांचे महत्त्व नमूद केले गेले आहे. कायद्याच्या कलम 2(9) मध्ये सांगितलेल्या 'ग्राहकां हक्क' मध्ये नमूद केल्या नुसार जीवित आणि मालमत्तेसाठी धोकादायक असलेल्या वस्तू, उत्पादने किंवा सेवांच्या विपणनाच्या विरोधात संरक्षण मिळण्याचा तसेच वस्तूंची गुणवत्ता, प्रमाण,क्षमता, दर्जा आणि किंमत याबद्दल माहिती करून घेण्याच्या अधिकाराचा समावेश आहे.
कायद्याच्या कलम 2(47) अन्वये परिभाषित केल्यानुसार वस्तू एखाद्या विशिष्ट मानक, दर्जा, प्रमाण, श्रेणी, रचना, पद्धतीची किंवा मॉडेल आहे असे खोटेपणाने भासविणे ही ' व्यापाराची अयोग्य पद्धत' आहे. या शिवाय, सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअंतर्गत पालन करणे बंधनकारक असलेल्या मानकांची पूर्तता न करणाऱ्या वस्तू कायद्याच्या कलम 2(10) अन्वये 'दोषपूर्ण' मानल्या जातील असेही म्हटलेले आहे.
ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम, 2020 च्या नियम 4(3) अंतर्गत ई-कॉमर्स संस्थांसाठी निर्धारित केलेल्या कर्तव्यांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर व्यवसाय करताना किंवा इतरत्र कुठेही कोणत्याही अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब न करण्याच्या कलमाचाही समावेश आहे.
***
H.Akude/M.Ganoo/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2084428)
Visitor Counter : 46