शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधला संवाद
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या भव्य अंतिम फेरीचे केले उद्घाटन
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर 7 व्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 च्या भव्य अंतिम सोहळ्याचे भूषवत आहेत यजमानपद
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024: वास्तविक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता एक राष्ट्रव्यापी नवोन्मेष आव्हान
Posted On:
12 DEC 2024 3:20PM by PIB Mumbai
मुंबई, 12 डिसेंबर 2024
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीच्या उद्घाटन दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांसह वेगाने प्रगती करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महाअंतिम फेरीची मी आतुरतेने वाट पाहत होतो”, असे पंतप्रधान म्हणाले. युवा नवोन्मेषकांसोबत आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, मुंबईच्या मिस्टिक ओरिजनल्सच्या टीम लीडरने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे प्रदान केलेल्या सुरक्षा आव्हानाचा सामना करण्याविषयी माहिती दिली. याअंतर्गत माइक्रो डॉपलर आधारित लक्ष्य वर्गीकरण, जसे की देण्यात आलेली वस्तू पक्षी आहे की ड्रोन ओळखण्यास साहाय्यभूत करण्याचे आव्हान त्यांना देण्यात आले. टीम लीडरने अधिक माहिती देताना सांगितले, रडारवर पक्षी आणि ड्रोन सारखे दिसत असल्याने चुकीचा इशारा दिला जाऊ शकतो आणि यातून संभाव्य सुरक्षा धोका, विशेषतः संवेदनशील क्षेत्रात उद्भवू शकतो.
चमूतल्या दुसऱ्या सदस्याने उपायाचे तपशीलवार विश्लेषण सादर केले. मानवाच्या वैशिष्ट्यपूर्ण बोटांच्या ठशांप्रमाणेच मायक्रो डॉप्लर सिग्नेचर्स विविध वस्तूंद्वारे निर्माण होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यांचा उपयोग करते. त्यावर पंतप्रधानांनी विचारले, उपायांतर्गत वेग, दिशा आणि अंतर ओळखता येते का? त्यावर हे लवकरच साध्य होईल, असे चमूतल्या सदस्याने सांगितले. ड्रोनचे विविध सकारात्मक उपयोग आहेत, मात्र काही शक्ती ड्रोन्सचा उपयोग इतरांना इजा पोहोचवण्यासाठी करतात आणि हे सुरक्षा आव्हान बनले असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अशा प्रकारचे आव्हान भेदण्यास उपाय सक्षम आहे का, या पंतप्रधानांच्या प्रश्नावर चमूतल्या सदस्याने प्रक्रिया विशद केली. हे एक कॉम्पॅक्ट सोल्यूशन असून हे किफायतशीर उपकरणांवर वापरले जाऊ शकते आणि विविध प्रकारच्या वातावरणात अनुकूल आहे. पंतप्रधानांनी देशातील विविध क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर प्रकाश टाकला आणि नमो ड्रोन दीदी योजनेचे उदाहरण दिले. देशातील दुर्गम भागात औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ड्रोनच्या वापराचा उल्लेखही त्यांनी केला. तर शत्रू त्यांचा वापर सीमेपलीकडून बंदुक आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी करतात.
राष्ट्रीय सुरक्षेच्या अशा समस्यांना तोंड देण्यासाठी युवा नवोन्मेषक अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाबद्दल येथे अधिक जाणून घ्या.त्यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या भव्य अंतिम फेरीचे आभासी माध्यमातून उदघाटन केले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार देखील उदघाटन समारंभाला उपस्थित होते. उदघाटन समारंभाबद्दल येथे आणखी वाचा. 7वी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) 11 डिसेंबर 2024 रोजी देशभरातील 51 नोडल केंद्रांवर एकाच वेळी सुरू झाली. सॉफ्टवेअर एडिशन सलग 36 तास चालेल, तर हार्डवेअर एडिशन 11 ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहील.महाराष्ट्रात, मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या महाअंतिम फेरीचे यजमानपद भूषवत असून तिन्ही केंद्रांमध्ये राष्ट्रीय उद्घाटनापूर्वी कार्यक्रमाचे स्थानिक उद्घाटन झाले.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चे मुंबईतील आयोजन स प मंडळी यांच्या प्रिं. एल एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास व संशोधन संस्थेने केले आहे. उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश ब्राह्मणकर, नवोन्मेष संचालक, शिक्षण मंत्रालय , तर मान्यवर अतिथी म्हणून राहुल चंदेलिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, WOL3D, निलेश लेले,अध्यक्ष, लघु व मध्यम उद्योग विकास मंडळ, कॅप्टन मयांक कुक्रेती,(राष्ट्रीय सुरक्षा बल ) आणि वेंकट नागभूषणम जेट्टी, उप व्यवस्थापक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. उपस्थित होते.
स्पर्धा केंद्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता / मशीन लर्निंग, अनॅलिटीक्स, इमेज अनॅलिटीक्स व प्रॉब्लेम स्टेटमेंट्स या विषयांवरील स्पर्धांमध्ये 34 संघ सहभागी झाले होते. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चा मुंबईतील समारोप 12 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळच्या समारोप सत्रानंतर होईल.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या भोपाळच्या ओरिएंटल विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या मुस्कान मिश्रा हिने सांगितले, “आम्ही महिलांची सुरक्षा हा विषय निवडला होता. महिलांना त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणी येतात याबद्दल एक अल्गोरिदम वापरून त्यावर उपाययोजना कशी करावी हे सांगणारे एक ऍप आम्ही विकसित केले होते. आम्हाला आशा आहे कि आम्ही हि स्पर्धा नक्कीच जिंकू.”
पुण्यामधील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चे आयोजन एम आय टी कला, डिझाईन व तंत्रज्ञान विद्यापीठाने केले होते. पुण्यातील या कार्यक्रमाला अभिषेक रंजन, नवोन्मेष अधिकारी, शिक्षण मंत्रालय, डॉ मोहित दुबे, प्रकुलगुरू, एम आय टी ए डी टी विद्यापीठ, डॉ महेश चोपडे, रजिस्ट्रार, डॉ रेखा सुगंधी, नोडल अधिकारी, तसेच इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 साठी निवडलेल्या देशभरातल्या 51 नोडल केंद्रांमध्ये नागपूरच्या जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाली होती. या केंद्रात 20 संघांनी नोंदणी केली होती. त्यातील सॉफ्टवेअर विभागात 11 व 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धांमध्ये 120 स्पर्धक व 24 मेंटॉर समाविष्ट आहेत. उदघाटन समारंभात सुनील रायसोनी, संचालक, रायसोनी समूह, शिव सोनी, वरिष्ठ टेक्निकल आर्किटेक्ट, इन्फोसिस, डॉ रिझवान अहमद, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, डेलाप्लेक्स आणि सुनील उंटवाले, संचालक, जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय,हिंगणा, नागपूर हे उपस्थित होते.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 बद्दल माहिती:
दैनंदिन आयुष्यातील महत्वाच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यादृष्टीने आयोजित केलेला स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा एक राष्ट्रव्यापी उपक्रम आहे. नवोन्मेष व समस्या निराकरणासाठीचे व्यावहारिक कौशल्य विकसित करणारी संस्कृती जोमाने तयार व्हावी यासाठी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन (SIH) मध्ये दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर व्यवहार्य उपाययोजना सुचवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.

SIH बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
यावर्षी 54 मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या व उद्योगांकडून 250 समस्या विधाने प्राप्त झाली होती. संस्था पातळीवरील अंतर्गत हॅकॅथॉन च्या संख्येत 150% वाढ झाली असून 2023 सालात आयोजित झालेल्या 900 हॅकॅथॉन वरून ही संख्या 2024 सालात 2,247 पर्यंत पोचली आहे. त्यामुळे यावर्षीचे आयोजन आतापर्यंतचे सर्वात मोठे आयोजन ठरले आहे. SIH 2024 मध्ये संस्था पातळीवर 86,000 हुन अधिक संघ सहभागी झाले असून संस्थांनी 49,000 विद्यार्थी संघ ( प्रत्येकी 6 विद्यार्थी व 2 मेंटॉर्स) राष्ट्रीय पातळीवर पाठवले होते.
यावर्षीदेखील मंत्रालये, विभाग व उद्योगांनी 17 राष्ट्रीय महत्वाच्या विषयांमधून विद्यार्थी नवोन्मेष श्रेणीसाठी सादर केलेल्या कल्पनांवर विद्यार्थ्यांचे संघ काम करणार आहेत. या मध्ये आरोग्यसेवा, पुरवठा साखळी व लॉजिस्टिकस, स्मार्ट तंत्रज्ञान, परंपरा व संस्कृती, शाश्वत विकास, शिक्षण व कौशल्य विकास, पाणी, कृषी व अन्न, उभरते तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा समावेश होता.
यावर्षीच्या उपक्रमात इसरो ने सादर केलेले चंद्रावरील अंधारलेल्या भागाचे चित्रण, जल शक्ती मंत्रालयाने सादर केलेली उपग्रह माहिती, IoT, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गंगा नदी पाणी गुणवत्ता सर्वेक्षण पद्धत आणि आयुष मंत्रालयाने सादर केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट योग मॅट ही काही उल्लेखनीय समस्या विधाने होती.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/Sonali/Uma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2083689)