युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एशिया-पॅसिफिक डेफ गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय संघाचा डॉ.मनसुख मांडविया यांनी केला सन्मान

Posted On: 09 DEC 2024 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2024

मलेशियामध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या 10 व्या एशिया-पॅसिफिक डेफ गेम्समध्ये तब्बल 55 पदके जिंकून इतिहास घडवणाऱ्या भारतीय संघाला आज मायदेशी परतल्यावर,केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगारमंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यापूर्वी 2015 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने केवळ 5 पदके जिंकली होती, त्या तुलनेत यंदा तब्बल 11 पट वाढ झाली आहे.

42 पुरुष आणि 26 महिला खेळाडू असलेल्या या 68 सदस्यांच्या चमूने 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 29 कांस्य पदके पटकावून या स्पर्धेत  अभूतपूर्व कामगिरी करत 21 देशांच्या पदकतालिकेत पाचवे स्थान पटकावले.1984 पासून या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धांमध्ये भारताने केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.यापूर्वी 2015 मध्ये तैवानमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये भारतीय चमूने दोन सुवर्ण तीन रौप्य पदकांसह एकूण पाच पदके मिळवली होती.तर 2019 ची स्पर्धा हाँगकाँगमधील अस्थिर परिस्थितीमुळे रद्द झाली होती.

या कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय संघातील खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी वर्गाचे त्यांच्या निवासस्थानी एका विशेष कार्यक्रमात संवाद साधताना अभिनंदन केले.

"मलेशियात झालेल्या एशिया पॅसिफिक डेफ गेम्समध्ये 55 पदके पटकावून देशाची मान अभिमानाने उंचावून गौरव प्राप्त करून देणाऱ्या भारतीय श्रवण-विकलांग चमूचे मी अभिनंदन करतो.आपला देश क्रीडा क्षेत्रात आगेकूच करत आहे.भारत सरकार क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी, शासन आणि विशेष प्रकारच्या प्रशिक्षण सुविधा देण्यासाठी  विविध पावले उचलत आहे. ज्यावेळी तुम्ही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी होता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःसाठी जिंकत नाही तर तुमच्यासोबत तुम्ही देशाला देखील विजयी करता," असे मांडविया यांनी या चमूला संबोधित करताना सांगितले.

"2015 मध्ये आपण लहानसे पथक पाठवले होते आणि केवळ काही पदके मिळवून परतलो होतो. पण आता मला हे सांगायला अतिशय अभिमान वाटतो की यावेळी एशिया-पॅसिफिक क्रीडा स्पर्धांमध्ये 7 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 68 खेळाडू सहभागी झाले आणि त्यांनी तब्बल 55 पदकांची कमाई केली. आपल्या देशात अतिशय सकारात्मक बदल होत आहे आणि देश योग्य दिशेने पुढे जात आहे याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे." डॉ.मांडविया म्हणाले.

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2082459) Visitor Counter : 28