संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्कर आणि सिंगापूरचे सशस्त्र दल यांच्यामधील द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव उपक्रमा अंतर्गतच्या अग्नी वॉरियर - 2024 या संयुक्त सरावाची यशस्वी सांगता
Posted On:
30 NOV 2024 3:39PM by PIB Mumbai
भारतीय लष्कर आणि सिंगापूरचे सशस्त्र दल यांच्यामधील द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव उपक्रमा अंतर्गतच्या अग्नी वॉरियर (XAW - 2024) या तेराव्या पर्वातील सरावाचा आज दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी समारोप झाला. महाराष्ट्रात देवळाली इथल्या फील्ड फायरिंग रेंज इथे या सरावाचे आयोजन केले होते. 28 ते 30 नोव्हेंबर 2024 अशा तीन दिवसांच्या कालावधीत हा सराव फार पडला. या सरावात सहभागी झालेल्या सिंगापूरच्या सशस्त्र दलाच्या तुकडीत सिंगापूर तोफखान्याचे 182 जवान आणि भारतीय लष्कराच्या तुकडीत भारतीय तोफखान्याच्या 114 जवानांचा समावेश होता.
संयुक्त राष्ट्रांच्या करारा अंतर्गत बहुराष्ट्रीय दल म्हणून संलग्नता प्राप्त करण्यासाठी परस्परांची सरावपद्धती आणि कार्यपद्धतींचे जास्तीत जास्त आकलन करून घेणे हे या XAW - 2024 च्या संयुक्त सरावाचे उद्दीष्ट होते. या सरावामध्ये दोन्ही सैन्याच्या तोफखान्यानी संयुक्त मारक क्षमतेचे नियोजन, अंमलबजावणी आणि नवीन पिढीच्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्याबाबतची प्रात्यक्षिके सादर केली.
या संयुक्त सरावाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भारतीय तोफखान्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अदोष कुमार, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एनएस सरना आणि सिंगापूर सशस्त्र दलाच्या शस्त्रागाराचे मुख्य अधिकारी कर्नल ओंग चिओ पेरंग उपस्थित होते. या सरावात सहभागी झालेल्या जवानांनी सर्वोत्तम दर्जाची व्यावसायिक तज्ञता आणि कौशल्याचे दर्शन घडवणारी प्रात्यक्षिके सादर केल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी सहभागी जवानांची प्रशंसा केली.
या सरावामध्ये व्यापक संयुक्त नियोजन आणि तयारी, समन्वय, परस्परांची क्षमता आणि कार्यपद्धती समजून घेणे तसेच भारत आणि सिंगापूरच्या तोफखाना यांच्यात प्रक्रिया विषयक व्यवस्थेतील परस्पर सामायिक इंटरफेस विकास अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या सरावाअंतर्गत सिंगापूरच्या सशस्त्र दलाच्या जवानांनी अग्नि शक्ती नियोजनाशी संबंधित जटील आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेशी संबंधीत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्याबाबतचे ज्ञान प्राप्त केले. सरावादरम्यान दोन्ही देशांच्या सहभागी जवानांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि संयुक्त प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण केली.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079397)
Visitor Counter : 44