iffi banner
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'आसमान से आया फरिश्ता:' मोहम्मद रफी - सुरावटींचा बादशहा


55 व्या इफ्फीमध्ये शाहिद रफी, सुभाष घई, अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांच्या उपस्थितीत मोहम्मद रफी यांच्या शताब्दीनिमित्त विशेष सत्र

कर्जनंतर मी केलेल्या प्रत्येक चित्रपटात मी मोहम्मद रफींचा शोध घेतला : सुभाष घई

रफींचे गानभांडार ही स्वतःच एक संस्था आहे: सोनू निगम

त्यांचा नम्र स्वभाव अनुकरणीय होता - अनुराध पौडवाल

#IFFIWood, 27 नोव्‍हेंबर 2024

 

महान गायक मोहम्मद रफी यांच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून, 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दिग्गज गायक रफी यांचे पुत्र शाहिद रफी,ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई प्रख्यात संगीतकार अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांची उपस्थिती असलेल्या एका विशेष सत्रात या महापुरुषाला श्रद्धांजली वाहण्यात आली.

'आसमान से आया फरिश्ता' शीर्षकाचे सत्र - मोहम्मद रफी - सुरावटींचा बादशहा - प्रतिष्ठित गायकाचे जीवन, कार्य आणि वारसा यांचा शोध होता.

आपल्या दिग्गज वडिलांच्या प्रभावाचे स्मरण करून, शाहिद रफी म्हणाले, “आमच्यासाठी ते आमचे वडील, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ होते. ते एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असल्याचे आम्हाला आयुष्यात फार उशिरा जाणवले. माझ्यासाठी आणि माझ्या भावंडांसाठी ते नेहमीच एक तत्पर वडील होते.” रफी म्हणाले की, भारतीय संगीत उद्योगात एवढं मोठं नाव असूनही त्यांचे वडील नेहमीच सर्वांशी प्रेमाने वागत होते.

पद्मश्री पुरस्कार विजेते मोहम्मद रफी यांनी देशातील विविध बोली आणि भाषांमध्ये एक हजाराहून अधिक गाणी गायली आहेत.

रफी यांनी गायलेल्या अनेक गाण्यांचे उदाहरण देत गायक सोनू निगम म्हणाले, “माझ्यासाठी मोहम्मद रफी हे माझे गुरू आणि माझ्या संगीताचे देव आहेत. रफींचा संग्रह ही एक संस्था आहे. प्रत्येक वेळी मी त्यांचे संगीत ऐकतो तेव्हा मला काहीतरी नवीन शिकायला मिळते. संगीताची भाषा आणि स्वर यावर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते.” 

पार्श्वगायनात आम्ही कारकीर्द सुरू केली तेव्हा आमच्याकडे अनेक संदर्भ मुद्दे होते, परंतु त्यांच्याकडे एकही नव्हता. त्यांनी स्वतःचा संगीताचा ब्रँड अनेक प्रयोग करत कसा तयार केला, हा पिढ्यांसाठी अभ्यासाचा विषय आहे”, त्यांनी टिप्पणी केली.

आपल्या कौशल्याबद्दल आणि वारशाबद्दल बोलताना सोनू निगम म्हणाले, “मोहम्मद रफींनी गायले तेव्हा ते गाणेच गायक झाले. त्यांनी पार्श्वगायनात काही बारकावे आणले. पार्श्वगायनाचे ते आजोबा आहेत . तुम्हाला गाण्याची भाषा माहीत नसली तरीही मोहम्मद रफी यांनी गायलेले गाणे आनंदी, दु:खद किंवा चपखल गाणे आहे की नाही हे तुम्हाला कळेल”

“चित्रपटात ते पार्श्वगायन करायचे तेव्हा ते गाणे कलाकारच गात आहे, असे वाटे. त्यांची स्वरांवरची हुकुमत अशी होती,” ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल म्हणाल्या.

त्यांच्या मृदू स्वभावाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मी पहिल्यांदा रफी साहेबांबरोबर गायले, त्यावेळी मी खूप लहान होते. ते अत्यंत साधे आणि शांत होते आणि माझ्यासारख्या नवीन कलाकाराला सहकार्य आणि सहयोग देणारे होते. करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अशा थोर कलाकाराबरोबर काम करून खूप काही शिकण्याची संधी मला मिळाली.” त्या म्हणाल्या.

संगीतातील उस्तादाबरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगताना चित्रपट निर्माते सुभाष घई म्हणाले, “माझ्या ‘कर्ज’ या चित्रपटातील दर्द ए दिल हे गाणे रफी साहेबांनी गावे अशी माझी इच्छा होती. त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि त्यांनी ते गाणे गायले. त्यांनी गाण्याची पहिली ओळ गायली, आणि मला माझ्या चित्रपटासाठी हिट गाणे मिळाले असे वाटले.” पण, चित्रपटानंतर लगेचच या महान गायकाचे निधन झाले. घई पुढे म्हणाले, “कर्ज नंतर, माझ्या  प्रत्येक चित्रपटात मी मोहम्मद रफीचा शोध घेतला. पण चित्रपट उद्योगात पार्श्वगायनासाठी मोहम्मद रफी यांनी जे योगदान दिले, त्याच्याशी कोणीच बरोबरी करू शकत नाही.”

“गायक त्यांना आवडेल तसे गाऊ शकतात, पण पार्श्वगायकांना चित्रपटाचा मूड आणि टोनला साजेसे आणि गाण्यातील अभिनेत्याच्या आवाजाला अनुरूप असे गावे लागते. मोहम्मद रफी यात निष्णात होते, ते चित्रपटाच्या मांडणीशी उत्तम प्रकारे जुळवून घेत असत” घई यांनी सांगितले.

प्रश्नोत्तराच्या सत्रात मोहम्मद रफी यांच्यावरील बायोपीक बद्दल बोलताना शाहिद रफी यांनी सांगितले की प्रसिद्ध चित्रपट निर्माते उमेश शुक्ला लवकरच या महान गायकावरील बायोपिकची घोषणा करणार आहेत.

55 व्या इफ्फीमध्ये भारतीय सिनेमाच्या अनेक पैलूंना आकार देणाऱ्या, राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव (ANR), आणि मोहम्मद रफी या सिने क्षेत्रातील चार दिग्गज कलाकारांना आदरांजली वाहिली जात आहे. यंदाच्या इफ्फी मध्ये चित्रपटांचे स्क्रीनिंग आणि संवादात्मक कार्यक्रमांच्या मालिकेतून या दिग्गज कलाकारांच्या असामान्य योगदानाला अभिवादन केले जात आहे.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Nandini/Rajashree/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2078222) अभ्यागत कक्ष : 59