ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हॉलमार्किंग मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीआयएस सक्तवसुली विभागाची परेश ज्वेलर्सवर कारवाई

Posted On: 27 NOV 2024 5:38PM by PIB Mumbai

मुंबई, 27 नोव्हेंबर 2024

'बीआयएस'अर्थात भारतीय मानक ब्युरो ही बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली भारताची राष्ट्रीय प्रमाणक संस्था आहे. मानक निश्चिती, उत्पादनांचे प्रमाणीकरण, प्रयोगशाळेत चाचणी आणि प्रणालीचे प्रमाणीकरण ही बीआयएसची मुख्य कार्ये आहेत.

नागरिकांना सुरक्षित, खात्रीलायक आणि दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करून, ग्राहकांन असलेले आरोग्यविषयक धोके कमी करून आणि पर्यावरणाचे रक्षण करून बीआयएस राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे.बीआयएसच्या प्रमाणके आणि उत्पादन प्रमाणीकरण योजना सामान्य ग्राहक तसेच उद्योगांचा लाभ करून देण्यासोबतच उत्पादनाची सुरक्षितता, ग्राहकांची सुरक्षितता, अन्न सुरक्षा, पर्यावरण, इमारत उभारणी तसेच बांधकाम इत्यादीच्या संदर्भातील सार्वजनिक धोरणांना देखील पाठबळ पुरवते.

बीआयएस कायदा 2016 नुसार, वैध प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी अँड गोल्ड आर्टिफॅक्ट्स चे उल्लंघन आदेश 2020 अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या वस्तूंचे बीआयएस हॉलमार्क असल्याविना उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाडेकराराने घेणे, लीजवर घेणे, विक्रीसाठी साठवण किंवा प्रदर्शन करता येणार नाही. नागरिकांना परवानाधारक, विक्रेता इत्यादींवर दंड अथवा दायित्वविषयक मदत मागण्यासाठी  पुढील लिंकचा वापर करून बीआयएस कायदा 2016 ची मदत घेता येईल:
https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2020/12/BIS-Act-2016.pdf

हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी अँड गोल्ड आर्टिफॅक्ट्स आदेश 2020 चे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यावर त्वरित प्रतिसाद देत बीआयएसच्या मुंबई शाखा कार्यालय-II मधील अधिकाऱ्यांच्या पथकाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील परेश ज्वेलर्स या दुकानावर छापा घातला. तपासणीअंती असे आढळून आले की या दुकानात बीआयएस हॉलमार्क नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा आणि वस्तूंचा साठा करून विक्री होत आहे. बीआयएस कायदा 2026 मधील 15व्या कलमाचे उल्लंघन होत असल्यावरून सदर माल ताब्यात घेण्यात आला. या कलमाअंतर्गत सदर कायद्याच्या उल्लंघनासाठी एका वर्षापर्यंत कारावास किंवा/आणि किमान 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा देण्यात येऊ शकते. सदर गुन्ह्याची नोंद करून कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

सोन्याचे दागिने तसेच वस्तू यांच्या हॉलमार्किंगबाबत आदेश 2020 च्या उल्लंघनासंदर्भात सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, फसव्या व्यापार पद्धती आणि फसवणूक याबद्दलची माहिती कळवण्याच्या सूचना जनतेला करण्यात आल्या आहेत. बीआयएस नोंदणी चिन्ह/ सोन्यासाठीचा हॉलमार्क यांचा गैरवापर तसेच सोन्याचे दागिने आणि वस्तू यांची बीआयएस परवान्याविना विक्री होत असल्याचे आढळून आल्यास बीआयएसच्या पवई येथील मुंबई शाखा कार्यालय क्र.II मध्ये कळवावे अथवा बीआयएसकेअर या मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती द्यावी असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी hmubo2@bis.gov.in या ईमेल आयडीवर मेल देखील करता येईल.माहितीचा स्त्रोत गुप्त राखण्यात येईल.


H.Akude/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2078007) Visitor Counter : 56


Read this release in: English , Hindi