माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55 व्या इफ्फी (IFFI) महोत्सवात जागतिक चित्रपटाचे भविष्य आणि चित्रपट महोत्सवांची महत्वाची भूमिका या विषयावरील चर्चा सत्रात दिग्गज चित्रपट निर्मात्यांचा सहभाग
"कथांचा पैस आपल्या अनुभवाहून मोठा असून, आपल्याला ही भव्य अनुभूती देण्याची ताकद सिनेमामध्ये आहे": कॅमेरॉन बेली
सिनेमा हे माध्यम मोठे गुंतागुंतीचे आहे, हे रॉकेट सायन्स नसले, तरी ते विशेष वैयक्तिकही नाही: जिओना नाझारो
"तंत्रज्ञान म्हणजे शत्रू नव्हे; ते सिनेमॅटिक कलेचा आवाका वाढवणारे असावे": एम्मा बोआ
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2024
गोवा येथील 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या “360° सिनेमा: चित्रपट महोत्सवातील दिग्दर्शकांची राउंडटेबल (गोलमेज)”, या पॅनेल चर्चा सत्रात, जागतिक सिनेमाला प्रोत्साहन देण्याचे आणि त्याचे भविष्य सुनिश्चित करण्याचे महत्व, या विषयावरील आज झालेल्या चर्चा सत्राने महोत्सवाला उपस्थित दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले.
या पॅनेलमध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमेरॉन बेली, लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलचे कला दिग्दर्शक जिओना नाझारो, एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निर्मात्या एम्मा बोआ, यांचा समावेश होता. ख्यातनाम भारतीय चित्रपट निर्माते आणि इफ्फी (IFFI) चे महोत्सव संचालक शेखर कपूर यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.
तंत्रज्ञानाची भूमिका आणि सिनेजगतावरील त्याचा परिणाम या विषयावरील चर्चेत, हे नव्या तंत्रज्ञानाने सज्ज नवीन माध्यम पारंपरिक सिनेमापुढील आव्हान आहे, की संधी, यावर पॅनेल सदस्यांनी आपले विचार मांडले. व्हर्च्युअल रिॲलिटी (आभासी सत्य) आणि डिजिटल फिल्म मेकिंग टूल्स यांसारख्या तंत्रज्ञानाने कथाकथनाच्या क्षितिजाचा विस्तार केला आहे, हे कॅमेरॉन बेली यांनी मान्य केले, मात्र चित्रपटगृहात एकत्र बसून सिनेमा पाहण्याच्या अनुभवला तंत्रज्ञानातील कोणतीही प्रगती पर्याय ठरू शकत नाही, हे त्यांनी लक्षात आणून दिले.
जिओना नाझारो यांनी जागतिक सिनेमॅटिक परीप्रेक्षाला आकार देण्यामधील भारतीय सिनेमाची आगळी भूमिका अधोरेखित केली. भारतीय सिने स्टार्सच्या आंतरराष्ट्रीय समुदायावरील प्रभावाचे त्यांनी वर्णन केले. भारतीय सिनेमाने आपले समृद्ध कथाकथन आणि सर्वांना भावणाऱ्या संकल्पनांच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवले आहे, यावर त्यांनी भर दिला.
प्रबळ कथांना आव्हान देणारे आवाज बुलंद करण्यासाठी चित्रपट महोत्सव महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून कसे काम करतात, यावर मंडळाच्या सदस्यांनी चर्चा केली. चित्रपटांचे प्रदर्शन करण्यापलीकडे जाऊन चित्रपट महोत्सव सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवतात आणि सोबतच विविध पार्श्वभूमी असणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना मुख्य प्रवाहातील सिनेमा सहसा संधी देत नसताना हे महोत्सव प्रेक्षकांशी जोडले जाण्याची संधी देतात. एक कलाप्रकार तसेच सांस्कृतिक अनुभव या दोन्ही रूपात चित्रपटाच्या वाढीसाठी आणि जतनासाठी ही देवाणघेवाण महत्त्वपूर्ण आहे.
मंडळाच्या सदस्यांनी चित्रपटांबाबत भारतीयांच्या मनात खोलवर रुजलेल्या उत्कटतेची देखील प्रशंसा केली. “हे जगातील माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. भारत हा चित्रपटांबाबत सर्वाधिक उत्कटता बाळगणारा देश असून तो या कला प्रकारात लक्षणीयरीत्या विकसित झाला आहे.”, असे कॅमेरून बेली यांनी नमूद केले.
“भारतात दरवर्षी चित्रपट सृष्टीत होत असलेल्या विलक्षण कार्याने मी थक्क झालो आहे. मला इथे आल्याबद्दल मनापासून कृतज्ञता वाटते.”, असे उद्गार जिओना नाझारो यांनी काढले. अनेकदा भारताला भेट देणाऱ्या एम्मा बोआ यांनी या देशासोबतचे आपले दीर्घकालीन संबंध प्रतिबिंबित करताना सांगितले की, “ मला घरी परत आल्यासारखे वाटते. ही माझी सहावी भारत भेट आहे आणि इथले सगळेजण चित्रपटांबाबत किती उत्कटतेने बोलतात, हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला आहे.”
21व्या शतकात जागतिक चित्रपटसृष्टीसमोरील आव्हाने आणि संधी याबाबतही या मंडळाने आपले विचार मांडले. जसजसा चित्रपट उद्योग विकसित होत आहे, तसतसे चित्रपट कला जपण्यासाठी, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी आणि आशयघन कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी इफ्फी सारख्या चित्रपट महोत्सवांचे महत्त्व कायम अबाधित राहिले आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Rajashree/Shraddha/Darshana | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2075687)
Visitor Counter : 11