माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

‘तरुण आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्मात्यांना त्यांचे सर्जनशील विचार आणि मूल्ये जगासमोर दाखवण्यासाठी इफ्फि महत्तम प्रोत्साहन देते : संतोष सिवन


पुरस्कार चित्रपट निर्मात्याला उत्साह प्रदान करतात: संतोष सिवन

तरुण चित्रपट निर्मात्यांनी विधात्याच्या सत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापासून प्रारंभ करत, भूतकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे : शेखर दास, ज्युरी सदस्य

भारतीय चित्रपटांच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्काराच्या ज्युरीने 55 व्या ‘इफ्फी मध्ये साधला प्रसार माध्यमांशी संवाद

#IFFIWood, 21 नोव्‍हेंबर 2024

 

देशातील नवीन आणि तरुण प्रतिभावंतांच्या कलागुणांना चालना देण्याच्या उद्देशाने, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (‘इफ्फी) 55 व्या आवृत्तीने एक नवीन पुरस्कार श्रेणी स्थापन केली आहे: 'भारतीय चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक'. यासाठी पाच उल्लेखनीय पदार्पण चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांचे हे पाच चित्रपट संपूर्ण भारतातून निवडलेले असून ते नवीन दृष्टीकोन, वैविध्यपूर्ण कथा आणि नाविन्यपूर्ण चित्रपट शैली अधोरेखित करणारे आहेत. 

आज, या श्रेणीतील पाच प्रवेशिकांमधून सर्वोच्च चित्रपट निवडण्याचे काम सोपवण्यात आलेल्या ज्युरींनी आज गोव्यातील पणजी येथील इफ्फी मीडिया सेंटरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भारतीय चित्रपट, चित्रपट निर्मितीच्या सर्व पैलूंमध्ये सुरक्षित आणि वेगाने सुधारणा करत आहे तसेच या क्षेत्रात सर्जनशील प्रतिभावंत आणि महत्वाकांक्षी तरुणांची ददात राहणार नाही अशी आशा आणि खात्री या ज्युरी सदस्यांनी या संवादादरम्यान व्यक्त केली. या ज्युरी सदस्यांनी पुरस्काराचे निकष आणि निवड प्रक्रियेबद्दल त्यांची स्वतःची अंतर्दृष्टी देखील प्रदान केली.

12 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार प्राप्त, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर तसेच ज्युरी अध्यक्ष संतोष सिवन यांनी आपल्या प्रारंभिक भाषणात, ज्युरींनी विद्यार्थ्यांचे चित्रपट, विशेषत: फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रपटांचा समावेश करण्यासाठी श्रेणीचा विस्तार करण्याची शिफारस केली होती, यावर प्रकाश टाकला. भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य घडवण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले . सिने उद्योगाच्या "भविष्याला"ला चालना देण्यात अशा उपक्रमांचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले. पुरस्कार आणि मान्यता महत्वाकांक्षी चित्रपट निर्मात्यांना उत्साही बनवतात तसेच नवीन कल्पना मांडण्यासाठी आणि त्यांची कला आणखी प्रगत करण्यासाठी प्रोत्साहित करतात, असेही ते म्हणाले.

परीक्षक मंडळाचे सदस्य शेखर दास म्हणाले की, डिजिटल युगामुळे कदाचित पहिल्यांदाच चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांना आपले काम मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर सादर करणे थोडे सोपे झाले असावे. डिजिटल युगात अनेक संधी उपलब्ध असल्या तरीही इफ्फीच्या या उपक्रमामुळे उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांचे मनोधैर्य उंचावेल व त्यांना मोठी प्रेरणा मिळेल. आदिवासी समाजजीवनावर आधारित आपल्या पहिल्या चित्रपटात विख्यात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘आगंतुक’ या शेवटच्या चित्रपटातील आदिवासी समाजाच्या चित्रणाबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस आपण केले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. आगंतुकमध्ये चित्रपटाचा नायक शेवटी पुन्हा आदिवासींची साधेपणाची जीवनशैली स्वीकारण्याची इच्छा प्रदर्शित करतो असे दाखवण्यात आले आहे. भविष्यातला मार्ग प्रशस्त करण्यासाठी आपण दिग्गजांच्या कलाकृतींबाबत असे प्रश्न विचारण्याचे धाडस करणे महत्त्वाचे आहे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.  

परीक्षक मंडळाचे सदस्य सुनील पुराणिक यांनी पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांची क्षमता व त्यांनी कॅमेरासंदर्भातल्या पहिल्या प्रयोगासाठी निवडलेले विषय यांची मुक्तकंठाने स्तुती केली. या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांसाठी पुरस्कार सुरू करुन त्यासाठी अशाप्रकारची कुशल यंत्रणा उभारल्याबद्दल त्यांनी एनएफडीसी  व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अभिनंदन केले.

“सिनेमा म्हणजे जादू आहे,” असे एम. व्ही. रघु म्हणाले. लाइट, कॅमेरा व ऍक्शन यांच्या माध्यमातून चित्रपट निर्माण करण्याची कला समजून घेणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. नवीन सर्जनशील कलाकार घडविण्यासाठी चित्रपटांचे शिक्षण उच्च दर्जाचे असणे गरजेचे आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

पहिल्यांदाच ज्युरी सदस्य असलेले विनीत कनोजिया यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितले की, चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेतून थेट ज्युरीच्या पॅनलमध्ये सामील होणे हे किती कठीण होते.  

सर्व ज्युरी सदस्यांनी त्यांच्या स्वतःच्या दिग्दर्शनातील पदार्पणाविषयी अनुभव सामायिक केले. त्यांनी सांगितले की आजच्या तरुण पिढीकडे आपली प्रतिभा दाखवण्यासाठी अनेक व्यासपीठे आहेत. "जर व्यासपीठे उपलब्ध नसतील, तर ते स्वतः एक व्यासपीठ तयार करू शकतात", असे संतोष सिवन यांनी सांगितले. आता ते दिवस राहिलेले नाहीत जेव्हा चित्रपट तयार करण्यासाठी औपचारिक प्रशिक्षणाची आवश्यकता असायची. सध्याच्या काळात तरुणांची लहान वयातच कॅमेऱ्याशी ओळख होते.

पत्रकार परिषदेत राजीथ चंद्रन यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. 

पदार्पण दिग्दर्शक ज्युरीचे सदस्य:

1. संतोष सिवन (अध्यक्ष), छायाचित्रकार आणि दिग्दर्शक  

2. सूनिल पुराणिक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता  

3. शेखर दास, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक  

4. एम. व्ही. रघु, छायाचित्रकार आणि दिग्दर्शक  

5. विनीत कनोजिया, चित्रपट निर्माते, लेखक आणि संपादक  

हा पुरस्कार पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेला आणि क्षमतेला सन्मानित करतो. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रगतीत त्यांच्या योगदानाची नोंद घेतो. या नवोदित दिग्दर्शकांना प्रकाशझोतात आणून, इफ्फी पुढच्या पिढीतील कथाकथनकारांना प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता दर्शवते.  

पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला त्याच्या सर्जनशील दृष्टिकोनासाठी, कलात्मक कथाकथनासाठी आणि एकूण प्रभावासाठी प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

संवाद येथे पहा:

ज्युरीबद्दल अधिक जाणून घ्या:  https://iffigoa.org/debut-director-jury

पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांबद्दल जाणून घ्या: https://iffigoa.org/debut-director-films/2024/debut-director-films

पदार्पण दिग्दर्शक प्रिव्ह्यू कमिटीबद्दल जाणून घ्या: https://iffigoa.org/debut-directors-previw-commitee-2024

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/S.Kane/Shraddha/Surekha/Gajendra/D.Rane | IFFI 55

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

iffi reel

(Release ID: 2075685) Visitor Counter : 17


Read this release in: English , Assamese , Urdu , Konkani