कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0 ला प्रारंभ

Posted On: 10 NOV 2024 6:49PM by PIB Mumbai

 

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने देशभरातील निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम  3.0 चा प्रारंभ केला आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी जीवनप्रमाण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना आहे.  डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0  भारतातील 800 शहरे आणि नगरांमध्ये 1-30 नोव्हेंबर 2024 दरम्यान  आयोजित केली जाणार असून यात केंद्र आणि राज्य सरकारे तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि स्वायत्त संस्थांचे सर्व निवृत्तीवेतनधारक त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र निवृत्ती वेतन वितरण बँकांमध्ये किंवा भारतीय पोस्ट  पेमेंट बँक येथे सादर करू शकतात.  वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारक त्यांच्या निवासस्थानातूनच जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील.  त्यांना सर्व सेवा घरपोच दिल्या जातील. सर्व निवृत्तीवेतन वितरण बँका, सीजीडीए, भारतीय टपाल पेमेंट बँक, यूआयडीएआय एकत्र येऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम देशव्यापी स्तरावर राबवणार आहेत.

या देशव्यापी मोहीमेचा दुसरा टप्पा 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत, देशभरातील 100 शहरांमधील 600 ठिकाणी, 17 निवृत्तीवेतन वितरण बँका, मंत्रालये आणि विभाग, निवृत्तीवेतनधारक कल्याण संघटना, यूआयडीएआय, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इत्यादींच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.  ही मोहीम अतिशय यशस्वी ठरली होती , यात 1.47 कोटी पेक्षा जास्त डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार  करण्यात आली होती.

मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात, सर्व निवृत्तीवेतनधारकांमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र -फेस ऑथेंटिकेशन तंत्राबाबत सर्व निवृत्तीवेतन कार्यालये आणि सर्व बँक शाखा आणि एटीएममध्ये मोक्याच्या ठिकाणी   फलक आणि पोस्टरद्वारे जागरूकता निर्माण करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सर्व बँकांनी त्यांच्या शाखांमध्ये एक समर्पित कर्मचारी संघ तयार केला आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्मार्टफोनमध्ये आवश्यक ॲप्स डाऊनलोड करून  निवृत्तीवेतनधारकांचे  डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे हे या कर्मचारी संघाचे मुख्य कार्य आहे.

म्हातारपण  किंवा आजारपणामुळे निवृत्तीवेतनधारकांना शाखांमध्ये येणे शक्य नसेल, तर बँकेचे कर्मचारी त्यांच्या घरी किंवा रुग्णालयात जाऊनदेखील हे काम करत आहेत.

निवृत्तीवेतनधारक 'कल्याण संघटना' या मोहिमेला संपूर्ण समर्थन देत आहेत. त्यांचे प्रतिनिधी निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) सादर करण्यासाठी प्रेरित करत आहेत . निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अधिकारीदेखील देशभरातील प्रमुख स्थळांना भेट देत आहेत. ज्याद्वारे निवृत्तीवेतनधारकांना विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास मदत केली जात आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

मोहीम  3.0 च्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी 37 लाखांहून अधिक डिजिटल जीवन प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. ज्यामध्ये 90 वर्षांपेक्षा अधिक वयाचे सुमारे 14,329 निवृत्तीवेतनधारक आणि 80-90 वर्षे वयोगटातील 1,95,771 निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या घरी, कार्यालयात किंवा शाखांमधून डिजिटल जीवन प्रमाणपत्र  सादर केले आहे.

एसबीआय आणि पीएनबी या बँका या मोहिमेत आघाडीवर असून, महिनाभर चालणाऱ्या मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात 5 लाखांहून अधिक डीएलसी तयार करण्यात आले आहेत.

***

S.Kane/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2072214) Visitor Counter : 65


Read this release in: English , Urdu , Hindi , Hindi , Tamil