माहिती आणि प्रसारण मंत्रालय
महाराष्ट्र मुख्य निवडणूक कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती व्हॅनची सुरूवात
सीबीसी मतदार जागरूकता व्हॅन महाराष्ट्रातील 15 जिल्हे, 133 मतदारसंघात प्रवास करणार
सीबीसी मतदार जागृती व्हॅन मतदानाचा संदेश पोहोचवणार; सीबीसी लोककलाकार संपूर्ण महाराष्ट्रात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मतदार जागृती करणार
Posted On:
08 NOV 2024 7:56PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत, केंद्रीय संचार ब्यूरो (CBC), पुणे प्रादेशिक कार्यालयानं आज, 8 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे एका कार्यक्रमात अधिकृतपणे मतदार जागरुकता मोहीम सुरू केली. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक कार्यालयाद्वारे SVEEP अंतर्गत मतदार जागरुकता कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रारंभाचा हा एक भाग होता.
मतदारांचा सहभाग वाढविणे आणि नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबद्दल साक्षर करणे या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, महाराष्ट्राचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पारलिंगी अधिकार कार्यकर्ते गौरी सावंत, दिव्यांग अधिकार कार्यकर्ते निलेश सिंगित, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे हे देखील यावेळी उपस्थित होते.
या व्यापक जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून, CBC मतदार जागरुकता व्हॅनचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले आणि तिचा प्रवास उद्यापासून सुरू होईल. ही व्हॅन महाराष्ट्रातील 15 जिल्हे आणि 133 मतदारसंघांमध्ये प्रवास करेल, ज्यात ऐतिहासिक दृष्ट्या मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांचा समावेश आहे. ही व्हॅन मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची ठिकाणे, आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती वितरित करेल. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना माहिती पुरवण्याची आणि सहभागी करून घेण्याची खात्री करण्यासाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर केला जाईल.
मोबाइल जनजागृती मोहिमेसोबतच, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींसह प्रमुख मान्यवरांचे व्हिडिओ संदेश संपूर्ण राज्यात एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील, ज्याद्वारे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जाईल. लोकांचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी, CBC लोककलाकार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतील, पारंपरिक कला प्रकारांद्वारे मतदानाचा संदेश प्रसारित करतील.
20 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि विविध जिल्हा प्रशासन यांनी सहकार्य केले असून राज्य निवडणुकीत सर्वाधिक मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित काम केले आहे.
***
S.Tupe/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071893)
Visitor Counter : 114