राष्ट्रपती कार्यालय
दक्षता जागृती सप्ताह 2024 मध्ये राष्ट्रपती सहभागी
Posted On:
08 NOV 2024 12:48PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दक्षता जागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज ( 8 नोव्हेंबर 2024 ) सहभागी झाल्या.
या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या समाजात इमानदारी आणि शिस्त ही आयुष्यातली आदर्श तत्वे मानली जातात. भारतीयांना बेशिस्त आवडत नाही, ते कायद्याचे पालन करतात. त्यांच्या जगण्यात साधेपणा व काटेकोरपणा आहे असे मत सुमारे 2300 वर्षांपूर्वी मेगॅस्थेनीसने भारतीयांविषयी नोंदविले होते. फाहियान यानेही आपल्या पूर्वजांबद्दल असेच मत नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दक्षता जागृती सप्ताहाची ‘देशाच्या समृद्धीसाठी इमानदारीची संस्कृती’ ही संकल्पना अगदी समर्पक आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, विश्वास हा सामाजिक जीवनाचा पाया आहे.भ्रष्टाचार हा केवळ देशाच्या आर्थिक प्रगतीमधील अडसर नाही; तर त्यामुळे समाजातली विश्वासाची भावनाही कमी होते. लोकांमधल्या ऐक्याच्या भावनेवर त्याचा विपरित परिणाम होतो. देशाचे ऐक्य आणि अखंडता यावरही भ्रष्टाचाराचा व्यापक परिणाम दिसून येतो. दरवर्षी 31 ऑक्टोबर या सरदार पटेलांच्या जन्मदिनी आपण देशाची एकता व अखंडता कायम राखण्याची शपथ घेतो. ही केवळ एक रीत अथवा परंपरा नाही. ही गांभीर्याने घ्यायची शपथ आहे. ही शपथ पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
नीतीमत्ता हा भारतीय समाजाचा आदर्श आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींनी सांगितले की, कोणतेही काम चांगल्या हेतूने व निर्धाराने केले तर त्यात हमखास यश मिळण्याची खात्री असते.
भ्रष्ट व्यक्तीविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारवाईला झालेला विलंब अथवा कमकुवत कारवाईमुळे भ्रष्ट व्यक्तींना पाठबळ मिळते, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
***
N.Chitale/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071772)
Visitor Counter : 46