आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एफएसएसएआय च्या 45 व्या सीएसी बैठकीत, पर्यटनाच्‍या हंगामामध्‍ये पर्यटन स्थळी अतिरिक्त अन्न सुरक्षिततेचे महत्त्व केले अधोरेखित


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या गोदामांवर पाळत ठेवण्याचे तसेच वितरण कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे दिले निर्देश

Posted On: 07 NOV 2024 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2024

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने आज नवी दिल्ली येथे 45 वी केंद्रीय सल्लागार समितीची (CAC) बैठक घेतली. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीतील  पर्यटन हंगामाच्या तयारीसाठी उच्च सुरक्षा मानके सुनिश्चित करण्यासाठी लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पाळत ठेवण्याचे आवाहन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या बैठकीत करण्यात आले.

पर्यटन हंगामात लोकप्रिय स्थळांवर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या पर्यटन स्थळांवर ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या फिरत्या प्रयोगशाळेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी कमला वर्धन राव यांनी विविध राज्यांच्या अन्न आयुक्तांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे वापरल्या जाणाऱ्या गोदामांवर आणि इतर सुविधांवर पाळत ठेवण्याची सूचना दिली. त्यांनी अशा गोदामांसाठी तसेच या प्लॅटफॉर्मच्या वितरण कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सांगितले.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वाढीव पाळत ठेवण्यास सांगण्यात आले आणि या उद्देशासाठी ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ हे फिरते वाहन तैनात करण्यासही सांगण्यात आले.

सर्व नागरिकांसाठी अन्न सुरक्षा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन (FoSTaC) अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फूड बिझनेस ऑपरेटर (FBOs) ना प्रशिक्षण देण्यावर समितीने भर दिला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्च 2026 पर्यंत 25 लाख खाद्य पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना प्रशिक्षण देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये विद्यापीठ, महाविद्यालय आणि वसतिगृहातील उपहारगृहांचा समावेश होता.

एकात्मिक अन्न सुरक्षा दृष्टिकोनाच्या गरजेवरही जोर देण्यात आला. त्यासोबतच सर्व संबंधित मंत्रालये, भागधारकांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच राज्य आणि जिल्हा स्तरावर नियमितपणे सल्लागार समितीच्या बैठका आयोजित करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रोत्साहित करण्यात आले.

‘इट राइट इंडिया’ चळवळीचा एक भाग म्हणून निरोगी खाण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे महत्त्व या बैठकीत अधोरेखित करण्यात आले.  राज्यांना मेळावे, वॉकथॉन्स आणि पथनाट्य (नुक्कड नाटक) यांसारख्या संपर्क उपक्रमांद्वारे अन्न सुरक्षा जागरूकता वाढविण्याचा सल्ला देण्यात आला.

अन्न सुरक्षा आयुक्त (CFS), राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्न उद्योग, ग्राहक गट, कृषी क्षेत्र, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था यांच्या सदस्यांसह 60 हून अधिक अधिकाऱ्यांनी या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.  

 

 

S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2071642) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi