माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कचऱ्याचे छुपे दुष्परिणाम हे शहरी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक गंभीर आहेत: स्वच्छ (SWaCH) या संस्थेचे अमोघ भोंगले


शहरे स्वच्छ ठेवण्यात सफाई दूतांची भूमिका आणि नागरिक स्तरावर कचरा वर्गीकरणाचे महत्व या विषयावरील वेबिनार संपन्न

Posted On: 15 OCT 2024 9:57PM by PIB Mumbai

पुणे/कोल्‍हापूर, 15 ऑक्‍टोबर 2024

 

मोठ्या प्रमाणातील कचऱ्याचे छुपे दुष्परिणाम हे शहरी भागात आढळून येणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक गंभीर असतात. आर्क्टिक कॅप वरील (प्रदेशातील) बर्फ वितळण्यासारख्या, पर्यावरणाशी संबंधित विविध आपत्ती म्हणजे, शहरांमधील बेलगाम कचरा निर्मितीच्या छुप्या दुष्परिणामांपैकी एक आहे, असे पुण्याच्या SWaCH (सॉलिड वेस्ट कलेक्शन अँड हँडलिंग) या सहकारी संस्थेचे अमोघ भोंगले यांनी सांगितले.

सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनने आयोजित केलेल्या, ‘शहरे स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचक समुदायाची भूमिका आणि नागरिक स्तरावर कचरा वर्गीकरणाचे महत्त्व’, या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. कागल येथील श्री शाहू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी या वेबिनारमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

स्वच्छ (SWaCH), ही देशातील कचरा गोळा करणारी सर्वात मोठी सहकारी संस्था असून, 10 लाख घरांपर्यंत पोहोचून दिवसाला 1400 टन कचरा गोळा करते, आणि स्रोत स्तरावर 95% कचऱ्याचे वर्गीकरण करते.

अमोघ यांनी पुढे माहिती दिली की, कचरा गोळा करणाऱ्यांसाठी हे कचऱ्याचे वर्गीकरण केवळ ओल्या आणि सुक्या कचऱ्यापर्यंत मर्यादित नसून, यामध्ये स्वच्छता उत्पादनांशी संबंधित आणि घरगुती स्तरावरील घातक कचरा देखील समाविष्ट आहे. कचऱ्यामधील प्लॅस्टिकचे देखील विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते.

त्यांनी पुढे सांगितले की, कचरा वेचकांचे जीवन सोपे नसते, कारण नागरिक त्यांना कचरा ठेवण्यासाठी आणि त्याचे वर्गीकरण करण्यासाठी जागा द्यायला नकार देतात, आणि त्यांना सहकार्य करत नाहीत. कचरा अत्यंत घाणेरडा असून, तो लवकरात लवकर टाकून द्यायला हवा असा सर्वसामान्य समज असतो.

स्वच्छ (SWaCH) ने पुनर्वापर करण्याजोग्या 30 टन वस्तू गोळा करण्याचे यश संपादन केले आहे. स्वच्छ (SWaCH) ने आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले असून, 8 लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन रोखण्यात यश मिळविले आहे.

शिल्पा नीलकंठ यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले. शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक तुकाराम पवार आणि पर्यवेक्षक मिलिंद बरवडे या वेबिनारला विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2065170) Visitor Counter : 67


Read this release in: English