संरक्षण मंत्रालय
सेना कमांडर परिषदेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांना केले संबोधित
Posted On:
11 OCT 2024 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2024
लष्करातील कमांडरांच्या परिषद सध्या गंगटोक येथे मिश्र प्रकारात सुरू आहे. यावर्षातील ही दुसरी परिषद आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचे (आजचे) मुख्य आकर्षण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे भाषण होते. गंगटोक येथे खराब हवामान असल्यामुळे rajnath सिंह यांनी सुखना येथील लष्करी तळावरून दूरदृश्य प्रणालीव्दारे वरिष्ठ लष्करी अधिका-यांना मार्गदर्शन केले.
संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले, देशातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी संघटनांपैकी एक म्हणून भारतीय लष्करावर संपूर्ण राष्ट्राचा विश्वास आहे. ज्यावेळी गरज निर्माण होते, त्या त्यावेळी नागरी प्रशासनाला मदत करण्याबरोबरच आपल्या सीमांचे रक्षण आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यात लष्कर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले, सध्याच्या गुंतागुंतीच्या आणि संदिग्ध जागतिक परिस्थितीचा प्रत्येकावर परिणाम होत आहे. "हायब्रीड युद्धासह अपारंपरिक आणि विषम युद्ध ही भविष्यातील पारंपरिक युद्धांचा भाग असतील आणि जगाच्या विविध भागांमध्ये अलिकडे घडून आलेल्या संघर्षांवरून हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सशस्त्र दलांनी रणनीती आखताना आणि तयारी करताना या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, तसेच हे सर्व पैलू विचारात घेतले पाहिजेत. जागतिक पटलावर घडत असलेल्या आणि भूतकाळात झालेल्या घटनांमधून शिकत राहिले पाहिजे, जेणेकरून नुकसान टाळता येईल. आपण सतर्क राहून, नियमितपणे आधुनिकीकरण करणे आणि कोणत्याही आकस्मिक परिस्थितीसाठी सज्ज राहिले पाहिजे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
पश्चिमी सीमेवरील परिस्थितीचा संदर्भ देत, संरक्षण मंत्र्यांनी सीमेपलीकडील दहशतवादाला भारतीय लष्कराने दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले, तरीही शत्रूचे छुपेयुद्ध सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल,पोलीस दल आणि लष्कर यांच्यातली उत्तम समन्वयित कारवाई या प्रदेशातील स्थिरता आणि शांतता वाढविण्यात योगदान देत आहेत. ही गोष्ट जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही स्पष्ट झाली आहे आणि यासाठी मी पुन्हा एकदा भारतीय सैन्याचे अभिनंदन करतो.”
प्रमुख शैक्षणिक संस्थांसह नागरी उद्योगांच्या सहकार्याने विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आणि त्याद्वारे ‘स्वदेशीकरणाद्वारे आधुनिकीकरण’ किंवा ‘आत्मनिर्भरते’ च्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रगती करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. संरक्षण मंत्री म्हणाले की, आत्मनिर्भरताच्या माध्यमातून प्रत्येक सैनिकासाठी शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण हे सरकारचे मुख्य लक्ष्य आहे आणि या बाबतीत सरकार पूर्णपणे सशस्त्र दलांच्या पाठीशी आहे.
युद्ध सज्जता ही सतत, नियमित घडणारी गोष्ट असली पाहिजे आणि कोणत्याही वेळी उद्भवू शकणाऱ्या अनिश्चिततेसाठी आपण नेहमीच सज्ज असणे गरजेचे आहे, असेही संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2064214)
Visitor Counter : 33