सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अली यावर जंग राष्ट्रीय मूकबधीर आणि कर्णबधीर संस्थेने (दिव्यांगजन) ‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता’ अभियान राबवले तसेच उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले

Posted On: 01 OCT 2024 9:52PM by PIB Mumbai

मुंबई, 1 ऑक्‍टोबर 2024

 

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि त्यादृष्टीने आचरणात आणावयाचे बदल यांविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने सुरु असलेल्या 15 दिवसांच्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमात अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) AYJNISHD(D) अर्थात अली यावर जंग राष्ट्रीय मूकबधीर आणि कर्णबधीर संस्थेने (दिव्यांगजन) ‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता’ अभियानात सहभाग नोंदवला. 14 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झालेल्या या मोहिमेची सांगता आज देशासाठी समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या 'सफाई कर्मचाऱ्यांच्या' अनुकरणीय योगदानाची दखल घेऊन समारंभपूर्वक झाली.

मुंबईत वांद्रे पश्चिम येथील संस्थेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला ‘सफाई कर्मचारी’, संस्थेचे अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात बांद्रा येथील लीलावती रुग्णालयातील डॉ प्रीती धिंग्रा यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य याविषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचा परिसर स्वच्छ करताना स्वतःच्या आरोग्याची देखील कशी काळजी घ्यावी याविषयी त्यांनी माहिती दिली.  स्वच्छ भारत अभियानाची उद्दिष्टे गाठण्याच्या कार्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि चुकीच्या सवयी टाळून आरोग्याची काळजी घेण्यावर भर देत 'सफाई कर्मचाऱ्यांनी' दाखविलेल्या अतूट बांधिलकीबद्दल अली यावर जंग संस्थेचे संचालक डॉ सुमन कुमार यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

संस्थेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे परिश्रम, बांधिलकी आणि सर्वत्र स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण वातावरण ठेवण्यातील त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना उत्कृष्ट सफाई कर्मचारी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात स्वच्छता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात त्यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत. या मोहिमेत हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये स्वच्छता मोहीम, अभिमुखता कार्यक्रम, वृक्षारोपण, जुन्या फायली नष्ट करणे आणि सामुदायिक सहभागाचे प्रयत्न यांचा समावेश होता, या सर्वांचा उद्देश स्वच्छता आणि स्वच्छतेच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. उपस्थितांनी  14 सप्टेंबर 2024 रोजी ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ घेऊन  स्वच्छ पर्यावरण राखण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला होता आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छता आणि जाणीव कायम  ठेवण्याचे वचन दिले आणि इतर अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेशी निगडित उपक्रम राबवले. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि पेयजल आणि स्वच्छता विभाग यांच्या नेतृत्वाखालील ही 4S मोहीम,  सामाजिक मूल्य आणि नैसर्गिक स्वच्छतेची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2060939) Visitor Counter : 41


Read this release in: English