माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"माझा कचरा ही माझी जबाबदारी" : भाग्यश्री चेंबूरकर यांनी कचरा व्यवस्थापनातील बदलाला चालना दिली


घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खत बनवण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केला एक कार्यक्रम

Posted On: 01 OCT 2024 8:18PM by PIB Mumbai

मुंबई, 1 ऑक्‍टोबर 2024

 

‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेअंतर्गत माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या  पत्र सूचना कार्यालय, मुंबई , यांनी घरगुती कचऱ्याचे रूपांतर बहुमोल  कंपोस्ट खतात कसे करावे या विषयावर एक प्रात्यक्षिक आयोजित केले होते. ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम 17 सप्टेंबर ते  2 ऑक्टोबर 2024 दरम्यान साजरी केली जात आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ हा या मोहिमेचा विषय असून या मोहिमेत सामूहिक जबाबदारीच्या भावनेतून नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. हा उपक्रम माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिमी क्षेत्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला गेला. 

मुंबईत कचरा व्यवस्थापन तज्ञ म्हणून काम करणाऱ्या भाग्यश्री चेंबूरकर यांनी कचरा व्यवस्थापनातील शाश्वत पद्धतींबद्दल माहिती दिली तसेच समाजात याविषयी जागृती वाढत असल्याचे सांगितले.

कचऱ्याचा पुनर्वापर करण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेण्यासाठी कृपया खालील चित्रफीत पहा: 

 

"माझा कचरा ही माझी जबाबदारी" भाग्यश्री यांनी या प्रात्यक्षिकाद्वारे सर्वांनाच प्रेरणा दिली आहे. पाच वर्षांहून अधिक काळ कंपोस्ट खत बनवणे व त्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या भाग्यश्री यांनी कचरा वर्गीकरण करण्याचे महत्व  व घरच्या घरी कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धतींबद्दल माहिती दिली. या चर्चात्मक सत्रामध्ये घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन केल्याने हरित पृथ्वीकडे वाटचाल कशी करता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. 

“सफाई कर्मचारी म्हणजे ‘कचरावाले’ नाहीत, तर कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने न लावणारे नागरिकच त्या नावाला पात्र आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची आपल्या परिसराच्या स्वच्छतेत महत्वाची भूमिका असून आपल्या कचऱ्याची जबाबदारी आपणच घेणे यापुढे महत्वाचे ठरणार आहे.” कचरा व्यवस्थापन ही केवळ जबाबदारी नसून एक शाश्वत भविष्य उभे करण्यासाठी मिळालेली संधी आहे असे भाग्यश्री यांनी सांगितले. “आपल्या घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास आपण आपल्या आसपासच्या समुदायावर व पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो.” असे त्या म्हणाल्या. 

सहभागी प्रेक्षकांना घरगुती कंपोस्टिंग संचाबद्दल तसेच गुणवत्तापूर्ण कंपोस्ट करण्याच्या प्रक्रियेला लागणाऱ्या दोन महिन्यात काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली गेली. भाग्यश्री यांचे अनुभव ऐकल्यावर सहभागी प्रेक्षकांना ‘शून्य कचरा जीवनशैली’ अंगिकारण्याची तसेच कचरा व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावण्याची प्रेरणा मिळाली. 

सहसंचालक रबी सय्यद हाश्मी, उपसंचालक जयदेव पुजारी स्वामी, इतर अधिकारी व पत्र सूचना कार्यालयाचे  कर्मचारी  या उपक्रमात सहभागी झाले होते. माहिती सहाय्यक  सोनल तुपे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. 

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2060892) Visitor Counter : 70


Read this release in: English