दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पणजी येथील 37 व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडू सर्कलने मिळवले विजेतेपद

Posted On: 27 SEP 2024 6:56PM by PIB Mumbai

गोवा, 27 सप्टेंबर 2024

 

गोव्यामध्ये पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेत 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 37 व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धेचा गुरुवारी एका शानदार समारंभाने समारोप समारोप झाला. सांघिक प्रकारात तामिळनाडू सर्कलने विजेतेपद पटकावले, तर बिहार सर्कलने उपविजेतेपद पटकावले आणि ओरिसा सर्कलने तिसरे स्थान पटकावले.

वैयक्तिक प्रकारात ओरिसा सर्कलच्या साहू उत्कल रंजन ने विजेतेपद, तर बिहार सर्कलच्या सिन्हा सुधीर कुमार याने उपविजेतेपद मिळवले. ओरिसा सर्कलच्या सोम्या रंजन मिश्रा हिने तिसरा क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.एन.विनोद कुमार यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. गोवा विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र के. जायभाये यांनी त्यांचे स्नेहमय स्वागत केले. डाक सेवा (मुख्यालय) महाराष्ट्र सर्कलचे संचालक अभिजित बनसोडे आणि डाक सेवा, गोवा विभागाचे संचालक रमेश पाटील, समारोप समारंभाला उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना, डॉ. एन. विनोद कुमार यांनी, बुद्धिबळाची बौद्धिक आणि धोरणात्मक क्षमता वाढवण्यामधील महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत, या स्पर्धेतून प्रदर्शित झालेल्या असामान्य प्रतिभेची प्रशंसा केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आणि स्पर्धकांनी घेतलेल्या परिश्रमांना देखील त्यांनी दाद दिली.

स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात, यासाठी सालसेटे तालुका बुद्धिबळ संघटनेने दिलेले बहुमोल सहकार्य आणि योगदानाबद्दल, गोवा विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र के. जायभाये यांनी, त्यांचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाच्या यशात त्यांच्या पाठबळाचा महत्वाचा वाटा होता, ज्यामुळे खेळाडूंना त्यांचे कौशल्य आणि प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले.

चार दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या विविध श्रेणींमध्ये देशभरातील स्पर्धकांच्या सहभागाने उत्कंठावर्धक सामने रंगले. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना मानचिन्ह, पदके आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  

टपाल खात्यात खेळाची भावना आणि बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता अधोरेखित करणारी ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली.

 

* * *

PIB Panaji | S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059613) Visitor Counter : 28


Read this release in: English