माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने 27 सप्टेंबर रोजी वेरूळ (एलोरा), जि. छत्रपती संभाजीनगर येथे निमंत्रित पत्रकारांसाठी एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा –‘वार्तालाप’चे आयोजन


केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीने वेरूळ लेणी परिसरात दिनांक 27 आणि 28 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 26 SEP 2024 3:42PM by PIB Mumbai

छत्रपती संभाजीनगर, 26 सप्‍टेंबर 2024

 

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय मुंबईच्यावतीने येत्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी वेरूळ (एलोरा), जि. छत्रपती संभाजीनगर येथे निमंत्रित पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधिसांठी एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा –‘वार्तालाप’चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेची संकल्पना 'शाश्वत पर्यटन: एक सहयोगपूर्ण वाटचाल' अशी असून पर्यटन स्थळे आणि केंद्र सरकारद्वारे पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजना आणि वारसा स्थळांचे संवर्धन आणि विकास या विषयी सामान्य जनतेला माहिती मिळावी हा यामागील उद्देश आहे. 

या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचा भारत पर्यटन विभाग आणि संस्कृती मंत्रालयाचा पुरातत्व विभाग देखील सहभागी होणार आहेत. 

छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ (एलोरा), येथील मिथीकल पार्क, एलोरा व्हिजिटिंग सेंटर येथे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी साडे 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून होईल. 

पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी स्वामी, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांची उदघाटनसत्राला उपस्थिती असणार आहे. 

उद्घाटन सत्रानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत भारत पर्यटनच्या सहाय्यक संचालक मालती दत्ता शाश्वत पर्यटन: पर्यावरणस्नेही प्रवासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील, तर पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.शिवकुमार भगत, 'वारशाचे जतन आणि संवर्धन : शाश्वत पर्यटनात पुरातत्व विभागाची भूमिका' या संदर्भात पुरातत्व विभागाच्या कार्याविषयी माहिती देतील. श्रीमती जयदेवी पुजारी स्वामी ‘पत्रसूचना कार्यालयाद्वारे माहितीचा परिणामकारक ओघ तसेच विकासात्मक संवाद यामध्ये ग्रामीण पत्रकाराची भूमिका’ तसेच ग्रामीण प्रसार माध्यम कार्यशाळा घेण्यामागची भूमिका याविषयावर माहिती देतील. 

व्याख्यानानंतर प्रश्नोत्तर सत्र तसेच उपस्थितांचे मनोगत याद्वारे दुहेरी संवादावर भर राहील. केंद्र सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांबाबतच्या माहितीच्या प्रसाराचे कार्य करणारे पत्र सूचना कार्यालय ही महत्वपूर्ण संस्था आहे. हे कार्यालय थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रसारमाध्यम यांच्यातील मुख्य दुवा आहे.

याच कार्यक्रमाबरोबरच केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि पर्यटन मंत्रालय यांच्या सहकार्याने वेरूळ लेणी परिसरात दिनांक 27 आणि 28 सप्टेंबर 2024 दरम्यान दोन दिवशी मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन स्थळी एलईडी वॉलद्वारे चित्रफितींच्या  माध्यमातून पर्यटन स्थळे आणि पर्यटनाच्या विकास योजनांची माहिती देण्यात येईल. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. पर्यटकांना सेल्फी काढण्यासाठी डिजिटल सेल्फी पॉईंट आणि 360 डिग्री सेल्फी पॉइंटची सूविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दोन्ही दिवस सकाळी 8.00 ते सायंकाळी 6.00  पर्यंत, सर्व नागरिक, पर्यटक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे.

 

* * *

PIB Mumbai | JPS/MJ/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058980) Visitor Counter : 35


Read this release in: English