नौवहन मंत्रालय
पालघरच्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा जेएनपीएचा निर्धार, प्रस्तावित महत्वाच्या विकास प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक कृषी-प्रक्रिया केंद्राचा समावेश
Posted On:
25 SEP 2024 7:20PM by PIB Mumbai
मुंबई, 25 सप्टेंबर 2024
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए), पालघर जिल्हा भाजीपाला, फळे आणि फुले उत्पादक संघाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांची रूपरेषा निश्चित केली आहे.
संघटने बरोबरच्या बैठकी दरम्यान, जेएनपीए चे अध्यक्ष आणि व्हीपीपीएल चे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ यांनी, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि या प्रदेशाच्या निर्यात क्षमतेला चालना देण्यासाठी जेएनपीए सारख्या जागतिक दर्जाच्या कृषी-प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचा प्रस्ताव ठेवला. या उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना प्रगत सुविधा, विशिष्ट उद्दिष्टसह प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील सुलभ प्रवेश, याद्वारे सक्षम बनवले जाईल.
याबद्दल अधिक माहिती देताना उन्मेष वाघ म्हणाले, “स्थानिक शेतकरी समुदायाला अत्याधुनिक सुविधा आणि आवश्यक प्रशिक्षण देऊन, त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवायला सहाय्य करून, आणि त्यांची उत्पादकता आणि उत्पन्न दोन्ही सुधारून त्यांचे सक्षमीकरण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. वाढवण बंदराच्या विकासाबरोबरच आजूबाजूच्या समुदायांचा विकास आणि समृद्धीप्रति देखील आम्ही तेवढेच वचनबद्ध आहोत. या प्रकल्पाचा सर्वांना लाभ मिळेल आणि कोणीही मागे राहणार नाही, याकडे आम्ही लक्ष देत आहोत.”
स्थानिक शेतीला पाठबळ देण्याच्या जेएनपीए च्या दृष्टीकोनाला अनुसरून, जेएनपीएमध्ये विकसित केल्या जात असलेल्या केंद्राच्या धर्तीवर, या ठिकाणी जागतिक दर्जाचे कृषी-प्रक्रिया केंद्र स्थापन केले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचा अपव्यय कमी करून, त्यांचे उत्पादन जगभर निर्यात करता येईल.
याव्यतिरिक्त, व्हीपीपीएल, पालघर जिल्हा भाजीपाला, फळे आणि फुले उत्पादक संघासाठी, माती परीक्षण प्रयोगशाळेसारख्या प्रगत सुविधांनी सुसज्ज असलेली मुख्यालयाची इमारत बांधणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कौशल्य विकासासाठी जेएनपीएच्या कृषी आणि शीत गृह सुविधांमध्ये प्रवेश मिळेल. याबाबतची तपशीलवार योजना लवकरच जाहीर केली जाईल.
शेतकऱ्यांमध्ये कृषी विषयक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, व्हीपीपीएल, कोकण कृषी विद्यापीठाच्या सहयोगाने शेतकरी प्रशिक्षणासाठी स्थानिक स्तरावर विस्तारित संकुलाची स्थापना करेल. या उपक्रमांचा सर्वसमावेशक कृती आराखडा लवकरच सादर केला जाईल.
संघटनेच्या प्रतिनिधींनी वाढवण बंदराच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त करून त्याला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.
* * *
PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058760)
Visitor Counter : 50