युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
जनभागीदारी मधूनच जनआंदोलन तयार होते: अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
25 SEP 2024 2:17PM by PIB Mumbai
पुणे, 24 सप्टेंबर 2024
“जगातील कोणतीही ताकद भारतीय तरुणांना थांबवू शकत नाही, तुम्ही तरुणच विकसित भारत घडवणार आहात. तुमच्या सहभागातून भविष्यातील भारत तयार होणार आहे.” लोकसभा सदस्य अनुराग सिंह ठाकूर यांनी हा विचार मांडला.
आज, पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात 'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

आपल्या बीज भाषणात बोलताना पुढे ते म्हणाले, “फर्गसन महाविद्यालय केवळ ज्ञानाचे केंद्र नसून देशभक्त, बुद्धिवंत, नेते, समाज सुधारक, दोन पंतप्रधान घडवणारे स्थान आहे. तुम्ही त्यांचेच वारसदार आहात, त्यामुळे मी वर्तमान आणि भविष्यातील भारत निर्माते इथे पाहतो आहे.”
भारत सरकारने 2014 पासून देशाच्या नागरिकांसाठी आणलेल्या विविध योजना, तसेच पुढील काही वर्षाचे नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम या सर्वांची माहिती अनुराग ठाकूर यांनी ‘पीपीटी’ द्वारे विद्यार्थ्यांना दिली.

महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सुरु असलेली ‘लखपती दीदी’ योजना, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, शेतकऱ्यांना ‘आत्मनिर्भर’ करण्याला प्राधान्य, आरोग्य, रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक या सर्वात धरलेला वेग, भारतीयांना न्याय देणारे नवीन कायदे, युवांच्या पुढाकाराने उभे राहिलेले स्टार्ट अप्स, निर्यातीमध्ये झालेली वाढ, सर्वात अधिक शेती उत्पादने तयार करणारा भारत या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारातून जगातील पहिल्या पाच आर्थिक महासत्तांमध्ये भारत आहे आणि 2027 पर्यंत आपण तिसऱ्या स्थानावर पोहचत आहोत, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.
जनधन योजनेमुळे सर्व भारतीयांची बँक खाती सुरु झाली आणि त्यांना सरकारकडून मिळणारा पैसा थेट मिळाला. खोटी रेशन खाती, एलपीजी सवलत नागरिकांनी परत केल्याने सरकारचा मोठा निधी वाचला. डिजीटल आर्थिक व्यवहारातून डिजीटल इंडिया योजना यशस्वी झाली, अशा अनेक योजनांचे यश त्यांनी तरुणांसमोर मांडले.
प्रत्येक घरात वीज, नळाद्वारे पाणी, प्रत्येकास आरोग्य सुविधा, गॅस कनेक्शन, त्यातून झाडे करण्याचे कमी झालेले प्रमाण, या सर्वातून सामान्य नागरिक प्राधान्य क्रमावर असल्याचे लक्षात येईल, असेही ठाकूर यांनी सांगितले.
गुलामी मानसिकता नाकारून विकसित भारत मानसिकतेमुळे भारत स्पेस, पायाभूत सुविधांमधील ‘गती शक्ती’, यांची माहिती देताना, संरक्षण क्षेत्रातील भारतीय बनावटीची साधने, इतर देशांसाठी ती तयार करुन देणे, मेक इन इंडिया नंतर डिसाईन इन इंडिया पुढील आय फोन नक्की भारतात तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या सादरीकरणानंतर अनुराग ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. स्पर्धा परीक्षा तसेच कामाच्या ठिकाणी येणारा ताण आणि घडणाऱ्या दुर्घटना, युवकांमधील नशेचे वाढते प्रमाण, ग्रामीण भारताची भूमिका, ग्रामीण मंत्रालयाची आवश्यकता/महत्त्व, विकसित भारतातील भारतीय संस्कृतीची पाया म्हणून भूमिका, संरक्षण क्षेत्रातील साधन निर्मितीमधील गैरसरकारी संस्थांचा सहभाग, जागतिक पातळीवर चमकण्यासाठी तरुणांमध्ये आवश्यक गुण, भारतीय क्रीडा क्षेत्र, बेरोजगारी अशा सर्व विषयातील प्रश्नांना ठाकूर यांनी उत्तरे दिली.

उद्योजक डॉ. सुधीर मेहता यावेळी ‘युथ आयकॉन’ म्हणून उपस्थित होते.
पंतप्रधानांचे विकसित भारताचे स्वप्न सामान्य नागरिक पूर्ण करू शकतो. जागतिक पातळीवर वेगवान विकास करणाऱ्या पुणे शहर शैक्षणिक केंद्र, मेडिसिन, इलेक्ट्रिकल व्हेईकल, अद्ययावत तंत्रज्ञान, स्टार्ट अप्स, बायो मास, प्रति इंधन या सगळ्या क्षेत्रात पुण्यात काम होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एका वर्षात एक लाख रोपे लावणे, वाहतूक समस्या महविद्यालयीन तरुणांच्या कल्पनांतून सोडवणे यावर पिनॅकल इंडस्ट्री लिमिटेड ही कंपनी काम करत असल्याचे सुधीर मेहता यांनी सांगितले.
LOKF.jpeg)
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत आणि इतर सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासंदर्भात तरुणांचा सहभाग आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
KY1M.jpeg)
यावेळी विद्यार्थ्यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ पोर्टल विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली.
अनुराग ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या आवारात ‘एक पेड माँ के’ नाम उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण केले आणि विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंदही लुटला.



***
PIB Pune | ShilpaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2058556)
Visitor Counter : 120