पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब ,अभिनव उपाय ही काळाची गरज : केंद्रीय पोलाद मंत्री एच.डी. कुमारस्वामी


‘राष्ट्रीय पोलाद धोरण’ -हरित संक्रमणाचा पाया; उद्योग क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करते

"पोलाद निर्मितीमध्ये हरित क्रांती : शाश्वत नवोन्मेष" यावरील 36 व्या राष्ट्रीय परिषदेला केंद्रीय मंत्री एच.डी.कुमारस्वामी यांची उपस्थिती

Posted On: 19 SEP 2024 4:10PM by PIB Mumbai

मुंबई,19 सप्टेंबर 2024

 

केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच.डी. कुमारस्वामी आज मुंबईत गोरेगाव येथे "पोलाद निर्मितीमध्ये हरित क्रांती : शाश्वत नवोन्मेष" यावरील 36 व्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते.ऑल इंडिया इंडक्शन फर्नेस असोसिएशन (एआयआयएफए)सस्टेनेबल स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित या दोन दिवसीय परिषदेचा आज 19 सप्टेंबर 2024 रोजी समारोप झाला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एच.डी. कुमारस्वामी यांनी भारताच्या आर्थिक विकासात पोलाद उद्योगाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले की पोलाद उद्योग देशाच्या पायाभूत सुविधा, बांधकाम आणि उत्पादन क्षेत्राचा कणा आहे. रोजगार निर्मिती आणि प्रादेशिक विकासात या उद्योगाचे योगदान महत्त्वपूर्ण असून भारताच्या समृद्धीचे ते प्रमुख चालक बनले आहेत  यावर त्यांनी भर दिला.

2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनाप्रति वचनबद्ध राहून 2030 पर्यंत 300 दशलक्ष टन पोलाद क्षमता गाठण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टावर कुमारस्वामी यांनी भर दिला. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी असलेली अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान तसेच  हरित हायड्रोजन आणि कार्बन कॅप्चर यासारख्या अभिनव उपायांचा अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या क्षेत्रातील शाश्वत नवोन्मेषाचे महत्त्वही केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय पोलाद धोरण या हरित संक्रमणाचा पाया असून  हरित तंत्रज्ञानाचा अवलंब आणि संपूर्ण उद्योगात कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर ते लक्ष केंद्रित करते याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पर्यावरणावरील प्रभाव आणि आर्थिक विकासासाठी हरित पोलाद उपक्रम सारख्या उपाययोजनांचा उल्लेख करून त्यांनी  सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांदरम्यान मजबूत सहकार्यासाठी आवाहन केले.

शाश्वत पोलाद उत्पादनासाठी अभिनव उपायांना चालना देण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक वाढवण्याचेही त्यांनी आवाहन केले.

कच्चा माल आणि परिचालन संबंधी आव्हानांबाबत दुय्यम उत्पादकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांनी उद्योग क्षेत्राची प्रगती आणि स्पर्धात्मकतेला पाठिंबा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही संबंधितांना दिली.

पोलाद क्षेत्राने एकत्रितपणे हरित क्रांतीचा स्वीकार केला पाहिजे, उज्ज्वल भविष्यासाठी शाश्वत पद्धतींना चालना दिली पाहिजे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "संपूर्ण पोलाद क्षेत्रात हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याला गती देण्यासाठी तुमचा सहभाग आणि वचनबद्धता आवश्यक आहे." शाश्वततेप्रति वचनबद्धतेबद्दल परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांचे तसेच उद्योजकांचे त्यांनी आभार मानले. हरित पोलाद उद्योगाकडे मार्गक्रमण  ही एक सामायिक जबाबदारी आहे असे स्पष्ट करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमाला एआयआयएफए चे अध्यक्ष योगेश मधानी,लॉईड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, शैलेश भंडारी आणि कमल अग्रवाल यांच्यासह प्रमुख उद्योजक उपस्थित होते.

पोलाद उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या धोरणांबाबत सहकार्य करण्यासाठी प्रमुख हितधारकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. परिषदेबरोबर स्टीलेक्स 2024 प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून 200 हून अधिक प्रदर्शक 1,200 प्रतिनिधी आणि 15,000 व्यापार अभ्यागतांनी भेट दिली आहे.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2056656) Visitor Counter : 52


Read this release in: English