अर्थ मंत्रालय
एनपीएस वात्सल्य योजनेचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते राष्ट्रीय लोकार्पण; दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुणे, नागपूर,नांदेड तसेच मुंबईच्या जोगेश्वरी येथे विद्यार्थी आणि पालकांनी ऐकले अर्थमंत्र्याचे संबोधन
एनपीएस वात्सल्य योजनेमध्ये लहान वयातच मुलांना बचतीची सवय लागणार पालकांनी या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केली भावना व्यक्त
Posted On:
18 SEP 2024 7:32PM by PIB Mumbai
मुंबई/नागपूर /नांदेड/पुणे 18 सप्टेंबर 2024
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “एनपीएस वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेचा शुभारंभ आज नवी दिल्ली येथून केला. दिल्ली येथील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुणे, नागपूर,नांदेड तसेच मुंबईच्या जोगेश्वरी येथे करण्यात आले. राज्यस्तरीय बँकर्स समितीने मुंबई येथे एनपीएस वात्सल्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले होते. मुंबई मध्ये याप्रसंगी मुलांना या योजने साठी आवश्यक प्राण – परमनंट रिटायमेंट अकाऊंट नंबर कार्डचे वाटप देखील करण्यात आले.


नागपूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स, बेलतरोडी येथील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बघितले तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संबोधन सुद्धा ऐकले. नागपूर जिल्ह्यातील अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडिया व्दारे आयोजित या कार्यक्रमात बँक व्यवस्थापक मोहित गेडाम ,नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक सचिन सोनोने आणि स्कूल ऑफ स्कॉलर बेलतरोडीच्या मुख्याध्यापिका उमा भालेराव उपस्थित होते .याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या पालकांनी एनपीएस वात्सल्य या योजने विषयी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तर देऊन त्यांचे शंका समाधान सुद्धा केले .एनपीएस वात्सल्य योजनेमुळे लहान वयातच मुलांना पैशाच्या बचतीचे महत्त्व कळणार असून आपण नक्कीच आपल्या मुलाच्या उज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी एनपीएस वात्सल्य खाते उघडणार असल्याची भावना ज्योती पोटे या नागपूर मध्ये राहणाऱ्या पालकांनी व्यक्त केली .


पुण्यातील म्हात्रे पुल परिसरातील सिद्धी बँक्वेट हॉल येथे जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एनपीस वात्सल्य योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समिती संयोजक चित्रा दातार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक जावेद मोहनवी, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक जोशी पुथूर तसेच कॅनरा बँकच्या उपमहाव्यवस्थापक लीना पिंटो, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पपेट शो तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना 'एनपीएस वात्सल्य' योजनेची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. यादरम्यान, उपस्थितांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले संबोधनही लक्षपूर्वक ऐकत योजनेची माहिती घेतली.

नांदेड जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय विद्यालय विमानतळ रोड नांदेड येथे 50 विद्यार्थी व 50 पालकांच्या सहभागात जिल्हा या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमात सहभागी झाले होते.

एनपीएस वात्सल्य योजना विषयी:
एनपीएस वात्सल्य ही 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान 1 हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करू शकतो. मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे. मुलगा 18 वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते 18 या वयोगटात उघडण्याची ही योजना आहे. मुलांसाठी दीर्घकालनी बचत आणि आर्थिक नियोजनाला यामुळे हातभार लागणार आहे.
एनपीएस वात्सल्य - हिंदी साठी येथे क्लिक करा.
एनपीएस वात्सल्य - इंग्रजी साठी येथे क्लिक करा.
SR/SK/DW/DD/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2056287)