माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र मोठी झेप घेण्यासाठी सज्ज
भारतात ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) साठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई) ची स्थापना करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधी सुनिश्चित करण्यासाठी सरकार निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणार
एनसीओई ची स्थापना, भारताला अत्याधुनिक सामग्री प्रदान करणारे ‘कंटेंट हब’ म्हणून प्रस्थापित करून जागतिक स्तरावर भारताची सॉफ्ट पॉवर वाढवणार आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणार
Posted On:
18 SEP 2024 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनी कायदा 2013 अंतर्गत, कलम 8 कंपनी म्हणून भारतात ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) साठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई), अर्थात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना करायला मान्यता दिली. यामध्ये भारतीय वाणिज्य आणि उद्योग संघटना आणि भारतीय उद्योग महासंघ भारत सरकारचे भागीदार म्हणून उद्योग संस्थांचे प्रतिनिधित्व करतील. भारतात मुंबईमध्ये एनसीओई ची स्थापना केली जाईल. हा निर्णय, देशात AVGC टास्क फोर्स (कृती दल) स्थापन करण्याबाबत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्र्यांनी 2022-23 साठीच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेला अनुसरून आहे.
AVGC-XR क्षेत्र आज संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. यामध्ये ओटीटी, म्हणजेच ओव्हर द टॉप (OTT) व्यासपीठ, गेमिंग, जाहिराती, आणि आरोग्य, शिक्षण आणि इतर सामाजिक क्षेत्रांसह इतर अनेक क्षेत्रांचा समावेश असून, देशाच्या विकासाच्या संपूर्ण संरचनेला ते सामावून घेते.
झपाट्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान, आणि सर्वात स्वस्त डेटा दरांमुळे देशभरात इंटरनेटचा प्रसार वाढत असल्यामुळे, जागतिक स्तरावर AVGC-XR चा वापर विलक्षण वेगाने वाढत आहे.
AVGC-XR क्षेत्राच्या विकासाला चालना:
हा वेग कायम ठेवण्यासाठी, देशातील AVGC-XR परिसंस्थेला आधार देणारी सर्वोच्च संस्था म्हणून काम करण्यासाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जात आहे.
हौशी आणि व्यावसायिक पातळीवर काम करणाऱ्यांना अत्याधुनिक AVGC-XR तंत्रज्ञानातील नवीन कौशल्यांसह सुसज्ज करण्यासाठी विशेष प्रशिक्षण-वजा-शिक्षण देण्याबरोबरच, हे एनसीओई संशोधन आणि विकासालाही चालना देईल, आणि संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, डिझाइन आणि कला यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणेल ज्यामुळे AVGC-XR क्षेत्रात मोठी कामगिरी करता येईल.
हे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, देशांतर्गत उपयोग आणि जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी भारताच्या आयपीच्या निर्मितीवरही मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे भारताच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर आधारित आशयसंपन्न सामग्रीची निर्मिती होईल.
त्याचप्रमाणे एनसीओई, AVGC-XR क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि सुरुवातीच्या टप्प्यातील कंपन्यांना साधन संपत्ती प्रदान करून त्यांचे संवर्धन करणारे केंद्र म्हणून काम करेल. तसेच, एनसीओई, हे केवळ शैक्षणिक दृष्ट्या चालना देणारे नव्हे, तर उत्पादन/औद्योगिक दृष्ट्या चालना देणारे केंद्र म्हणूनही काम करेल.
एनसीओई ला AVGC-XR उद्योगाच्या वाढीला प्रोत्साहन देणारी शक्ती म्हणून स्थान दिल्यामुळे, ते देशाच्या सर्व भागांतील तरुणांसाठी रोजगाराचा सर्वात मोठा स्त्रोत बनेल.
यामुळे सृजनात्मक कला आणि डिझाइन क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळेल, आणि भारताला AVGC-XR उपक्रमांचे केंद्र बनवेल, जे पर्यायाने आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या उद्दिष्ट पूर्तीकडे घेऊन जाईल.
AVGC-XR साठी एनसीओई ची स्थापना, भारताला अत्याधुनिक सामग्री प्रदान करणारे ‘कंटेंट हब’ म्हणून स्थान मिळवून देईल, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची सॉफ्ट पॉवर वाढेल आणि माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात परदेशी गुंतवणूक आकर्षित होईल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2056200)
Visitor Counter : 45