पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्या हस्ते पोलाद निर्मितीमध्ये शाश्वत नवोन्मेष या विषयावर मुंबईत आयोजित एआयएफए राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन


ही परिषद हरित आणि अधिक लवचिक भविष्याप्रति आपल्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते: केंद्रीय पोलाद राज्यमंत्री

Posted On: 18 SEP 2024 4:32PM by PIB Mumbai

 
मुंबई, 18 सप्टेंबर 2024

केंद्रीय पोलाद व अवजड उद्योग राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्या हस्ते आज "पोलाद निर्मितीमध्ये हरित क्रांती : शाश्वत नवोन्मेष" या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय (18 ते 19 सप्टेंबर) परिषदेचे उद्‌घाटन झाले.

ऑल इंडिया इंडक्शन फर्नेस असोसिएशन (एआयआयएफए) सस्टेनेबल स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने आयोजित केलेला हा कार्यक्रम मुंबईत गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात सुरु असून त्याचा उद्या समारोप होणार आहे. केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी उद्याच्या समारोप सत्राला उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत पोलाद उद्योगाच्या अनुषंगाने कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदल विषयक आव्हानांवर एकत्रितपणे उपाययोजना शोधण्यासाठी संबंधित भागधारकांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

आपल्या उद्‌घाटनपर भाषणात भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी पोलाद उद्योग क्षेत्रात शाश्वत पद्धतींचा अवलंब आणि नवोन्मेष यावर भर दिला. ही परिषद हरित आणि अधिक लवचिक भविष्याप्रति आपल्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते, असे ते म्हणाले आणि उद्योगधुरीणांनी पर्यावरण स्नेही पद्धतींचा अवलंब करावा तसेच या क्षेत्राचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सहयोगाच्या महत्वावर विशेष भर देत वर्मा यांनी सांगितले की या परिषदेमुळे उद्योगक्षेत्रातील तज्ञ आणि भागधारक यांच्यातील संवाद वाढीला लागण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. "आपण एकत्रितपणे एक अर्थपूर्ण परिवर्तन घडवू शकतो आणि शाश्वत स्टील उत्पादन प्रक्रियेत भारताला जागतिक नेता म्हणून ओळख प्राप्त करून देऊ शकतो"

पोलाद उद्योग क्षेत्राला पर्यावरणीय आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याने उपस्थितांनी नवकल्पनांवर आधारित उपाययोजना अंगिकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय पोलाद निर्मिती क्षेत्रात हरित क्रांतीला चालना देण्यासाठी उद्योगधंद्यांनी सरकार आणि संशोधन संस्थांच्या सहयोगाने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाला प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी वर्मा यांच्या हस्ते भारतीय पोलाद क्षेत्रावरील वर्ष 2024 ची स्मरणिका आणि हँडबुकचे प्रकाशन देखील झाले; तसेच या उद्घाटन सत्रात त्यांनी स्टील उद्योगातील दहा प्रतिष्ठित संघटनांचा सत्कारही केला.

पोलाद मंत्रालयाचे सचिव संदीप पौंडरिक आणि पोलाद मंत्रालयाचे सहसचिव अभिजित नरेंद्र यांनी या क्षेत्रात शाश्वत नवकल्पना आणण्याचे महत्त्व विशद केले.

आयफाचे अध्यक्ष योगेश मानधनी यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमादरम्यान कालिका स्टील्सचे गोविंद गोयल आणि एसआरजे स्टील्सचे यशराज पीटी,  यांनी STEELEX  वर सादरीकरण केले. एआयआयएफए सस्टेनेबल स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सरचिटणीस कमल अग्रवाल, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन आणि इलेक्ट्रोथर्म (आय) लिमिटेडचे अध्यक्ष शैलेश भंडारी यांचीही या कार्यक्रमादरम्यान भाषणे झाली.

लेक्सकॉन स्टील्स लिमिटेडचे गोपाल गुप्ता यांच्या आभार प्रदर्शनाने सत्राची सांगता झाली.

स्टीलेक्स 2024 या एक्स्पो अर्थात प्रदर्शन स्थळी ही परिषद आयोजित करण्यात आली असून या एक्स्पो मध्ये 200 हून अधिक प्रदर्शक आणि 15,000 व्यापार अभ्यागतांसह 1,200 प्रतिनिधींनी भाग घेतला आहे.

S.Pophale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2056074) Visitor Counter : 55


Read this release in: English